राजवाड्यांनी पाचव्या खंडाला अगदीच लहान म्हणजे अवघी दोन पानी प्रस्तावना लिहिली होती, ती कमतरता त्यांनी सहाव्या खंडाला पुन्हा एकदा प्रदीर्घ (९८ पानी) प्रस्तावना लिहून भरून काढली. तो खंडही कोल्हापूरहूनच १९०५ साली प्रकाशित करण्यात आला. ऐतिहासिक साधनांचा तो खंड ६७६ पृष्ठांचा असल्यामुळेही जसा दखलपात्र ठरला, तसाच राजवाड्यांनी प्रस्तावनेत केलेल्या इतिहासविषयक विवेचनातल्या अनेक मुद्द्यांमुळेही गाजला. त्यांच्या पहिला खंडाला लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेप्रमाणेच ही प्रस्तावनाही त्यांच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली.
या प्रस्तावनेच्या प्रारंभी राजवाड्यांनी साधनसंकलनाचे खंड प्रकाशित करण्यामध्ये येणार्या काही अडचणींचे स्पष्टीकरण दिले. त्या अडचणींमध्ये मुख्य होती – कागद वाचून लिप्यंतर करू शकणार्या तज्ज्ञ माणसांची वानवा. त्यांनी लिहिले, ‘वरवर पाहणार्याला वाटते तितके हे काम सोपे नाही. शक १६२२पासून शक १७६०पर्यंतच्या ऐतिहासिक पत्रांचे मोडी अक्षर वस्तुत: प्रत्येक सुशिक्षित महाराष्ट्रीयाला वाचता यायला हवे; परंतु अनुभवाची गोष्ट ही की, हे आधुनिक मोडीही बहुतेकांना वाचता येत नाही. याचे मुख्य कारण स्वदेशाच्या इतिहासाचे व भाषेचे जितपत सशास्त्र ज्ञान असावे, तितपत सध्याच्या इंग्रजी व मराठी शिकलेल्या एतद्देशीय लोकांना असत नाही. मुसलमानी नावे, जुनी मराठी नावे, जुने मराठी शब्द, स्थलनामे वगैरे कधीही कानांवरून गेली नसल्यामुळे या लोकांच्या चुका होतात. जुने ताम्रपट वा शिलालेख वाचणे या लोकांना जितके कठीण जाईल, तितकेच हे लेख वाचणेही कठीण जाते… सबब इतिहासाच्या प्रेमापोटी जुना किंवा नवा कोणीही अनभ्यस्त (अभ्यास नसलेला) मनुष्य या कागदपत्रांच्या नकला करून द्यायला
सिद्ध झाला, तरी त्याला तुझे उपकार करून घेण्याची सोय नाही, असे निरुपायाने सांगावे लागते. आता सर्व लेख स्वत:च लिहू जावे, तर तेही अशक्य आहे. कितीही उत्साह असला, तरी मानवी बोटांनी काम करण्याची काहीतरी मर्यादा आहेच आहे.’ त्यानंतर राजवाड्यांनी जुन्या मराठी बाळबोधी पोथ्यांच्या नकला करून घेण्यात काय काय अडचणी येत होत्या, ते सांगितले…
‘एकवार, जुन्या संस्कृत पोथ्या लेखकाला उतरावयाला सांगितल्यास चालेल; परंतु जुन्या मराठी पोथ्या लेखकांकडे देणे निव्वळ पाप होय. मराठी पोथ्यांतील जुने शब्द, जुनी रूपे, जुनी भाषा व जुनी अक्षरे अवगत नसल्यामुळे शब्द तोडून लिहावयाचे, या लेखकांना कळत नसते ते नसतेच; उलट आधुनिक शुद्धलेखनाची सवय झाल्याने जेथे त्यांना पोथीतील भाषा समजते असे वाटते, तेथे ते मूळ पोथीतील शुद्धलेखन बदलून नूतन शुद्धलेखनाचा आश्रय घेतात व मूळचे सर्व स्वारस्य घालवितात. एखादा जुना शब्द नीट कळला नाही, तर आपल्या पदरचे अक्षर घुसडून जुळते करून घेतात आणि कधी कधी तर मूळ पोथीत चूक झाली आहे, असे वाटल्यास तीही सुधरावयाला कमी करीत नाहीत. एवंच, अशा लेखकांना जुन्या मराठी पोथ्या नकल करण्यास देणे नाना प्रकारांनी धोक्याचे आहे.’
चांगले प्रतिलेखक मिळत नाहीत, या अडचणीपाठोपाठ राजवाड्यांनी आणखी एका अडचणीचा धावता उल्लेख केला आणि प्रस्तावनेचे प्रास्ताविक आवरते घेतले. ती अडचण होती छापखान्याशी संबंधित. त्यांनी लिहिले, ‘जुने ऐतिहासिक लेख यथाशास्त्र छापावयाचे म्हटले म्हणजे चार-चार, पाच-पाच वेळा कच्ची मुद्रिते तपासली पाहिजेत व संपादक जागेवर नसल्यास तो असेल तेथे पाठवता आली पाहिजेत. पण एकच कच्चे मुद्रित तपासून दिले असता ते वेळेवर शुद्ध छापून निघाले म्हणजे गंगेत घोडे न्हाले, असा प्रकार सर्वत्र आहे. शिवाय जुने ऐतिहासिक किंवा काव्यलेख जसेच्या तसे छापण्यास कधी कधी नवे ठसे पाडणे जरूर असते, ते ठसे संपादक स्वत: कोठून तरी पाडून आणील, तेव्हा काम चालावयाचे… आवडीनिवडीचे चोचले करावयाचे मनात आणले म्हणजे हा इतका व्याप करणे अवश्य आहे…’
– आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com
