इब्राहिम अल्काझी, बादल सरकार, महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड, विजया मेहता, अरुण काकडे, रतन थिय्याम.. आधुनिक भारतीय रंगभूमी समृद्ध करणाऱ्या या मान्यवरांच्या यादीतले आणखी एक साम्य म्हणजे, हे सारे २०१० पासून सुरू झालेल्या ‘मेटा’ (‘महिंद्र एक्सलन्स इन थिएटर अ‍ॅवॉर्डस’चे लघुरूप) कारकीर्द-गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले होते.. यंदाच्या वर्षी या यादीत भर पडते आहे ती सुषमा सेठ यांची! आज पंचेचाळिशीपार असलेले सारे वाचक सुषमा सेठ यांना ‘हम लोग’ या आद्य (१९८४) चित्रवाणी दीर्घमालिकेतली ‘दादी’ म्हणून ओळखतात. उत्तराखंडातून आलेली बेरकी, खाष्ट सासू आणि परवशतेच्या परिघातच नांदणारी जुन्या पिढीतली स्त्री हे या भूमिकेचे दोन्ही रंग सेठ यांच्यामुळे खुलले होते.

‘कभी खुशी कभी गम’(केथ्रीजी), ‘कल हो ना हो’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजी-आईच्याच, पण शहरी होत्या. जया बच्चन, रिमा लागू या अभिनेत्रींना वलय अधिक असूनही ‘केथ्रीजी’मधल्या सेठ, बोलक्या चेहऱ्यामुळे प्रेक्षकांवर ठसल्या. पण हा बोलका चेहरा मूळचा रंगभूमीवरलाच. तोही दिल्लीत सारा मामला हौशीच असे, प्रकाशयोजना वगैरे फार परवडत नसे, आंगिक-वाचिक अभिनयावरच नाटक उभे राही, तेव्हापासूनचा! आणखी सांगायचे तर, ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’च्या स्थापनेच्याही (१९५९) आधीपासूनचा.. कारण ‘रानावि’च्या चार वर्षे आधीच दिल्लीत ‘यात्रिक’ नावाची नाटय़संस्था स्थापन करणाऱ्या मंडळींमध्ये या सुषमा सेठ होत्या. १९३६ साली जन्मलेल्या सुषमा यांना ऐन विशीच्या उंबरठय़ावर नाटकाबिटकांत कामे करण्यासाठी ‘परवानगी’ नाहीच घ्यावी लागली. वडील रामेश्वर दयाल हे खेळाडू, आई प्रकाशरानी हिने एकत्र उच्चभ्रू कुटुंबात आल्यावर संगीताची आवड बाजूला ठेवली तरी मुलांपर्यंत पोहोचवलेली.. भावंडांमध्ये मोठय़ा सुषमाला तर गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षाही द्याव्या लागल्या. त्या रियाजामुळे गाणे नाही, पण बोलणे जमले. तेही इतके की, आवाज-जोपासना आणि संवाद यांचे वर्गसुद्धा सुषमा घेऊ लागल्या.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

उद्योजक धृव सेठ यांच्याशी विवाह झाल्यानंतर तीन बाळंतपणे वगळता सर्व काळ सुषमा सेठ शिकत, शिकवत आणि नव्या नाटकाची तयारी करत होत्या. ‘चिल्ड्रेन्स क्रिएटिव्ह थिएटर’ या संस्थेतर्फे नाटय़ प्रशिक्षण वर्ग चालत, त्याआधी लेडी आयर्विन कॉलेजातून त्यांनी रीतसर शिक्षणशास्त्र पदविकाही मिळवली होती. आर्थिक परिस्थिती बरी म्हणून पुढे अमेरिकेत, पिट्सबर्ग येथेही नाटय़विषयक पदवी मिळवता आली. पण १९८० पासून तर नवा मार्गच सापडला (तो आपल्याकडे १९७० मध्येच अनेकांना सापडला होता).. चित्रपटांत नाव कमवायचे आणि त्याद्वारे रंगभूमीवरल्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता वाढवायची! चित्रपटासाठी विचारणारे पहिले दिग्दर्शक शाम बेनेगल, सहकलावंत म्हणजे ज्या पृथ्वीराज कपूर यांची नाटके लहानपणी पाहून ‘मीही नाटकात काम करणार’ असे सुषमा यांनी ठरवले, त्यांचा सुपुत्र शशी कपूर.. ‘जुनून’मधली फटकळ आत्याबाईची भूमिका नगण्य असूनही सुषमा यांनी जीव ओतून केली. हाच तो फटकळ, ग्रामीण, परवश जीव पुढे ‘हम लोग’मध्ये दिसला! ८० चित्रपटांत आणि अनेक चित्रवाणी मालिकांत सहभूमिका करूनही रंगभूमीलाच प्राण मानणाऱ्या सेठ यांच्यासाठी ‘मेटा’ पुरस्कार ही मोठीच दाद आहे.