राजवाडे जे करू पाहात होते, ते एक वैचारिक साहसच होते. परकीय राज्यकर्त्यांनी व त्यांच्यातल्याच लेखकांनी समाजात प्रयत्नपूर्वक प्रस्थापित केलेला इतिहास चुकीचा ठरवून भागणार नव्हते, तर पर्यायी कथनही उभे करावे लागणार होते. साधनांची कमतरता पदोपदी जाणवत होती; ती साधने ज्यांच्या ताब्यात होती, त्यांनासुद्धा त्या कागदपत्रांचे मोल समजावून सांगावे लागत होते आणि हाती लागलेल्या व इतर काहीजणांनी प्रकाशात आणलेल्या तुटपुंज्या साधनांच्या आधारे मोठे सार्वत्रिक सिद्धांतकथन करायचे होते. एका अर्थी राजवाडे अंधारात उडी घेत होते; तथापि डफच्या फक्त भौतिक पद्धतीनेच लिहिलेल्या इतिहासाला आपण आत्मिक पद्धतीने लेखन करून छेद देऊ शकतो, असा आत्मविश्वास टप्प्याटप्प्याने तरी नजरेसमोरचा रस्ता प्रकाशमान करत राहील, यावर त्यांची श्रद्धा होती.
राजवाडे पहिल्या खंडामध्ये जी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित करत होते, ती अगदी थोड्या कालावधीशी आणि प्रामुख्याने पानिपतच्याच एका मोहिमेशी निगडित होती, तरीही त्यानिमित्ताने त्यांना दर्शन घडवायचे होते, मराठेशाहीच्या दीडशे वर्षांमधील पराक्रमी मोहिमांमागच्या प्रेरणांचे. त्यांनी लिहिलेे, ‘पंधराव्या-सोळाव्या शतकांमध्ये व सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्राची स्थिती फारच विपन्न झाली होती… यवनांनी हिंदू धर्माचा (आणि समाजाचाही) उच्छेद करून टाकला होता. तेव्हा शिवाजी राजे अवतीर्ण झाले आणि त्यांनी यवनांच्या सर्वोेच्छेदक गतीचा प्रतिरोध केला. त्यांच्या या महत्कृत्याला अनुलक्षून समर्थ रामदास शिवाजी राजांना लिहिते झाले, ‘तुम्ही झाला म्हणून महाराष्ट्र धर्म काहीतरी राहिला!’ त्यांनी पुढे सप्रेम विनवणी केली की, ‘आपण धर्मस्थापनेची कीर्ती उत्तरोत्तर अशीच सांभाळली पाहिजे.’
समर्थांची अशीच आणखीही काही उद्धरणे देऊन राजवाड्यांनी पुढे म्हटले होते की, ‘सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील विचारी पुरुषांची मने एका जबर कल्पनेने भारून गेलेली होती. ती कल्पना कोणती, तर महाराष्ट्र धर्माची स्थापना करणे ही. ही कल्पना सफल करण्याचे अवघड काम शिवाजीने केले. शिवाजीच्या एकंदर चरित्राची गुरुकिल्ली हीच कल्पना होय. ही कल्पना ध्यानात ठेवूनच मग शिवाजीच्या व त्याच्या अनुयायांच्या कृत्यांचा विचार करावा म्हणजे त्याकाळी महाराष्ट्रात व कर्नाटकात जिकडे तिकडे मराठे निष्कारण धावताना परकीय इतिहासकारांना जे दिसतात, ते मनात काही विशिष्ट हेतू धरून शिस्तवार मोहिमा करीत आहेत, असे भासू लागेल. शिवाजीला चोर, लुटारू आणि त्याच्या अनुयायांना गनीम म्हणून यवनांनी टोपण नावे दिली, त्यांचा वाच्यार्थ घेण्याची जी परकीय इतिहासकारांना खोड लागली आहे, ती ते टाकून देतील व देव, धर्म आणि स्वराज्य यांची स्थापना करणार्या पृथ्वीवरील महापुरुषांच्या मालिकेत या पुण्यश्लोक व परमप्रतापी पुरुषाला आढेवेढे न घेता गोवू लागतील!’
मराठ्यांच्या मोहिमांमागची महाराष्ट्र धर्म स्थापनेची प्रेरणा समजून घेतली, तर त्या मोहिमांविषयीच्या दृष्टिकोनात आपोआप कसा बदल घडेल, हे सांगितल्यानंतर राजवाड्यांनी स्वत:च प्रश्न उपस्थित केला- ‘आता हा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? ख्रिस्ती धर्म, महमुदी धर्म, यहुदी धर्म यांच्यासारखाच हा महाराष्ट्र धर्म आहे की काय?’ आणि लगेच त्याचे नकारार्थी उत्तरही दिले, ‘तसा तो नाही.’ मग ‘महाराष्ट्र धर्म म्हणजे हिंदू धर्मच की नाही?’ तर ‘नाही, महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ हिंदू धर्म नव्हे. महाराष्ट्र धर्माची व्याख्या हिंदू धर्माहूनही जास्त व्यापक आहे!’ असे सांगून राजवाडे थांबले नाहीत; त्यांनी त्या संकल्पनेचा त्या प्रस्तावनेत तर आणखी विस्ताराने ऊहापोह केलाच, पण पुढील काळातही वारंवार त्या संकल्पनेचे विविध पैलू स्पष्ट करणारे लेखन केले. एवढेच नव्हे, तर न्यायमूर्ती म. गो. रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांच्यासारख्यांनीसुद्धा त्या काळात याच संकल्पनेचा वेगळा अन्वयार्थ समाजासमोर मांडला. आपल्यालाही पुढे अनेकदा या संकल्पनेभोवती झालेल्या साधकबाधक चर्चेचा धांडोळा घ्यायचा आहेच; परंतु तूर्त राजवाडे यांनी त्या प्रस्तावनेत आणखी काय म्हटले, ते पाहू या. त्यांनी लिहिले, ‘महाराष्ट्रातील हिंदू धर्म व इतर प्रांतांतील हिंदू धर्म यात महदंतर होते. सहिष्णुतेतील आणि जयिष्णुतेतील ते अंतर फार महत्त्वाचे होते. महाराष्ट्र धर्म समजून घेण्यासाठी तो फरक समजून घ्यायला हवा.’
