‘जेआरडी टाटा हे माझे आदर्श’ असे विजयपत सिंघानिया यांनी ‘ॲन इन्कम्प्लीट लाइफ’ या आत्मचरित्रात लिहिले होते. अर्थात जेआरडींचा आदर्श त्यांच्या पिढीतल्या कित्येकांपुढे होता. पण विजयपत सिंघानिया हे तो आदर्श अक्षरश: जगले. व्यवसायाची भरभराट करण्यासाठी भ्रष्ट मार्ग वापरायचे नाहीत, सत्तेपेक्षा स्वातंत्र्याला अधिक महत्त्व द्यायचे आणि हवाई उड्डाणासारखा एखादा साहसी छंद जपून आव्हानांसाठी नेहमी तयार राहायचे ही जेआरडींची तत्त्वे विजयपत सिंघानिया यांनी आचरणात आणली. यापैकी त्यांच्या व्यवसायाची – ‘रेमण्ड्स’ची भरभराट काही १९८० मध्ये त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरच झाली असे नाही आणि नंतरही या भरभराटीमागे अनेक कारणे होती हे मान्य केले तरी, ‘रेमण्ड्स’ला जागतिक स्पर्धेतही विजयपत सिंघानिया यांनी सुखरूप टिकवले आणि वाढवलेसुद्धा, हे अमान्य करता येत नाही. ‘दानशूर उद्योजक’ असा त्यांचा उल्लेख २९ मार्च रोजी त्यांचे निधन झाल्यानंतरच्या अनेक आदरांजलीपर संदेशांत होताच.
उद्योजक म्हणून यश मिळवताना विजयपत सिंघानिया उमदेपणाने जगले. स्वातंत्र्याचे मूल्य उमगल्यानंतरचा हा उमदेपणा होता, याचा कागदोपत्री पुरावा म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेले ‘द इंडियन पोस्ट’ हे इंग्रजी दैनिक. अभिजात पत्रकारिताच करायची, असे ठरवून हे दैनिक एस. निहाल सिंग यांच्या संपादनाखाली सुरू झाले आणि विनोद मेहता यांच्या संपादकत्वाच्या काळात वाढले. तो काळ राजीव गांधींचा… ‘हिला नोकरीवर नको ठेवू- ती राजीव गांधींच्या नव्हेच, उलट राष्ट्रपती झैलसिंग यांच्या जवळची मानली जाते’ असा सल्ला डावलून आपल्याला त्यांनी नेमल्याची आठवण पुढे ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये महनीय कारकीर्द करणार्या कूमी कपूर यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे, बड्या वृत्तपत्रांच्या नाकावर टिच्चून उभ्या राहिलेल्या या ‘इंडियन पोस्ट’ला जाहिराती फारशा मिळतच नसल्या तरी, ‘रेमण्ड्स’च्या किंवा ‘जेके इंडस्ट्रीज’च्या जाहिरातींनी (पर्यायाने त्या व्यवसायातील पैशाने) ती कसर भरण्यापेक्षा नुकसान सोसणे विजयपत यांनी पसंत केले. ‘इंडियन पोस्ट’ला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी, यासाठी एक अचाट साहसही त्यांनी केले. सन १९८८ मध्ये लंडन ते मुंबई हे उड्डाण अवघ्या कमरेएवढ्या उंचीच्या मायक्रोलाइट विमानातून त्यांनी २३ दिवसांत केले. या विमानाचे नाव त्यांनी ‘ल एस्प्रिट डि ‘इंडियन पोस्ट’’ असे ठेवले होते. ‘इंडियन पोस्ट’च्या पत्रकारितेची अभिजातता अशी की, खुद्द मालकांचे हे साहसी उड्डाण यशस्वीपणे पार पडल्याची बातमी त्यांनी अन्य कुणा साहसवेड्याबद्दल असावी अशाच प्रकारे- पानाच्या घडीखाली- फोटोसह छापली.
या उड्डाणानंतर भारतीय हवाई दलाने त्यांना ‘मानद एअर कमोडोर’ असा दर्जा दिला. मुंबईचे शेरीफपद त्यांनी भूषवलेच पण अगदी १९९४ आणि २००५ मध्ये, म्हणजे पासष्टी उलटल्यानंतरही- ‘बलून’मधून उड्डाण त्यांनी करून दाखवले. पंचाहत्तरीनंतर आणि विशेषत: ‘रेमण्ड्स’चे एक हजार कोटी रु. मूल्याचे समभाग मुलाच्या नावे केल्यावर मात्र याच मुलावर- गौतम सिंघानियांवर त्यांनी न्यायालयात दावा केला, काही जाहीर अप्रिय विधानेही केली. तो वाद पुढे सामोपचाराने सुटला. उमदेपणाचीच सवय असलेल्या विजयपत यांना कदाचित म्हातारपण सोसले नसेल; पण आता त्यातूनही ते सुटले.
