राखेतून पुन्हा भरारी घेणार्या एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे वि. का. राजवाडे ऐतिहासिक साधनांच्या संकलित खंडाचे पुन्हा एकदा प्रकाशन करण्याच्या पूर्वतयारीसाठी वाईला जाऊन पोचले. आधीच त्यांचा स्वभाव शीघ्रकोपी होता, त्यात झाल्या प्रकारामुळे भर पडली होती. काहीसे तणतणतच ते काकाराव पंडितांसमोर जाऊन उभे राहिले. सगळे कागद पुन्हा एकदा मागवून घेऊन त्यांनी आपले काम सुरू केले आणि पंडित-बोपर्डीकर या दोघांनाही बरोबर कामात सहभागी करून घेतले. मूळ कागदपत्रे पूर्वी एकदा पाहिलेली, वाचलेली आणि तपासलेली असल्यामुळे यावेळचे काम तुलनेने सोपे होते, तरीही मोडी लिपीतील मूळ मजकूर बालबोध देवनागरीत उतरण्याच्या कामासाठी वेळ लागायचा, तो लागत होताच; शिवाय पंडित-बोपर्डीकर यांच्यावर सोपवलेेले काम त्या दोघांनी कितीही मन लावून केलेले असले, तरी ते तपासून पाहणे आणि झालेल्या चुका सुधारणे यासाठीसुद्धा राजवाड्यांचा वेळ जात होताच.
त्याच्या जोडीला पहिल्या आवृत्तीसाठी घेतलेल्या कागदाचे पैसे त्या व्यापार्याला द्यायचे होते, त्या उधारीची टोचणी त्रासदायक होती. थोडेथोडके नव्हते, तर चक्क हजार रुपये होते; तथापि व्यापारी समंजस असल्यामुळे सारखे तगादे लावत नव्हता, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब होती.
अखेरीस राजवाड्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण संहिता तयार झाल्याची खातरजमा करून घेतली आणि ते पुढच्या तयारीला लागले. एरंडे यांच्या वाड्याच्या तिसर्या मजल्यावरच्या भिंतीतल्या अंबारीमधल्या पेटार्यात पंडित-बोपर्डीकर जोडीला आढळलेले ते महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तावेज केव्हा एकदा छापून प्रकाशित करतो, असे त्यांना होऊ लागले. पुण्याला जाऊन त्यांनी छापखान्यांचा आढावा घेतला, हे गुंतागुंतीचे किचकट काम करायला तयार असणारा छापखाना सहज सापडला नाही. बरेच प्रयत्न केल्यावर सापकरांचा छापखाना मिळाला.
राजवाड्यांनी उत्साहाने काम सुरू केले खरे; पण काम त्यांच्या मनासारखे होईना. त्यांनी कच्ची मुद्रिते वाचून, तपासून दिली म्हणजे पुढची मुद्रिते सुधारित स्वरूपात त्यांना पाहायला मिळतील, अशी त्यांची स्वाभाविक अपेक्षा होती. पण ती काही पुरी होईना. पुन्हा पुन्हा मुद्रिते द्यायला आणि मजकुरात दुरुस्त्या करायला त्या छापखान्यातले कामगार टाळाटाळ करू लागले; एवढेच नव्हे, तर काही पाने राजवाड्यांच्या परवानगीशिवाय परस्पर छापल्याचेही समजले; छापलेली पाने पाहिली आणि राजवाड्यांना धक्काच बसला. एखाद्या दस्तऐवजाच्या मजकुरात कच्च्या मुद्रितामध्ये जर त्यांनी १५-२० ठिकाणी दुरुस्त्या केल्या असतील, तर त्यातल्या आठ-दहा दुरुस्त्याच प्रत्यक्षात छापखान्यातल्या कामगारांकडून केल्या गेल्या आहेत, बाकी केलेल्याच नाहीत, असे निदर्शनास आल्यामुळे ते भडकले. सापकरांना सांगून पाहिले, समजावून झाले, शुद्ध छपाई करण्याचे महत्त्व त्या मालकांना आणि कामगारांनाही ऐकवून झाले; पण फायदा झाला नाही. सारे पालथ्या घड्यावर पाणी! आकांडतांडव करूनही काही फायदा होणार नाही, हे लक्षात आल्यावर राजवाड्यांनी ते काम अर्धवट असतानाच थांबवण्याचा निर्णय घेतला.
वाचकांच्या हाती जो ग्रंथ सोपवायचा आहे, तो जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपातच असायला हवा, हा राजवाड्यांचा आग्रह होता. या बाबतीत कसलीही तडजोड स्वीकारायला ते तयार नव्हते. दुसर्या वेळची ‘पाव अष्टमांश’ (राजवाड्यांनी कालांतराने सगळी हकीकत सांगताना वापरलेले शब्द) पाने छापून झालेली होती, ती त्यांनी सरळ वाण्याला रद्दीच्या भावात विकून टाकली आणि शुद्ध छपाई करून देणारा छापखाना मिळेपर्यंत थांबायचे ठरवले. ‘वेळप्रसंगी स्वत: नुकसान सोशीन; पण ज्या वाचकांकडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा करणार नाही, त्यांच्या माथी निकृष्ट छपाईचा ग्रंथ मारून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’, हा त्यांचा बाणा प्रकाशन व्यवसायातील सर्वांनीच अनुकरणीय मानायला हरकत नसावी.
वि. का. राजवाड्यांचा वाईशी काहीतरी पूर्वजन्मीचा ऋणानुबंध होता, असे वाटावे म्हणून की काय, त्या गावातल्या मित्रमंडळींनी भाऊशास्त्री लेले नावाच्या सद्गृहस्थांशी राजवाड्यांची ओळख करून दिली. शास्त्रीबुवा वाईमध्ये एक छापखाना चालवत होते. त्यांच्या त्या ‘मोदवृत्त’ छापखान्यात ऐतिहासिक साधनांची शुद्ध व नीटनेटकी छपाई करून द्यायला ते तयार झाले. फक्त कुठलीही घाई करू नये, या एकाच अटीवर ते आपल्या देखरेखीखाली छपाई पूर्ण करणार होते.
राजवाड्यांना आलेला ‘इजा, बिजा, तिजा’चा तो अनुभव पुढील लेखात…
