राजवाड्यांनी ‘राधामाधवविलासचंपू’ या छोट्याशा पोथीच्या निमित्ताने प्रदीर्घ प्रस्तावना लिहून शहाजीराजांच्या चरित्राची केलेली अभिनव मांडणी आपण समजून घेतली. त्यांच्या समग्र कार्याचा प्रातिनिधिक धांडोळा घेण्याचा या लेखमालेचा मूळ उद्देश असल्यामुळे ‘त्या’ प्रस्तावनेतील इतर मुद्द्यांच्याही परिचयात गुंतून न पडता आता त्यांच्या दुसर्या एका ‘ऐतिहासिक’ पुस्तकाचा परिचय करून घेऊ. जेमतेम ५९ छापील पृष्ठांचे हे पुस्तक राजवाडे हयात असताना प्रसिद्ध होऊ शकले नाही, याचे एक मुख्य कारण म्हणजे ते अनेक कारणांमुळे अपुरेच राहिले. शिवाय त्या पुस्तकातील मजकूर त्या काळातच नव्हे, तर आजही आक्षेपार्ह ठरवला जाऊ शकेल, असा होता… आणि तरीही राजवाडे यांचे नाव उच्चारले की, ज्या पुस्तकाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही, असे हे पुस्तक आहे – ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’.
चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था, बौद्ध धर्म व त्याचा इतिहास वगैरे बाबतींत आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अढळ स्थानावर विराजमान झालेल्या संतपरंपरेबाबत राजवाड्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनातून मांडलेले अनेक मुद्दे कमालीचे प्रतिगामी स्वरूपाचे होते. जर ते त्यांच्या काळातच विवाद्य ठरले असतील, तर ते पुढील काळात अधिकाधिक कालविसंगत व टाकाऊ वाटले, तर नवल नाही. त्यामुळे प्रागतिक विचारांच्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून राजवाडेे बाजूला सारले जाणे स्वाभाविक होते, परंतु तसे घडले नाही, याला कारण ठरले, ते हेच पुस्तक! आज ते आपल्याला उपलब्ध आहे, यासाठी जर कुणाला सर्वाधिक श्रेय द्यायचे झाले, तर ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनाच द्यावे लागेल.
या पुस्तकात समाविष्ट असलेली चार प्रकरणे म्हणजे राजवाड्यांनी एका लेखमालेसाठी टप्प्याटप्प्याने लिहिलेले चार लेखांक आहेत. त्या लेखमालेतील पहिले प्रकरण पुण्याच्या ‘चित्रमय जगत’ या सुप्रसिद्ध नियतकालिकाच्या मे १९२३ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील वाचकांमध्ये, विशेषत: त्यावेळच्या विद्वानांमध्ये, भयंकर वादळ उठले. त्यांनी ‘चित्रमय जगत’चे मालक वासुकाका जोशी यांना पत्रे पाठवून निषेधाचा सूर तर आळवलाच, पण ‘पुढचे भाग प्रसिद्ध कराल, तर तुमचा छापखाना जाळून भस्मसात करू!’ अशी धमकीही दिली. त्यामुळे वासुकाकांनी नाइलाजास्तव राजवाड्यांच्या नियोजित लेखमालेतील पुढची प्रकरणे छापायची नाहीत, असा निर्णय घेतला व तो लेखकांना कळवलाही. राजवाडे यांच्या त्या पुस्तकाची शोकांतिका तेथून सुरू झाली आणि ती पुढे कॉम्रेड डांगे यांनीच कालांतराने १९७६ साली पुण्याच्या ‘प्रागतिक पुस्तक प्रकाशना’तर्फे राजवाड्यांचे हे चारही लेख आणखी काही टिपणांसह प्रसिद्ध करताना त्याला जोडलेल्या विस्तृत प्रस्तावनेत सांगितली होती.
जिज्ञासूंनी ती २७ पानी प्रस्तावना मुळातून आवर्जून वाचावी, इतकी महत्त्वाची आहे. त्यात राजवाड्यांच्या त्या शोकांतिकेबद्दलच्या काही नाट्यपूर्ण घटनांचे डांग्यांनी केलेेले वर्णन मात्र त्या उभयतांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारे असल्यामुळे प्रारंभीच लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘अत्यंत प्राचीन आर्य समाजात आज आपण मानतो ती किंवा कोणतीच विवाहसंस्था अस्तित्वात नव्हती. भाऊ-बहीण, पिता-दुहिता असे शरीरसंबंध रानटी आर्यांत होत होते. हा सर्व भाग वेदसंहिता व महाभारतातील पुराव्यांवर आधारलेला होता…’ ही राजवाड्यांच्या पहिल्या प्रकरणाच्या आशयाबद्दलची माहिती सांगून कॉ. डांगे यांनी पुढे लिहिले, ‘ही लेखमाला थांबवल्याची बातमी मला समजली, तेव्हा हे पुस्तक अथवा विवेचन समाजशास्त्राच्या मांडणीला, विशेषत: मार्क्स-एंगल्सच्या इतिहासविषयक सिद्धांताला कच्चा माल या नात्याने किती उपयुक्त ठरेल, हे माझ्या लक्षात येऊन मला आनंद वाटला. हा ग्रंथ आपण छापावा, हे मनात धरून मी राजवाडे यांना भेटायला पुण्याला गेलो. ते घरी नव्हते. ‘हा इतिहासग्रंथ छापावयाला मी तयार आहे’, अशी त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहून आणि मुंबईतील माझ्या खेतवाडी येथील प्रेसचा पत्ता देऊन मी परत आलो…’
नंतर काय झाले, ते पुढील लेखांकात…
