सध्या नसत्या कुरापती काढून सगळ्या जगाला वेठीला धरणारी युद्ध धुमसत असताना मानवाचं खरं युद्ध कुठलं, नवनव्या साथींविरोधात लढून मानवजातीला तगवून ठेवण्यात लसींनी किती मोलाची भूमिका बजावली, याचं भान देणार्‍या पुस्तकाविषयी…

अमीर शाहुल यांचं ‘व्हॅक्सिन नेशन’ हे पुस्तक समस्त मानवजातीच्या खर्‍या युद्धाची कहाणी सांगतं. साथींचे आजार, कॅन्सर हे माणसाचे खरे शत्रू. त्या शत्रूंविरुद्धच्या युद्धातल्या पराभवांची आणि विजयांची ही गाथा आहे. त्यात प्राणपणाने झुंजणार्‍या असंख्य नामांकित आणि निनावी संशोधकांचा, तंत्रज्ञांचा, कार्यकर्त्यांचा आणि स्वत:वर प्रयोग करून घ्यायला सरसावलेल्या असामान्य सर्वसामान्यांचा हा पोवाडा आहे.

पुस्तकाची सुरुवात सीरम इ्स्टिटट्यूटची स्थापना आणि कोविडप्रतिबंधक लशीचं उत्पादन या दोन सनसनाटी घटनांपासून होते. तिथून ते पार भूतकाळात, अठराव्या शतकात, जेनरपर्यंत पोचते आणि टप्प्याटप्प्याने, गेल्या दोन-अडीच शतकांतला लसनिर्मितीचा इतिहास मांडते. कधी खुसखुशीत गमतीचे, कधी दाहक अन्यायाचे तर कधी उत्तुंग ध्येयसिद्धीचे किस्से सांगत तो इतिहास बराचसा गोष्टीरूप होतो.

त्या इतिहासात १८०१मधली, दुबळ्या देवीचे मौल्यवान टपोरे फोड मिरवत इस्तंबूलपासून मद्रासपर्यंत आणि पुढे भारतभर देवीची लस पोहोचवणार्‍या मानवी कुप्यांची साखळी आहे. १९०६मध्ये श्रीमंतांच्या पंचपक्वान्नांवर विषमज्वराचे जंतू शिवरणार्‍या, समर्थांघरच्या, विनालक्षणी सुगरणीची, टायफॉइड मेरीची रसभरित गोष्ट आहे. ऐंशीच्या दशकातल्या झेरॉक्स मशीनपाशी खोळंबलेल्या एका अबोल शास्त्रज्ञाने दुसर्‍या बोलघेवडीला विचारलेल्या एका प्रश्नातून उगम पावलेली, एड्सविरुद्धच्या ेफठअ व्हॅक्सिनची कल्पना आहे. कर्नाटकातल्या जंगलतोडीनंतरची, माकडांच्या मृत्यूंची रक्तरंजित रहस्यकथा आणि तिची गोचीड-गोम आहे. कॅन्सरपेशींच्या अमरत्वाचं मर्म त्यांच्या डीएनएच्या शेपटीत असतं. त्या शेपटावर मर्माघात करणारी डॉ. स्मिता नायरांची लसही या पुस्तकात आहे. 

आपल्या पोलियो लशीच्या शोधांचे हक्क सगळ्या मानवजातीला बहाल करणारे सॉक आणि सबिन इथे भेटतात. सॉकच्या लसीचं यश जगजाहीर करायला एलाय लीली कंपनीने साजरा केलेला सार्वजनिक महोत्सव आणि भारतात पोलियो लसीकरण यशस्वी करायला जेकब जॉनने उठवलेलं रान यांच्या मागच्या कळकळीपुढे आपण नतमस्तक होतो. कर्नल सोखी, शांतीस्वरूप भटनागर, ए. व्ही. हिल हे द्रष्टे; फाळणीच्या वणव्यात होरपळून फीनिक्ससारखा झेप घेणारा, टीबीच्या जंतूच्या चुलत भावाला हाताशी धरून टीबी, कुष्ठरोग, कॅन्सर या सगळ्यांना आणि गर्भधारणेलाही रोखणार्‍या लशी बनवणारा गुरसरन तलवार; निर्वासित म्हणून आलेला आणि ४६व्या वर्षी नोबेल मिळवणारा हरगोविंद खुराणा; हद्दपार झालेला, पाश्चात्त्य दंडेलीला टक्कर देऊन लस बनवायच्या अभिनव पद्धती शोधणारा बंडखोर वरप्रसाद रेड्डी; भारतात बायोटेक्नॉलॉजीचं रोप रुजवून त्याचा ‘वेलू गगनावरी’ नेणारा रामचंद्र अशी सारी थोर मंडळी या पुस्तकामुळे जवळच्या ओळखीची वाटू लागतात. 

भारताच्या लसनिर्मितीच्या खडतर वाटेवरून पुढे जाताना वाटेतले खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. दु:ख होतं, चीड येते. त्याच वेळी शास्त्रज्ञांची ‘कधीं न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे; बांधू न शकले स्वार्थाचे वा कीर्तीचे धागे’ वृत्ती समजते. अभिमान वाटतो.

त्या वाटेवर इंग्रजांचा जागतिक राजकारणातला वरचष्मा आणि त्यांच्या वैज्ञानिक मासिकां-साप्ताहिकांची वट यांचा प्रभाव फार मोठा होता. भारतातल्या प्लेग आणि कॉलराच्या लशींवर जिवापाड काम करणारा हाफकिन रशियन ज्यू होता. एका इंग्रज शास्त्रज्ञाने केवळ असूयेपोटी हाफकिनच्या देशाचा, धर्माचा आणि तारुण्यातल्या बंडखोरीचा बाऊ केला, त्याला आयुष्यातून उठवलं. इतरही लसींच्या बाबतीत, वैज्ञानिक विचारसरणी नसलेल्या वरिष्ठांनी हाताखालच्यांची मुस्कटदाबी केली.

इंग्रजांना त्यांच्या भारतीय सेनेला साथीच्या रोगांपासून दूर ठेवायचं होतं. त्यासाठी भारतीय जनतेलाच लस-प्रयोगातले प्राणी म्हणून वापरलं गेलं. कॉलरा, प्लेग, रेबीजच्या लशींचे प्राथमिक प्रयोग लाखो लोकांवर झाले. प्लेगच्या साथीत भारतीयांना विश्वासात न घेता, त्यांच्या धार्मिक भावनांचा विचार न करता लसीकरणाची मोहीम सक्तीने राबवली गेली. पण लसनिर्मितीसाठीचं संशोधन भारतीय शास्त्रज्ञांकडूनच करून घेतलं. त्या निमित्ताने भारतात उत्तम संशोधनकेंद्रं रुळली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्या केंद्रांनी संधीचं सोनं केलं.

त्यातही राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराने अनेकदा घोळ घातला. आंतरराष्ट्रीय आरोग्यसंस्थांनीही पाश्चात्त्य बलाढ्यांना झुकतं माप देत सरकारवर दबाव आणला. नियम धाब्यावर बसवून, धनदांडग्यांच्या नव्या लसींच्या चाचण्यांना मोकळं कुरण आणि निकृष्ट औषधांना नेणतं गिर्‍हाईक मिळालं. पाश्चात्त्य लसी घेतल्यामुळे माणसं मेली! कोर्टकचेर्‍या झाल्या. नियम धाब्यावर बसवल्याचं उघडकीला आलं. आरोग्य हा जागतिक व्यापार झाल्यामुळे सर्वात मोठी किंमत सर्वात गरिबांनी चुकती केली होती.

तशा दुर्बल परिस्थितीत स्थानिक कंपन्यांच्या पोटावर पाय आला. सीरम इ्स्टिटट्यूटने   या स्वस्त आणि प्रभावी लसीची निर्मिती केली. पण जागतिक संस्थेने फायझरच्या महागड्या लशीलाच प्राधान्य दिलं. लशी सार्वजनिक आरोग्यापेक्षा सत्ता, फायदा आणि राजकारण यांच्या हातचं खेळणं झाल्या. १९७६ ते १९८५ या काळात सरकारी लहरी धोरणं आणि पाश्चात्त्य दंडेलीमुळे भारतीय लसनिर्मिती लयाला गेली. लाखो चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ झाला. १९७६मध्ये हरियाणात सक्तीच्या नसबंदीने हाहाकार माजवला. लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला. त्यानंतर डीपीटी लस द्यायला तेच ग्रामसेवक गेले. धास्तावलेल्या लोकांनी लस नाकारली. ती धास्ती थोड्याफार प्रमाणात देशभर पसरली; टिकून राहिली.

पाश्चात्त्य देशांच्या मानाने भारताच्या समस्या वेगळ्या आहेत. अवाढव्य लोकसंख्या, गर्दीतला प्रवास, लहानशा जागेत कोंबून, दाटीवाटीने राहणारी माणसं यांच्यामुळे साथी सहज पसरतात. होरपळवणारं तापमान, कोसळणारा पाऊस, पुरात वाहून जाणारे पूल आणि रस्ते यांमुळे दुर्गम भागांतल्या खेड्यांपर्यंत कर्तीसवरती लस पोहोचवणं महाकठीण असतं. देशात वैविध्य इतकं की सर्वव्यापी प्रचारपद्धती आखणं अशक्यप्राय होतं. अंधश्रद्धा, अपप्रचार, सरकारी धोरणांतले घोटाळे गैरसमजांना खतपाणी घालतात. त्यात राजकारण्यांमधल्या दूरदृष्टीच्या अभावाची, भ्रष्टतेची भर पडली की शास्त्रज्ञांचे, कार्यकर्त्यांचे प्रयत्न वाया जातात.  

त्यातलं वैफल्य सोसूनही भारतीय लसीकरण यंत्रणा आणि शास्त्रज्ञ तगून राहिले. त्यांनी अन्यायाविरुद्ध निरंतर, शांततापूर्ण लढा दिला. नियमांना धरून, सामाजिक, प्रादेशिक भान राखून लोकांचे जीव वाचवण्यासाठी शिकस्त केली आणि उत्तम लसी बनवल्या. १९९१ पासून आर्थिक उदारीकरण झालं, खासगी कंपन्यांना प्रोत्साहन मिळालं, नव्या वाटा खुल्या झाल्या.

जागतिक अर्थकारणाचा आप्पलपोटेपणा ही भारताच्या लसीकारणाच्या दृष्टीने तशी इष्टापत्तीच ठरली. भारतीय तान्हुल्यांच्या जिवाशी खेळणारे डिफ्थेरिया, धनुर्वात, डांग्या खोकला पाश्चात्त्यांच्या खिजगणतीत नव्हते. कुष्ठरोग फक्त भारतासाठी ‘महा’रोग होता. मलेरियाही तसा ‘घरका मामला’च! भारताचा ‘घरगुती’ एड्स जगावेगळा होता. त्याला ‘घरगुती’ लशीचीच गरज होती. डेंग्यू, चिकुनगुनिया, इबोला, मारबुर्ग, झीका, वगैरे नव्याने अवतरलेल्या आजारांविरुद्ध लस विकसित करण्यात कोटीकोटींचा फायदा नव्हता. म्हणून बड्या धेंडांना ती नसती उठाठेव नकोच होती.

ती सगळी आव्हानं भारतीय लसकंपन्यांनी स्वीकारली. सध्या सरकारी आणि खासगी कंपन्या मिळून भारतात १७८ लसनिर्माते आहेत. नव्या साथींसाठी झपाट्याने, विश्वासार्ह लसी बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्यात, जगालाही पुरवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे जगाच्या लस-निर्मात्यांचा पत्ता बदलला.

कोविडकाळात तर निर्घृण निर्लज्जपणाची कमाल झाली. फायझर कंपनी भारताशी कुटिल डाव खेळू पाहत होती. एरवी पाश्चात्त्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था मानवतावादाच्या बाता करत असतात. महासाथीत त्यांच्या मानवतावादी धोरणाचं पितळ उघडं पडलं. कोव्हिडमध्ये जगजाहीर झालेली लसीची आणि तंत्रज्ञानाची साठेबाजी, बड्या कंपन्यांची गटबाजी, आंतरराष्ट्रीय संस्थांचं लांगूलचालन हे त्या महासाथीने गरीब देशांना शिकवलेले धडे आहेत. पुढच्या महासाथीत ते पक्के ध्यानात ठेवूनच धोरणं आखायला हवीत.

हे पुस्तक एका वार्ताहराने लिहिलेलं असल्यामुळे मजकूर उत्सुकतावर्धक आणि मुद्देसूद आहे. कुठेही पाल्हाळ नाही. तरीही जे सांगायला हवंं त्यात तडजोड नाही. विश्वविद्यालयात विज्ञान न शिकलेल्या या जिज्ञासू, अभ्यासू माणसाने पुस्तकातले सगळे वैज्ञानिक बारकावे शिकून घेण्यासाठी केलेला आटापिटा कौतुकास्पद आहे. पुस्तकाची इंग्रजी भाषा उत्तम, ओघवती आणि सुखद आहे. 

हा इतिहास आणि भविष्याबद्दलचे आडाखे केवळ थरारकथा नाहीत. त्यांच्यातलं तथ्य पारखून बघता येतं. त्यासाठी पुस्तकनिर्मितीचा प्रवास आणि भरघोस संदर्भसूचीही दिली आहे. हा विज्ञानाचा इतिहास आहे. केवळ गोष्टीचं पुस्तक नाही. सगळाच इतिहास मनोरंजक, गोष्टीरूप असू शकत नाही. त्यात सनावळी, नोंदींच्या साखळ्या, माहितीची जंत्री असतेच. तसा थोडा किचकट वाटणारा अत्यावश्यक भाग या पुस्तकात आहे.

थोडी कळ सोसून तो भाग वाचला, समजून घेतला तर गर्भनिरोधक लशीचा कॅन्सरवरचा हल्ला, ेफठअ ने लढाऊ पेशींसाठी छापलेलं शत्रूचं ओळखपत्र यांची मजा कळेल. पूनावालांच्या लशींच्या तबेल्यात पोहोचल्यावर आपल्याला याच पुस्तकात आधी भेटलेल्या संशोधकांची नावं आडनावं म्हणून मिरवणारे जंतू भेटतील; जुनी ओळख पटेल. संस्थांची क्लिष्ट नावं जाणून घेतली तर ‘नाम बडे और दर्शन छोटे’ चा प्रत्यय येईल. तशा छोट्या छोट्या अनुभवांनी वाचनातून मिळणारा आनंद दसपटीने वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, लसीकरणाच्या पूर्वी प्रत्येक आजार कसा जीवघेणा होता आणि त्याला कह्यात आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी कसं आकाशपाताळ एक केलं तेही समजेल. समाजमाध्यमांवरच्या खोट्यानाट्या प्रचाराला बळी पडून मुलांना लस टोचून न घेणार्‍या आईबापांना अक्कल येईल.

सध्या नसत्या कुरापती काढून सगळ्या जगाला वेठीला धरणारी युद्ध धुमसताहेत. वातावरण, जैववैविध्य वगैरेंची हकनाक, अतोनात नासधूस होते आहे. ‘व्हॅक्सिन नेशन’ या पुस्तकामुळे मानवाचं खरं युद्ध कुठलं ते वाचकांच्या लक्षात येईल. वैज्ञानिक, राज्यकर्ते आणि समाज यांनी ते युद्ध एकजुटीने लढण्याची गरज कशी आहे, इतर सार्‍या गोष्टी त्याच्यापुढे कशा गौण आहेत याचं भान आणून देणारं हे पुस्तक सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोकांनी वाचलं पाहिजे.

व्हॅक्सिन नेशन : हाउ इम्युनायझेशन शेप्ड इंडिया

लेखक- अमीर शाहुल

प्रकाशक- पॅन मॅक्मिलन

किंमत- ६९९ रु., पृष्ठे- ४७८

ujjwalahd9@gmail.com