विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या तीन ग्रंथांचे स्फुरण महाराष्ट्रास लाभत आले आहे. लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ (१९१५), आचार्य शंकरराव जावडेकरांचे ‘आधुनिक भारत’ (१९३८) आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचे ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१) हे ते तीन ग्रंथ होत. मराठी साहित्याच्या स्वातंत्र्यपूर्व काळावर या ग्रंथांचा जितका प्रभाव होता, तितकाच तो आजही दिसून येतो. त्या अर्थाने हे मराठी साहित्याचे अभिजात ग्रंथ ठरावेत. कालातीत विषय, उच्च कलात्मकता, असाधारण भाषिक सौंदर्य आणि कलाकृतीचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व या अभिजाततेच्या निकषांवर आपण जेव्हा ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ ग्रंथ अभ्यासू लागतो, तेव्हा लक्षात येते की, या ग्रंथात एका मोठ्या कालपटास वर्तमानाशी जोडत जे भाष्य केलेले आहे, ते भारतीय समाजास सांस्कृतिकदृष्ट्या निरंतर समृद्ध करणारे ठरते. म्हणून तर साहित्य अकादमीने आपल्या पहिल्या मराठी पुरस्कारासाठी या ग्रंथांची १९५५ला निवड केली होती.
हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर त्याची पहिली समीक्षा दुर्गा भागवत यांनी साप्ताहिक ‘मौज’च्या १६ जानेवारी, १९५२च्या अंकात करीत म्हटले होते की, ‘‘तर्कतीर्थांचा हा ग्रंथ एक अप्रतिम ग्रंथ आहे. कारण, या विषयातल्या विचारांची मांडणी स्वतंत्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेली आहे. जिवंत प्रज्ञेच्या स्फुरणाचे हे पुस्तक एक उत्कृष्ट प्रत्यंतर आहे. ज्या थोर विचारांनी भरलेल्या पुस्तकांची पारायणे केली जातात, त्या पुस्तकांत या पुस्तकाचा नंबर वर लागेल, यात शंका नाही.’’
तर्कतीर्थांना साहित्य अकादमीने १९८९मध्ये महत्तर सदस्यत्व (फेलोशिप) बहाल केले होते, त्या वेळी प्रदान केलेल्या सन्मानपत्रात (सायटेशन) हे नमूद करण्यात आले होते की, ‘‘वैदिक संस्कृतीचा विकास’ कृति वैज्ञानिक मानवतावाद को नयी विश्व संस्कृति के अग्रदूत के रूप में स्थापित करते हुए वैदिक संस्कृति के विकास को प्रस्तुत करती है।’’
या ग्रंथाची प्रशंसा करीत विद्वान थकत का नाहीत, याचा शोध घेताना लक्षात येते की, तर्कतीर्थांनी या ग्रंथाची रचनाच मुळी मोठ्या विधायक उद्देशांनी केली आहे. तो उद्देश स्पष्ट करत या ग्रंथात त्यांनी वैदिक संस्कृतीचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे अधोरेखित केले आहे- ‘‘जगातील सर्व धर्मांचे व संस्कृतींचे परिपालन व्हावे, त्यांचा उच्छेद (नाश) होऊ नये, स्वत:च्या विशिष्ट आध्यात्मिक प्रेरणेने त्यांचा विकास व्हावा, अशा प्रकारची असाधारण आध्यात्मिक प्रेरणा वैदिक संस्कृतीमध्ये प्रथमपासून वसत आहे. रानटी अवस्थेपासून ते उच्च अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या सर्वच धार्मिक संस्थांचे त्यातील गर्ह्य (निंद्या) अनाचार वगळून वैदिक संस्कृतीने परिपालन (अंमल) केले आहे.’’ (पृ. ४७०-७१)
या ग्रंथाची महत्ता ओळखून यातील विचार सर्वदूर पोहोचावेत म्हणून या ग्रंथाची इंग्रजी, हिंदी, संस्कृत भाषांतरे झाली आहेत. प्रस्तुत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित झाले, तेव्हा त्याचे स्वागत करत डॉ. ग. ना. जोशी यांनी या ग्रंथाचे बलस्थान समजावत ‘रविवार सकाळ’च्या १६ जून, २००२ च्या अंकातील परीक्षणात म्हटले होते की, ‘‘वैदिकांच्या या समन्वयात्मक प्रयत्नांचा सांस्कृतिक इतिहास शास्त्रीजींच्या या ग्रंथात आहे. अखिल मानवजातीच्या, किंबहुना सर्व सजीव व निर्जीव सृष्टीच्या कल्याणाची अभिलाषा तिला आहे. तरी एकत्वाच्या भावनेला अत्युच्च महत्त्व देणारी आहे. ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ या वैदिक ऋचेत भारतीयांची व्यापक सहिष्णुता म्हणजे सर्वधर्मसमभाव व सामावून घेण्याची वृत्ती यांचे मूळ आहे. या समन्वयात वैदिकांनी आपल्या देवदेवतांचे व यज्ञसंस्थेचे विसर्जन केले. अवैदिक सांख्य, योग ही तत्त्वज्ञाने आणि शैव व वैष्णव धर्मसंप्रदाय यांना वैदिकांनी महत्त्वाचे स्थान दिले. सत्याची निरंतर अन्वेषणा व त्यागाचे जीवन आणि या वृत्तीतून मिळणाऱ्या आनंदासाठी जगण्याची आकांक्षा या आध्यात्मिक प्रेरणेचे अधिष्ठान फक्त भारतीय संस्कृतीतच दिसून येते. भारतीय संस्कृतीतच दिसून येते. भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक प्रेरणांचा जरी आजच्या भारतीयांना विसर पडू लागल्याचे चित्र दिसत असले, तरी त्या प्रेरणा सर्व जगाला मार्गदर्शक ठरू शकतील इतक्या समर्थ आहेत, असे अनेक निष्कर्ष या ग्रंथात व्यक्त झालेले आहेत.’’
