-आनंद हर्डीकर

प्रा. आबाजी काथवते सरांनी वाईच्या पंडितांना ऐतिहासिक कागदपत्रे सापडली आहेत, ही बातमी वि. का. राजवाड्यांना सांगितली आणि ‘ती एकदा तुम्ही नजरेखालून घालावीत’, असा सल्लाही दिला. ती पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून राजवाड्यांनी त्या रात्रीच वाईचा रस्ता धरला आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच ते काकाराव पंडितांच्या घरी जाऊन धडकले. पंडितांनी त्यांना थोडक्यात घडला प्रकार सांगितला.

ते वकिलीच्या अभ्यासासाठी पुण्यात होते, तेव्हा त्यांनी टिळकांच्या ‘केसरी’त काशिनाथपंत साने यांच्या एका भाषणाचा वृत्तांत वाचला होता. ‘महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्व’ या विषयावरील सान्यांच्या भाषणाची ती बातमी वाचल्यावर मराठ्यांच्या इतिहासाची साधने शक्य असल्यास आपण जमवली पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले होते. काही दिवसांपूर्वी ते राहत असलेल्या वाड्याच्या तिसर्‍या मजल्यावरील भिंतीच्या अंबारात जुन्या कागदांचे पेटार त्यांच्या नजरेला पडले. घरमालकांना त्यात कसलाच लभ्यांश नाही, असे वाटल्यामुळे त्यांनी ते अस्ताव्यस्त टाकून दिले होते.
पंडितांनी कुतूहलापोटी ती कागदपत्रे पाहायला सुरुवात केली, बोपर्डीकर नावाचे त्यांचे एक मित्रही त्यांची मदत करायला तयार झाले. दोघांनीही धड अवस्थेतला पहिला कागद पेटार्‍यातून बाहेर काढला, वाचून पाहिला, तर ते गोविंदपंत बुंदेल्याने पानिपतच्या लढाईपूर्वी लिहिलेेले पत्र असल्याचे त्यांना लगेच समजले. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्या दोघांनी मग इतर कागदपत्रेही पाहिली आणि त्यातून जी जी महत्त्वाची वाटली, ती ती वेगळी काढून ठेवली.

त्याच सुमारास काथवते सर वाईला आपल्या घरी आले होते. पंडित त्यांचे नातेवाईक होते, तर बोपर्डीकर त्यांच्या घराशेजारीच राहत होते. दोघेही सरांना सहज भेटायला म्हणून गेले असताना गप्पांच्या ओघात त्या पेटार्‍यातल्या कागदपत्रांचा विषय निघाला. काथवते सरांना ती माहिती महत्त्वाची वाटली. ते लगेच पंडितांच्या घरी गेले आणि दोघा मित्रांनी वेगळी काढून ठेवलेली कागदपत्रे त्यांनी जातीने पाहिली, वाचली. ‘ही कागदपत्रे नुसती अशीच ठेवू नका; पुण्याला काशिनाथपंत सान्यांकडे किंवा वि. का. राजवाडे यांच्याकडे पाठवा’, अशी शिफारसही त्यांनी केली.

पंडित-बोपर्डीकरांनी आपला सल्ला गांभीर्याने विचारात घ्यावा म्हणून काथवते सरांनी नंतर पुण्याला गेल्यावरसुद्धा पत्र पाठवले आणि तिकडे राजवाडे भेटताच त्यांच्या कानावरही हे वृत्त घातले. पंडितांनी निवडलेली ती कागदपत्रे अखेरीस राजवाड्यांनी पाहिली; इतर कागदपत्रेही त्यांनी मागवली. सगळा ऐवज पाहिल्यावर त्यांना साहजिकच आनंद झाला आणि त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला – ही कागदपत्रे क्रमवारीने नीट लावायची आणि ती नुसती एखाद्या पेटार्‍यात नीट जपून न ठेवता बाळबोध लिपीत छापून प्रकाशितही करायची!

राजवाड्यांनी निव्वळ तो धाडसी निर्णयच घेतला, असे नाही; तर अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावलेसुद्धा उचलली. वेळ वाया न दवडता त्यांनी ते दप्तर पाहायलाही सुरुवात केली. प्रत्येक कागद अथपासून इतिपर्यंत वाचायचा, त्यावरच्या तिथीची/मितीची स्वतंत्र कागदावर नोंद करायची, मोडी मजुकराचे लिप्यंतर करायचे आणि पाचपंचवीस कागद झाले की ते क्रमवारीने लावून त्यांचा काही सुसंगत अर्थ निघतो का, त्याचाही अंदाज घ्यायचा. या सगळ्या किचकट कामात राजवाडे इतके तन्मय होऊन गेले की त्यांना जेवणखाण, झोप वगैरेची आठवणही होईनाशी झाली. भूक अनावर झाली की, वेळी-अवेळी वाटेल ते खायचे; दमल्यासारखे वाटले की झोप घ्यायची, पण जेमतेम १०-१५ मिनिटांत जागे होऊन पुन्हा कामाला लागायचे… असे जवळजवळ दोन महिने राजवाडे त्या कागदपत्रांतच बुडालेले राहिले. शेवटी त्यांच्या मनासारखी संगतवार कागदपत्रे लावून झाल्यावर छपाई करून घेण्यासाठी ते आपली संहिता घेऊन पुण्याला परतले.

तेही अक्षरजुळणीचे काम जिकिरीचेच होते, पण पुण्याच्या विठ्ठल छापखान्यातले कामगार कुशलतेने ती जबाबदारी पार पाडतील, असा राजवाड्यांना विश्वास वाटत होता. काम सुरूही झाले, संपलेदेखील; पण लहरी नियती राजवाड्यांची अग्निपरीक्षाच घेऊ पाहत होती. नियतीच्या त्या भयानक खेळात राजवाड्यांची काय दैना उडाली, ते पुढील लेखांकात…