ज्या काळी दूरचित्रवाणी बातम्यांत निर्बुद्धता भरलेली नव्हती, ज्या काळी वृत्तनिवेदक भाषेस मान देत असत, ज्या काळी एकाच्या प्रश्नाच्या शेवटाची शेपूट धरून दुसर्याच्या प्रश्नाची सुरुवात करत त्यास चर्चा म्हटले जात नसे, ज्या काळी बातमीदार ‘या ठिकाणी-त्या ठिकाणी-हे जे आहेत’ त्या शब्दकुबड्या घेण्याइतके अपंग नव्हते त्या काळी सरला माहेश्वरी तेव्हाच्या दूरदर्शनवर सायंकाळी साडेआठ, साडेनऊ वगैरेंसाठी वृत्तनिवेदक होत्या. आज त्या निवर्तल्या. बातम्या कशा वाचाव्यात हे आठवून आठवून आजच्या मंडळींना सांगावं असा तो काळ. इंग्रजीतील तेजेश्वर सिंग, कोमल जीबी सिंग, मराठीत विश्वास मेहेंदळे, प्रा. अनंत भावे, भक्ती बर्वे, ज्योत्स्ना कार्येकर, प्रदीप भिडे, आकाशवाणीवरचे दत्त्ता (त्यांच्या दत्तात तीन त असत) कुलकर्णी, सुधा नरवणे असे एकापेक्षा एक ‘ऐकावेत’ असे वृत्तसंवादक होते तो हा काळ. या काळात आपल्या चेहर्यावरची जन्मजात सा्त्विवकता घेऊन सरला माहेश्वरी दूरदर्शनवर रुजू झाल्या.
आणीबाणी नुकतीच उठलेली. माध्यमे आणि जनता नुकतीच कुठे मोकळा श्वास घेऊ लागलेली. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांची कंठाळी आरडाओरडी अद्याप सुरू व्हायची होती. त्यावेळी संध्याकाळच्या बातम्या वाचणार्या सरला माहेश्वरी यांच्यासारख्यांच्या सहजसुंदर निवेदनशैलीमुळे बातम्या आणि ते दिले जाणारे माध्यम या दोन्हींची विश्वासार्हता वाढण्यास मदत झाली. बातमीचा विषय भले गुंतागुंतीचा वा अस्वस्थता निर्माण करणारा असो. सरला अत्यंत शांत आवाजात, श्वासाची लय सुटणार नाही अशा पद्धतीने बातम्या वाचत. तेव्हा सगळीकडे टेलिप्रॉम्प्टर यायचे होते. हाताने लिहिलेल्या कागदावरच्या बातम्या वाचल्या जात. त्यावेळी कागद उलटण्याचा क्षण साधत श्वास घेण्याची हातोटी अनेक वृत्तनिवेदकांना साधली होती. सरला माहेश्वरी त्यातील एक बिनीच्या वृत्तनिवेदक.
दूरदर्शन हेच त्यावेळचे एकमेव दृश्य माध्यम. सरकारी होते तरी संबंधित खाते तेथे काम करणार्या माध्यमकर्मींच्या दर्जाबाबत तडजोड करत नसे. म्हणजे ‘बरा चेहरा’ इतकाच अलीकडच्या अनेक वृत्तवाहिन्यांवरील वृत्तनिवेदकांस आवश्यक निकष त्यावेळी नव्हता. म्हणजे वृत्तनिवेदक बुद्धिमान असत. वेळ मारून नेणे हा प्रकार सहसा नसे. त्यामुळे दिल्ली विद्यापीठातून मानव्य शाखेत पीएचडी मिळवलेल्या सरला वृत्त निवेदनाच्या क्षेत्रात आल्या. वृत्तनिवेदकाने आपली राजकीय मते, आवडीनिवडी वृत्त निवेदनात आणायच्या नाहीत हा दंडक त्याकाळी सर्रास पाळला जात असे. म्हणून सरकारी मालकीचे असूनही दूरदर्शनवरील वृत्तनिवेदक विरोधी पक्षीय नेत्यांविषयी तितक्याच अदबीने पेश येत. या अशा आदबशीर वर्तनासाठी सरला माहेश्वरी आवर्जून ओळखल्या जातात.
जवळपास तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हे वृत्तसादरीकरण आनंदाने केले आणि दर्शकांनीही त्यांच्या सादरीकरणात आनंद मानला. सरला माहेश्वरी, वर उल्लेखलेली सर्व मंडळी आणि अन्य त्यामुळे आजच्या वृत्तनिवेदकांसारखे घृणेचे विषय कधी झाले नाहीत. तेजेश्वर सिंग, सरला माहेश्वरी वगैरेंनी तर नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम केला आहे असे त्यांच्या वृत्तनिवेदनावरून वाटे. त्यांना त्या क्षेत्रात गती होतीही. वास्तविक सध्याच्या काळात ७१ हे वय काही कायमचा निरोप घेण्याचे नव्हे. एका अर्थी त्यांचे जाणे सयुक्तिक म्हणायचे. शांत, संयत, सभ्य, सुसंस्कृत अशा सरत्या काळाच्या प्रतिनिधी. तो काळ सरला. त्याबरोबर सरला माहेश्वरीही गेल्या. सरत्या काळाची ही सरला… प्रेक्षकांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहील. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.

