चीनचा लिन डॅन आणि मलेशियाचा ली चोंग वेई यांच्यानंतर बॅडमिंटनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण होते. परंतु, डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेल्सेनने ती भरून काढली. तो एक बंडखोर, कोर्टवर प्रतिस्पध्र्यांवर तुटून पडणारा असा आक्रमक खेळाडू होता. व्हिक्टरने चिनी खेळाडूंशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून त्यांना अचंबित केले आणि जागतिक विजेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. आशियाई समकालीन खेळाडू व प्रशिक्षकांकडून बारकावे आत्मसात करून ॲक्सेल्सेनने आशियाशी एक अतूट नाते विणले.
तो डेन्मार्कचा, पण आशियातील स्पर्धा खेळण्यासाठी फार प्रवास करावा लागू नये यासाठी दुबईत स्थायिक झाला. बॅडमिंटन म्हणजे केवळ आशियाई देशांचा खेळ, हा समज ॲक्सेल्सेनने आपल्या मेहनतीने पुसून टाकला. जगभरातील तरुण खेळाडूंसाठी तो प्रेरणास्थान ठरला. भरपूर उंचीमुळे पल्ला गाठता येतो पण चापल्यावर मर्यादा येतात. ही त्रुटी दूर करण्यासाठी व्हिक्टरने प्रचंड मेहनत घेतली आणि टोक्यो २०२० (स्पर्धा कोविडमुळे २०२१मध्ये झाली) व पॅरिस २०२४ अशा सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकून तो सार्वकालिक दिग्गज पुरुष बॅडमिंटनपटूंपैकी एक बनला.
दुखापती या प्रत्येक खेळाडूच्या जणू हातात हात घालून चालत असतात. ॲक्सेल्सेनच्या बाबतीत असेच काहीसे घडले. त्याला सातत्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे सराव करणेही कठीण झाले होते. बॅडमिंटनपटू म्हणून असलेली त्याची ओळख आता त्याच्या आयुष्यावर परिणाम करू लागली होती. काही दिवसांपूर्वीच स्पेनच्या कॅरोलिना मरिननेही अशाच प्रकारच्या त्रासामुळे निवृत्ती जाहीर केली.
दोन ऑलिम्पिक सुवर्णांव्यतिरिक्त ॲक्सेल्सेनने रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्याने २०१७ आणि २०२२ मध्ये दोन जागतिक विजेतेपदे पटकावली. तर २०१४मध्ये कांस्यपदकविजेता ठरला होता. त्याच्यामुळेच डेन्मार्कने २०१६मध्ये प्रथमच बॅडमिंटनमधील प्रतिष्ठेची उबर चषक सांघिक स्पर्धा जिंकली. ॲक्सेल्सेनच्या स्मॅशची ताकद आणि नेटजवळील चपळता प्रतिस्पध्र्यांना हतबल करायची. भारताच्या एच. एस. प्रणॉयने २०२३ मध्ये, तसेच त्यानंतर लक्ष्य सेननेदेखील त्याला जर्मन खुल्या स्पर्धेमध्ये हरवले होते. पण तोपर्यंत ॲक्सल्सनच्या घटत चाललेल्या ऊर्जेची चिन्हे दिसू लागली होती. अशा पराभवांमुळे आणि शारीरिक त्रासामुळे त्याचा निर्णय पक्का होत गेला.
चिनी संस्कृतीबद्दलच्या आदरापोटी ॲक्सेल्सेन मँडरीन भाषा शिकला. तो केवळ चीनमध्येच नव्हे, तर इंडोनेशियामध्येही तितकाच लोकप्रिय होता. त्याने खेळाडूंच्या हक्कासाठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाशी संघर्षही केला. स्पर्धांचे वेळापत्रक, खेळाडूंना मिळणारी विश्रांती आणि २१ ऐवजी १५ गुणांच्या पद्धतीला झालेला विरोध अशा अनेक मुद्द्यांवर त्याने आवाज उठवला.
भारताशी त्याचे विशेष नाते होते. तो अहमदाबाद फ्रँचायझीकडून ‘पीबीएल’ लीग खेळला होता. एक विजेता आणि प्रस्थापित नियमांना आव्हान देणारा बंडखोर अशा दोन्ही रूपांत त्याने बॅडमिंटन खेळात मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. त्याची मैदानातील ती आक्रमक मुद्रा आणि खेळातील कौशल्य बॅडमिंटन रसिकांसाठी नेहमीच पर्वणी ठरायची.
