पानिपतच्या पराभवाची ग्रंथोग्रंथी जी विविध कारणे सांगण्यात आली होती, त्यांच्यात काही व्यक्तींबाबतही आक्षेप नोंदवले गेले होते. राजवाड्यांनी आपल्या विवेचनात त्यांचाही समावेश केला. ‘सदाशिवरावभाऊंचे वर्तन उद्दाम व सान्निपातिक (गोंधळलेले, भ्रमिष्टासारखे) होते’; ‘त्याने इब्राहिमखानाच्या तोफखान्यावर भिस्त ठेवून मोगलाई रीतीचा अंगीकार केला’; ‘मराठ्यांची जुनी गनिमी रीत त्याने सोडून दिली’; ‘मराठ्यांच्या अंगी पूर्वीचा काटकपणा राहिला नव्हता, त्यांच्यामध्ये चैनबाजीचा प्रवेश झाला होता’; ‘सडे जाऊन युद्ध करण्याचे सोडून सदाशिवरावभाऊने कबिलेबुणगे बरोबर घेतले’; ‘त्याने दिल्लीचे तख्त फोडून तद्देशीयांचे वैर ओढवून घेतले’
तसेच ‘सुजाउद्दौल्याने अबदालीशी तह करून देतो म्हणून थाप मारून मराठ्यांचा विश्वासघात केला’; ‘गिलच्यांच्या धिप्पाड व अर्बुज (जाडजूड) शरीरापुढे मराठ्यांच्या ठेंगण्या व हलक्या मूर्तीचा टिकाव लागला नाही’; ‘सदाशिवरावभाऊने रघुनाथरावदादासारख्या अनुभवी शिपायाला या मोहिमेचे सेनापतित्व दिले नाही, भाऊला स्वत:ला लढाईचा सराव नव्हता’; ‘मल्हारराव होळकर माळव्याच्या अलीकडे खाशांनी येऊ नये म्हणून सांगत असता भाऊने त्याचा उपदेश ऐकला नाही’; ‘लाहोरास जाऊन अबदालीची धाड मुद्दाम बोलावून आणण्यात रघुनाथरावाचा मूर्खपणा झाला’; ‘अबदालीसारख्या अनुभवी शिपायापुढे सदाशिवरावभाऊसारख्या नवशिक्या सरदाराचे काहीएक चालले नाही’… वगैरे वगैरे. पराभवाच्या कारणांची अशी जंत्रीच राजवाड्यांनी वाचकांसमोर ठेवली आणि नंतर म्हटले – ‘‘या कारणांत तथ्य कितपत आहे व मराठ्यांचा मोड होण्याची खरी कारणे कोणती, याचा विचार करणे आवश्यक आहे.’’
पानिपतच्या तिसर्या लढाईतील (१७६१) पराभवाच्या सांगितल्या जाणार्या विविध कारणांची शहानिशा करण्याचा आपला मनसुबा स्पष्ट केल्यानंतर राजवाड्यांनी खंडनात्मक चिकित्सक विवेचन सुरू केले. अगदी प्रारंभीच आपला पूर्ण भौतिक, ऐहिक दृष्टिकोन स्पष्ट करताना त्यांनी म्हटले, ‘स्वामिद्रोहोत्पन्न पापाचे दैवी परिणाम काय झाले असावेत, त्याचा तलास लावण्याचे काम धर्मशास्त्र्यांकडे सोपवून त्या पापाचे मानवी परिणाम काय झाले, याचा विचार करणे उपयोगाचे ठरणारे आहे…’
पेशवे आणि छत्रपती यांच्या परस्परसंबंधांत बिघाड झाला, ही वस्तुस्थिती असली, तरी तिचे खापर पेशव्यांच्या माथी फोडता येणार नाही, ही आपली भूमिका ठामपणे मांडताना राजवाडे यांनी लिहिले, ‘बाळाजी बाजीरावाने सातारच्या छत्रपतींना शून्यवत करून टाकिले, ही गोष्ट सर्वस्वी खरी आहे; परंतु सातारच्या छत्रपतींना शून्य होऊन बसण्याखेरीज अन्य गती शक्य नव्हती, हीही गोष्ट तितकीच खरी आहे. शाहूूराजा वयातीत होऊन राज्य करण्यास अयोग्य झाला. त्याच्या मृत्यूनंतर गादीवर आलेला रामराजा राजपदाला अयोग्य व मतलबाला अजागरूक असा होता. अशाचा बडेजाव करीत बसण्यात व अशाच्या हाती राज्यसूत्रे ठेवण्यात राष्ट्राचे हित काहीच साधणे शक्य नव्हते. आत्यंतिक राष्ट्रहित साधण्याची ज्याच्या अंगी कर्तबगारी विशेष, त्याच्या हातांत सूत्रे जाणे स्वाभाविक व अपरिहार्य होते…!’
बाळाजीच्या हाती सूत्रे गेल्यामुळे व ताराबाईवर तसा अन्याय झाल्यामुळे सरदार पेशव्यांच्या विरोधात गेले, हे म्हणणे खोडताना राजवाड्यांनी पुढे म्हटले, ‘‘बाळाजीकडे राज्याची सूत्रे गेल्यावर सातारचे छत्रपती, त्यांचे राजमंडळ व त्या सर्वांना मुठीत ठेवू पाहणारी ताराबाई सातार्यातच तंटे करीत बसली. खर्चाकरता साठसत्तर लाखांचा मुलूख त्यांच्या नावाने तोडून दिला होता; परंतु त्यातील उत्पन्न व्यवस्थेने काढून घेण्याचीही ऐपत त्यांच्यात नव्हती. त्यांनी १७५५ मध्ये तर आपला खर्च पेशव्यांनी चालवावा व उत्पन्नाची व्यवस्था वाटेल तशी बघून घ्यावी, अशी तोड काढली. त्यामुळे छत्रपतींचे, राजमंडळाचे व विशेषत: ताराबाईचे जे काही थोडेसे स्थानिक महत्त्व होते, तेही गेले.
हे कर्म ताराबाईने आपल्या हाताने आपल्या अंगावर ओढून घेतले. त्यामुळे बाळाजीचे काहीच नुकसान झाले नाही. सरदारांपैकी कोणीही ताराबाईकडे लक्ष दिले नाही. पानिपतच्या मोहिमेच्या वेळी तर ताराबाईचे स्मरणही कोणास राहिले नाही. १७५१मध्ये ताराबाईची कड घेऊन भांडणारा दमाजी गायकवाड पानिपत मोहिमेत पेशव्यांच्या बाजूने हजर होता. ताराबाईला पेशव्यांनी शून्यवत केले म्हणून कुणीही सरदार पेशव्यांच्या विरुद्ध गेल्याचा दाखला तर कोठे मिळत नाहीच, पण कोठे ध्वनीदेखील काढलेला आढळत नाही…’’
anand47.hardikar@gmail.com
