– आनंद हर्डीकर

अध्ययनाच्या क्षेत्रात पुढे टाकलेले पाऊल यशस्वी ठरल्यानंतर राजवाड्यांना हुरूप आला आणि नव्याने मांडलेल्या संसारात लवकरात लवकर स्वत:च्या पायांवर उभे राहायचे, वडीलबंधूंकडून कमीत कमी मदत घ्यायची, अशा विचाराने त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात नोकरी करायचे ठरवले. पूर्वी केल्या होत्या तशा शिकवण्या करण्याऐवजी त्यांनी १८८९ मध्ये भावे सरांच्या शाळेत शिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. त्या वर्षभरात राजवाडे यांनी मुलांना वनस्पतिशास्त्र हा विषय शिकवला. नंतर १८९० मध्ये मात्र ते पुढच्या वर्षाच्या पदवी अभ्यासासाठी म्हणून पुन्हा डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात राहायला गेले.

इतिहास हा विषय त्यांनी निवडला खरा, परंतु तो विषय शिकवणारे प्राध्यापक तिथे नव्हते; शिवाय तो विषय घेऊन परीक्षेला बसणारे ते एकुलते एक विद्यार्थीच असल्यामुळे त्यांना नियमित वर्गात जाण्याची गरजच उरली नाही. वि. का. राजवाडे यांनीच पुढे लिहून ठेवलेल्या आत्मकथनात्मक लेखात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी ‘निव्वळ कॉलेजमधील खोलीचा, हवेचा आणि जवळच्या नदीचा उपयोग करून घेण्याकरता ८० रुपये फी भरली होती. तेथे राहून तंदुरुस्ती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. स्वान्त:सुखाय करायचे वाचन जोडीला होतेच.

१८९० मध्ये ऑक्टोबरपर्यंत राजवाडे कॉलेजच्या वसतिगृहात राहिले आणि नंतर मात्र परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष नीट केंद्रित करता यावे म्हणून पुण्याजवळच्या वडगावला जाऊन राहिले. त्या खेडेगावात खरोखरच विश्वनाथपंतांनी परीक्षेचा चांगला अभ्यास केला आणि नंतर झालेल्या बी.ए.च्या पदवी परीक्षेत ते उत्तीर्णही झाले. ‘मॅट्रिकपासून बी.ए.पर्यंत मी कधीही नापास झालो नाही’, असे रास्त अभिमानाने ते नंतरही म्हणत. त्यांना वाटे, ‘१८८४ साली प्रथम ते डेक्कन कॉलेजमध्ये गेले, त्याच वेळी जर दर दोन महिन्यांनी एक परीक्षा घेतली असती, तर त्या तिन्ही परीक्षा ते पहिल्या सहामाहीतच उत्तीर्ण झाले असते. पण सहा टर्मा, सहामाही, उपांत्य परीक्षा व मुंबईच्या फेर्‍या अशा नाना प्रकारच्या खुळात सापडल्यामुळे १८८४ पासून १८९० पर्यंत त्यांना व्यर्थ रखडत राहावे लागले. त्या रखडण्यात इतके मात्र झाले की, कॉलेजातील खुळसर शिस्तीला बळी न पडता मनाला योग्य वाटेल तेच त्यांनी केले आणि मन व मेंदू यांना शैथिल्य व शीण येऊ न देता जगात जास्त उत्साहाने काम करण्यासाठी ते सज्ज झाले, सिद्ध होऊ शकले!’

१८९१च्या जानेवारीपासून विसुभाऊ राजवाडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करू लागले. आता मात्र त्यांचा शिकवण्याचा विषय बदलला. इंग्रजी भाषा शिकवण्याची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. त्या आनंदात भर घालण्यासाठी म्हणून की काय, त्यांना पुत्ररत्नाचाही लाभ झाला. पण दुर्दैवाने तो आनंद अत्यंत अल्पजीवी ठरला. तो मुलगा दोन महिन्यांतच मरण पावला.

योगायोग असा विचित्र की, मानवी जीवनातली सारी सुखदु:खे, वेगवेगळ्या भावभावना आणि अखेरीस जाणवत राहणारी नश्वरता या सर्वांचा आविष्कार घडवणारा थोर आंग्ल नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथाच त्यांना त्या वेळी शिकवाव्या लागल्या. शालेय अभ्यासक्रमात त्या वेळी गाजत होते ते पुस्तक होते- ‘लॅम्ब्स टेल्स’. त्याचेच उपशीर्षक होते- ‘टेल्स फ्रॉम शेक्सपिअर’. त्या नाटककाराच्या २० विविध नाटकांच्या कथा शालेय विद्यार्थ्यांना सहज समजू शकतील अशा रंजक व सुबोध शैलीत सांगणारे ते पुस्तक होते. विशेष म्हणजे ते पुस्तक दोघा बहीणभावांनी मिळून लिहिलेले होते.

चार्ल्स आणि मेरी लँब या जोडीचे आयुष्यही अनाकलनीय घटनांनी भरलेले होते. मानसिक अस्वस्थतेच्या प्रभावाखाली मेरीने आपल्या जन्मदात्या आईलाच भोसकून ठार मारले होते आणि त्यानंतर धावत जाऊन चार्ल्सने तिच्या हातातून तो चाकू काढून घेतला होता. ‘वेडाच्या भरात’ तिने केलेल्या त्या भीषण गुन्ह्याबद्दल तिला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली न जाता उलट मानसोपचार केंद्रात ठेवले गेले होते. तिची नंतरची सर्व जबाबदारी चार्ल्सने उचलली होती. पुढे उत्तरायुष्यात त्या दोघांनी परस्परांच्या सहकार्याने लिहिलेले ते पुस्तक कमालीचे लोकप्रिय ठरले. मेरीने शेक्सपिअरच्या सुखात्म नाटकांच्या कथा सांगितल्या होत्या, तर चार्ल्सने शोकात्म नाटकांच्या.

राजवाडे शाळकरी विद्यार्थ्यांना करड्या शिस्तीत शेक्सपिअरच्या नाट्यपूर्ण कथा शिकवता शिकवता लहरी नियतीचा विचित्र खेळसुद्धा अनुभवत होते. त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणार्‍या त्या घटनांबद्दल पुढील लेखांकात…

anand47.hardikar@gmail.com