आपण केलेली ऐतिहासिक विधाने निव्वळ भाकडकथा आहेत किंवा खरोखरच घडलेल्या वास्तव घटना आहेत, या बाबींचा पडताळा पाहण्याची इतर साधने उपलब्ध आहेत, असे सांगून राजवाड्यांनी पुढे लिहिले की, ‘ऋग्वैदिक अशी एक समजूत सर्वमान्य आहे की, सूर्याची दुहिता जी उषा ऊर्फ सरण्यू तीच सूर्याची भार्या होती. ‘प्रजापतिर्वै स्वां दुहिर्त मध्यायत्।’ ह्या ऐतरेय ब्राह्मणवचनांत हाच अर्थ स्पष्ट सांगितला आहे. पितृदुहितृसंबंधाचा हा वैदिक पुरावा झाला. स्मृतिग्रंथातहि ह्या चालीची म्हणजे बापाचा स्वत:च्या मुलीशी संबंध होण्याची उदाहरणे आढळतात’…

एवढा खुलासा करून झाल्यावर राजवाड्यांनी समाजातील अशा चालीरीती कालांतराने कसकशा बदलत जातात, उत्क्रांत होत जातात, याचे विस्ताराने सोदाहरण विवेचन केले. त्यांनी लिहिले, ‘वसिष्ठसंहिता ही एक जुनाटातली संहिता म्हणजे स्मृतिग्रंथ समजतात. ह्या संहितेत कानीन म्हणून ज्याला म्हणतात त्या पुत्रासंबंधाने बराच ऊहापोह केेलेला आढळतो… पित्याच्या घरात राहून विधिवत विवाह न होता कन्येला तुल्य जातीच्या (पर)पुरुषाकडून जो पुत्र होईल तो त्या कन्येच्या बापाचा म्हणजे मातामहाचा पुत्र असे शास्त्र म्हणजे रूढी समजते.

येथे समाजशास्त्राच्या दृष्टीने असा प्रश्न उद्भवतो की, तुल्य जातीच्या परपुरुषाकडून लग्न न झालेल्या स्वकन्येच्या ठायी जो पुत्र उत्पादन केला, तो पुत्र त्या कन्येच्या बापाचा काय म्हणून शास्त्र किंवा रूढी ठरवी? तो कानीन मुलगा ज्या परपुरुषाकडून झाला त्याचा तो वास्तविक ठरावा व आपल्या आज्याचा म्हणजे आईच्या बापाचा नातू ठरावा. परंतु कानीन मुलगा परपुरुषाचाही न ठरता किंवा आज्याचा नातूही न ठरता आज्याचा धर्मोत्पादित पुत्र ठरे व त्या पुत्राची प्रत्यक्ष आई त्याची बहीण ठरे’…

‘ह्या चमत्कारिक चालीचा अर्थ काय? समाजात ही समजूत व रूढी व हा धर्म काय म्हणून मान्य झाला? सध्याच्या आपल्या समाजात असा प्रकार निंद्य समजला जाईल. परंतु वसिष्ठसंहिताकाली तो अधर्म्य व निंद्य समजला जात नसे. ह्याचे कारण काय?’ असे प्रश्न राजवाड्यांनी उपस्थित केले आणि स्वत:च त्यांच्या उत्तरादाखल लिहिले, ‘ह्याचे कारण एकच आहे आणि ते हे की, वसिष्ठकालीन समाज अशा एका पुरातन समाजाचा वंशज होता की, ज्या समाजात पिता आपल्या स्वत:च्या कन्येच्या ठायी संतती उत्पन्न करी.

सर्वच समाजात ही चाल त्या पुरातनकाली प्रचलित असल्याकारणाने कोणी कोणाला नावे ठेवीत नसत. म्हणजे त्या चालीला अधर्म्य वा निंद्य समजत नसत. वसिष्ठोत्तर मनु वगैरे संहिताकारांना व मनुसंहिताकालीन आर्यसमाजांना स्वकन्येच्या ठायी परपुरुषाकडून झालेल्या मुलाला कन्येच्या बापाने आपला मुलगा म्हणावा, ही चाल अप्रशस्त व अस्वाभाविक वाटून त्या कानीन मुलाचे पितृत्व उत्पादक परपुरुषाकडे किंवा कन्येच्या भावी पतीकडे येणे प्रशस्त वाटलेले उत्तरकालीन स्मृतिग्रंथांतून नमूद केेलेले आहे.’

आपल्या विवेचनाचा ओघ पुढे नेत अशा संबंधांच्याच आणखी एका पैलूबाबत राजवाड्यांनी लिहिले, ‘आत्तापर्यंत उदाहरणे नमूद केली, ती सर्व एका स्त्रीशी एकाच बापाचा किंवा भावाचा शरीरसंंबंध दाखविण्यापुरतीच झाली. अनेक सपिंड पुरुषांचा एकाच सपिंड स्त्रीशी संबंध दाखविणारी वाक्येही इतिहासातून सापडतात. हरिवंशाच्या दुसर्‍या अध्यायात असे लिहिले आहे की, दहा प्रचेत्यांनी व त्यांचा पुत्र जो सोम त्याने सोमाची जी मुलगी मारिषा तिचे ठायी आपापली तेजे घालून दक्ष प्रजापति निर्माण केला.

पितृदुहितृसंबंधाचे तर हे उदाहरण आहेच, शिवाय आजा व नात ह्यांचाहि संबंध या उदाहरणात दाखवला आहे, इतकेच नव्हे, तर दहा आजे व एक बाप यांचा संबंध बापाच्या मुलीशी झाल्याचे लिहिले आहे. याच अध्यायात पुढे असे वर्णन आहे की, सोमाचा मुलगा किंवा दौहित्र जो दक्ष प्रजापति त्याने आपल्या सत्तावीस मुली आपला बाप किंवा आजा जो सोम त्यास प्रजोत्पादनार्थ दिल्या…’ किती अतर्क्य आहे हे सारे! 

anand47.hardikar@gmail.com