‘एक शून्य शून्य’ हा अग्रलेख (३० ऑक्टोबर) वाचला. देशभरात एकूण २८ ठिकाणी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली तीसुद्धा नागपूरची हा सल अर्थातच भाजपच्या महाराष्ट्रातील आणि देशभरातील शीर्षस्थ नेत्यांना टोचला असणार. वाराणसीसारख्या ठिकाणीसुद्धा भाजपला जिंकता आले नाही त्यामुळे काँग्रेसच्या पराभवाने आनंदित झालेल्या पंतप्रधानांनी आपल्या या बालेकिल्ल्यात का जिंकता आले नाही याचा विचार अधिक करायला हवा ! पंतप्रधानांनी या छोट्या आणि फुटकळ निवडणुकीवर दिलेली प्रतिक्रिया कुठेतरी त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करणारी आहे ! उद्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीवरही ते असेच भाष्य करणार का ? ‘वोटचोरी’ चा वारंवार उल्लेख करणार्या राहुल गांधींनाही ही चपराक आहे कारण या सर्व निवडणुका ‘ईव्हीएम’वर नाही तर ‘बॅलेट पेपर’वर झाल्या. त्यामुळे ‘ईव्हीएम’बाबतचे त्यांचे आरोप निराधार ठरतात!
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>
नळी फुंकिली सोनारे…
‘हा नव्या आशेचा प्रारंभ!’ या लेखातील (३० ऑक्टोबर) सचिन सावंत यांची मांडणी अर्थपूर्ण वाटली. ‘भाजपने २०१४ च्या आधी केलेली आंदोलने, सरकारच्या कारभारावर घेतलेले गंभीर आक्षेप अराजक निर्माण करणारे नव्हते का?’, असे काही भाजप नेत्यांच्या सोईस्कर (!) विस्मृतीत जाणारे मुद्दे सावंत यांनी मांडले आहेत, त्यास मुख्यमंत्री वा भाजप समर्थक प्रांजळ उत्तरे देतील काय? ‘आताचे सत्ताधारी विरोधक असताना तेव्हाच्या सरकारवर जी कडवी टीका करायचे, तसेच गैरवर्तन सत्तेत बसल्यावर भाजपचे केंद्र (व राज्य) सरकार करत असेल, तर तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेसवरील टीकेसमान टीका तुम्ही आताच्या भाजप सत्ताधार्यांवर का करत नाही?’ असा प्रश्न एका भाजप समर्थकास विचारला असता, ‘कारण काँग्रेस वाईटच आहे!’ असे ‘अगाध ज्ञानमूलक’ उत्तर त्याने दिले होते. ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’, अशी सगळी यांची तर्हा दिसते. ती काही प्रमाणात बदलली, तर तोदेखील नव्या आशेचा एक प्रारंभ असेल.
नरेंद्र कुळकर्णी, वडाळा, मुंबई</strong>
तुझे माझे जमेना…
‘महायुतीत खापरफोड’ ही बातमी ( ३० ऑक्टोबर) वाचली. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजप व शिंदे सेनेला प्रत्येकी एक अशा अवघ्या दोन जागा जिंकता आल्याने आता या पराभावाचे खापर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर फोडत आहेत. ‘१२ पक्ष बदलून आलेला तो माकडछाप आम्हाला काय शिकवतो’ अशीही टिप्पणी एका पक्षाच्या प्रवक्त्याने दुसर्या एका माजी आमदारावर केल्याने वातावरण अधिकच चिघळल्याचे दिसते. या पराभवाबद्दल मुख्यमंत्र्यांनीही नरमाईची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच उमेदवाराचा झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागणे साहजिक आहे. आता फडणवीस आणि शिंदे या दोन्ही नेत्यांचा चेंडू अमित शहा यांच्या न्यायालयात गेल्यावर दोघांनाही शांत केले जाईल. कारण सत्तेसाठी घेतलेली कुबडी काढून घेणे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही.
दत्ताराम गवस, कल्याण
आता बँकांना चाप बसेल…
डिजिटल फसवणुकीला बळी पडलेल्या खातेदारांचे संरक्षण करणे ही बँकांची आणि वित्तीय संस्थांची मूलभूत जबाबदारी असून पीडितांच्या संपूर्ण आर्थिक नुकसानाची भरपाई संबंधित बँकांनीच करावी अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. बँका फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत होत्या. याला आता चाप बसेल आणि डिजिटल फसवणुकीची प्रकरणे कमी होतील. या फसवणुकीला बँकांच्या यंत्रणा जबाबदार आहेत. ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता आणि त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे हे बँकांचे मूलभूत कर्तव्य आहे. ग्राहकांचा विश्वास हीच बँकिंग व्यवस्थेची खरी संपत्ती आहे. बँकांना आर्थिक दंड, जबाबदारी निश्चिती आणि नियामक कारवाईचा धाक असला, तरच त्यांच्या निष्काळजीपणाला चाप बसेल. ज्या बँकेमध्ये फसवणुकीची जास्त प्रकरणे होत असतील, तर तिला काळ्या यादीत टाकून कारवाई केली पाहिजे. विवेक तवटे, कळवा
