युक्रेनच्या क्रामाटॉर्स्क भागात रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र- हल्ल्यात २७ जून २०२३ रोजी त्या जखमी झाल्या आणि १ जुलै रोजी रुग्णालयात त्यांना मृत्यूने गाठले; पण त्यांची नोंद आता- मृत्यूनंतर दोन वर्षांनी घेण्याचे कारण निराळे आहे. ब्रिटनमधील प्रतिष्ठेच्या ‘जॉर्ज ऑर्वेल पारितोषिका’साठी यंदा व्हिक्टोरिया अमेलिना या ‘राजकीय ललितेतर लिखाण’ विभागात मरणोत्तर विजेत्या ठरल्या आहेत! ऑर्वेल पारितोषिक हे पत्रकारांच्या वृत्तलेख/ वृत्तमालिकांसह अनेक प्रकारच्या लिखाणासाठी दिले जात असले, तरी पुस्तकांसाठीचे पारितोषिक अधिक महत्त्वाचे.

जगाने दखल घ्यावी, असे बरेच काही व्हिक्टोरिया अमेलिना यांनी अवघ्या ३७ वर्षांच्या आयुष्यात केले होते. साहित्यिक स्वातंत्र्य जपणाऱ्या ‘पेन इंटरनॅशनल’चे जागतिक अधिवेशन २०१८च्या सप्टेंबरात पुण्यात भरले, तिथेही त्या आल्या होत्या. तेव्हा त्यांची ओळख २०१५ च्या ‘मैदान’ आंदोलनाची स्पंदने टिपणाऱ्या लेखिका म्हणून होती. ‘मैदान’ किंवा ‘मय्दान’ ही युक्रेनची राजधानी कीव्ह येथील मोठी सार्वजनिक जागा. या मैदानातच २०१० मध्ये त्या वेळचे युक्रेनी राष्ट्राध्यक्ष विक्टोर यानुकोविच यांच्या रशियाधार्जिण्या धोरणांविरुद्ध मोठे जनआंदोलन झाले होते. त्या आंदोलनाबद्दल ‘द फॉल सिण्ड्रोम’ ही कादंबरी व्हिक्टोरिया यांनी लिहिली. रशियाविरोधी आणि आंदोलकांना पाठिंबा देणारी भूमिकाच मांडणारी ही कादंबरी प्रचारकी ठरली नाही. त्यानंतरही त्या लिहीत राहिल्या, २०१७ मध्ये ‘डॉम्स ड्रीम किंगडम’ ही त्यांची दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. एव्हाना त्यांचा मुलगा सात वर्षांचा झाला होता. दुसऱ्या कादंबरीनंतर त्या बालसाहित्य लिहिण्याकडे वळल्या आणि त्याहीनंतर, कवितेकडे.

अन्य लेखकांची सुरुवात बहुतेकदा तरुणपणीच्या कवितांपासून झालेली असते, पण व्हिक्टोरिया यांचा प्रवास थोडा उलटाच झाला हे खरे. याचे कारण, त्या मूळच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कर्मचारी. ‘मैदान आंदोलना’नेच त्यांना लिहिते केले. साहित्यिक व्हावे, ही आकांक्षा नसूनही काहीशा अपघातानेच त्या लिहू लागल्या. मात्र पहिल्याच कादंबरीचे झालेले स्वागत त्यांच्या आयुष्याचा सांधा बदलणारे ठरले. आता स्वत: लिहायचे, इतरांनाही लिहिते करायचे आणि साहित्यक्षेत्रात संघटनकार्यही करायचे असे त्यांनी ठरवले. ‘द बुक आर्सेनल’ हा युक्रेनमध्ये २०११ पासून होणारा मोठा साहित्य-उत्सव. त्याच्या आयोजनातही त्या सहभागी होऊ लागल्या. याच साहित्य-उत्सवात २०२३ मध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वोलोदिमीर वाकुलेनो यांच्या दैनंदिनीला पुस्तकाचे स्वरूप देण्यात व्हिक्टोरिया यांचा वाटा मोठा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लुकिंग अॅट विमेन लुकिंग अॅट वॉर’ हे (ऑर्वेल पारितोषिकप्राप्त) पुस्तक २०२५ पर्यंत प्रकाशित होऊ शकले नाही, कारण युक्रेनमधून हे लिखाण मिळवणे, त्याचे संपादन करणे, सारेच जिकिरीचे होते. वास्तविक, हेच पुस्तक पूर्ण करण्यासाठी २०२३ मध्ये पॅरिसची एक फेलोशिपही त्यांना मिळाली होती; पण तिथे जाण्याआधी रशियन क्षेपणास्त्राने त्यांचा वेध घेतला. मग, अवघे ६० टक्केच लिहून झालेले हे पुस्तक प्रकाशित करायचेच असा चंग बांधून ‘ट्रुथ हाउंड्स’ या प्रकाशन संस्थेने काम सुरू केले. लेखिका फेब्रुवारी २०२२ मध्ये मुलासह इजिप्तला सुट्टीसाठी जाऊन परत येत असतानाच तिला युक्रेनवर रशियाने हल्ले आरंभल्याची बातमी कळते इथपासून स्वत: जखमी होण्यापर्यंतच्या काळातले, अनेक महिलांचे अनुभव या पुस्तकात आहेत.