scorecardresearch

देश-काल : हिंदूत्वाच्या व्याख्येतील कच्चे दुवे

हिंदूंची व्याख्या करण्याच्या समस्येचे त्यांनी अभिनवपणे केलेले निराकरण, त्यांच्या राजकीय प्रकल्पानुसार होते.

vinayak damodar savarkar concept on hindutva
(संग्रहित छायाचित्र)

योगेन्द्र यादव

सावरकरांच्या भूमिकांमध्ये पायाभूत सैद्धान्तिक कच्चेपणा नसता, तर कदाचित त्याचा हा असा वापर होताना दिसला नसता..

‘हिंदूत्वा’च्या राजकीय प्रकल्पाला नेहमीच मूलभूत विरोधाभासाचा सामना करावा लागला आहे. सर्वसमावेशकतेचा दावा तर करावा लागतो पण प्रत्यक्ष व्यवहार मात्र काहींना वगळण्याचा असावा लागतो, अशी गत. नैतिक व सांस्कृतिक वैधता हवी म्हणून, तसेच भारताच्या संपूर्ण सभ्यता वारशावर दावा करण्यासाठी म्हणून ‘हिंदूत्व’ ही संकल्पना व्यापकच हवी पण राजकीय परिस्थितीवर तात्कालिक उत्तरे शोधता-शोधता ही संकल्पना सतत संकुचिततेकडे ढकलली जाते- जेणेकरून केवळ एकच राजकीय समुदाय, बहुसंख्याक हिंदू नावाचा एकारलेला, वैविध्य नसलेला संप्रदाय निर्माण व्हावा.

आजकाल तर, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्याच्या सहयोगींचे राजकारण ज्या प्रकारे चालते त्याचे साक्षीदार म्हणून आपण ‘हिंदूत्व’ या संकल्पनेला ढोंगीसुद्धा समजणार का, अशी परिस्थिती आहे. मात्र गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेले विनायक दामोदर सावरकर यांचे तपशीलवार, सविस्तर आणि पक्षविरहित ‘बौद्धिक चरित्र’ आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न करते की हिंदूत्व ही एक संकल्पना आहे, ती एक विचारधारा आहे जिच्याकडे आपण सर्वानी गांभीर्याने पाहायला शिकले पाहिजे.

पायाभूत विरोधाभास

प्रथम यामागील पायाभूत विरोधाभास समजून घेऊ. हिंदूत्वाधारित राष्ट्रवादाची मांडणी कोणीही (रा. स्व. संघ किंवा त्याआधी हिंदूमहासभा) करोत, प्राचीन काळापासून भारताचे राष्ट्रत्व शोधायचे आणि ‘भारतीय’ सभ्यतेच्या वैभवाचा दावा करायचा हे या मांडणीसाठी आवश्यकच असते. पण बौद्धिक डोलाऱ्यात दोन कच्चे दुवे राहतात. ईस्ट इंडिया कंपनीने सत्ता काबीज करण्यापूर्वीच सर्व संस्कृती आणि समुदायांचा समावेश असलेले ‘भारतीय राष्ट्र’ होते अशी व्याख्या केल्यास, भारतीय राष्ट्रामध्ये अनेक संस्कृती, समुदाय आणि धार्मिक संप्रदायांचा समावेश असणे अभिप्रेत आहे. हिंदूंव्यतिरिक्त त्यात केवळ शीख, जैन आणि बौद्धच नाही तर वसाहतवादाच्या आगमनापूर्वी शतकानुशतके भारतात राहणारे मुस्लीम आणि ख्रिश्चन यांचाही समावेश असावा. दुसरी समस्या स्थानिक समुदायांबद्दल आहे जे हिंदू धर्माला आजचे स्वरूप येण्याच्या आधीपासून या भूमीवर होतेच. भारताच्या राष्ट्रीयत्वावर त्यांचा प्राथमिक हक्क असू नये का?

थोडक्यात, समस्या वाटते तितकी साधी नाही. जर मूळ राष्ट्रीयत्व ठरवण्यासाठीची ‘मुदत’ खूप उशिराची (ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, १८५७ चे स्वातंत्र्यसमर अशी) मानली, तर त्यात मुस्लीम आणि ख्रिश्चनांचा समावेश असणे आवश्यक आहे. जर ही मुदत फार लवकरची मानली, तर निसर्गपूजक समूह, बौद्ध यांना सांस्कृतिक राष्ट्रवादात महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. हे दोन्ही पर्याय त्यांच्या राजकीय प्रकल्पाचा पराभव करतात. यापैकी कोणत्याही फंदात न पडता, मुदत वगैरेची वाच्यताच न करता हिंदूंसाठी भारताच्या ‘राष्ट्रत्वा’चा दावा कसा करता येईल? याच आव्हानाला मिळालेला अभिनव प्रतिसाद म्हणजे सावरकरांची हिंदूत्वाची संकल्पना! सावरकरांचे लिखाण कोणत्याही साहित्य प्रकारातील (कविता, नाटक, इतिहास, वादविवाद) असो, भाषा कोणतीही (मराठी, इंग्रजी) असो, लेखनाचे स्थळ कोठलेही (लंडन, अंदमान, महाराष्ट्र) असो र्की आयुष्यातील कोणत्याही राजकीय टप्प्यावरले (गांधीपूर्व, गांधीवादी आणि गांधींनंतरत्तर) ते लिखाण असो.. त्यातून ठळकपणे दिसतो तो इतिहासाच्या पुनर्कथनाचा प्रयत्न : भारतीय राष्ट्राचा, मराठय़ांचा वा स्वत:चाही इतिहास. या सर्वच लिखाणातून दिसणारा त्यांचा एककलमी अजेंडा म्हणजे हिंदूत्वाच्या राजकीय दाव्यांचे रक्षण करणे.

अशा निरीक्षणांमुळे या अभ्यासूपणे लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ‘हिंदूत्व आणि हिंसाचार : वि. दा. सावरकर व इतिहासाचे राजकारण’ ( हिंदूत्व अ‍ॅण्ड व्हायोलन्स : व्ही. डी. सावरकर अ‍ॅण्ड द पॉलिटिक्स ऑफ हिस्टरी) असे असणे स्वाभाविक आहे. लेखक विनायक चतुर्वेदी हे ग्वाल्हेरचे. सावरकरांच्या नावावरूनच, ‘विनायक नाव ठेवा’ असे या लेखकाच्या पालकांना, बालरोगतज्ञ डॉ. दत्तात्रेय सदाशिव परचुरे यांनी सुचवले होते, याचा किस्साही याच पुस्तकात नमूद आहे. पण याच पुस्तकात पुढे हेही नमूद आहे की, महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप असलेल्या नऊ व्यक्तींपैकी डॉ. दत्तात्रेय सदाशिव परचुरे हेदेखील एक होते. (‘त्यांनी ग्वाल्हेरच्या राहत्या घरी नथुराम गोडसेला आश्रय दिला’ असा आरोप होता.)

हे पुस्तक लक्षणीय ठरते, ते त्यातील प्रांजळ नोंदींमुळे, निष्पक्षपाती लिखाणामुळे. विक्रम संपत यांचे दोन खंडांचे पुस्तक याआधी चर्चेत आले, पण या चर्चेमध्ये त्या पुस्तकातील वाङ्मयचौर्याच्या आरोपांचा भाग अधिक होता. त्यामुळे त्याबद्दल न बोलणे बरे. पण विनायक चतुर्वेदी व त्यांच्या पुस्तकाचे वैशिष्टय़ हे की, आजवर सेक्युलर इतिहासकार आणि भाष्यकारांनी सावरकरांकडे तिरस्काराच्या आणि निंदकाच्या दृष्टिकोनातून सावरकरांकडे पाहिले, तसे चतुर्वेदी पाहात नाहीत. सावरकरांविषयी आपण कुठलाही निवाडा करू नये, सावरकर अभ्यासावेत आणि निरीक्षणेच नोंदवावीत, हे पथ्य या पुस्तकात पाळले गेले आहे. इतके की, सावरकरांच्या विचारातील स्पष्ट विरोधाभासांना छेद देतानाही लेखक अत्यंत सावध वाटतो. तरीही चतुर्वेदी यांची निष्कलंक विद्वत्ता आणि सावरकरांच्या लिखाणाचा सखोल अभ्यास यामुळे वादात विणले जाणारे अनेक पट आहेत.

विचारांवरच लक्ष केंद्रित केल्याने, सावरकरांबद्दलच्या बहुतेक अन्य विवादांचा ऊहापोह पुस्तकात नाही. त्यामुळे ‘ते ‘वीर’ की ‘माफीवीर’?’ , ‘स्वत:चेच स्तुतिपर चरित्र त्यांनी ‘चित्रगुप्त’ या टोपणनावाने का लिहिले?’किंवा ‘महात्मा गांधींच्या हत्येत त्यांचा थेट हात होता का?’ अशा प्रश्नांचे चर्वितचर्वण या पुस्तकात अजिबात नाही. चतुर्वेदी सावरकरांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतात आणि सध्याच्या राजकारणाच्या चष्म्यातून त्यांच्याकडे न पाहण्याची विनंती करतात. या संपूर्ण ४८० पानांच्या पुस्तकाने, सावरकरांच्या राजकीय कृतींपेक्षा राजकीय सिद्धांतावर भर दिला आहे.

सावरकरांनी शोधलेला उपाय..

तर, सावरकर सैद्धांतिक विरोधाभास कसे सोडवतात? आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांना हा सैद्धांतिक विरोधाभास पुरेसा जाणवलाच नसावा. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे सावरकरांचे पहिले मोठे पुस्तक १८५७ च्या इतिहासाचे पुनर्कथन करणारे होतेच पण ते सर्वसमावेशक राष्ट्रवादी चौकटीत होते. त्यामुळेच बहादूरशहा जफर, मराठे, तसेच हिंदू व मुसलमान राज्ये एकदिलाने लढली याची वर्णने या ‘स्वातंत्र्यसमरा’त आहेत. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध द्वेष पोसणे आता ‘अन्याय्य आणि मूर्खपणाचे’ आहे. पण अंदमानच्या तुरुंगवासानंतर सावरकर हे बदलले होते. १९२३ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘हिंदूत्व’ या पुस्तकाने हिंदू राष्ट्रवादाच्या  अनन्यवादी  विचारसरणीचा पाया घातला, ते विचार त्यांनी हयातभर जपले.

हिंदूंची व्याख्या करण्याच्या समस्येचे त्यांनी अभिनवपणे केलेले निराकरण, त्यांच्या राजकीय प्रकल्पानुसार होते. हिंदू केवळ हिंदू धर्माच्या अनुयायांपुरते मर्यादित राहू शकत नाहीत, तर सावरकरांच्या मते, जर ‘हिंदूस्थान’ ही तुमची मातृभूमी, पितृभूमी आणि पुण्यभूमी असेल तर तुम्ही हिंदू आहात. मातृभूमी ही भौगोलिक संकल्पना आहे. परंतु त्यामध्ये सर्व जाती, धर्म आणि समाजातील लोकांचा समावेश असेल. ‘पितृभूमी’ यावर मर्यादा घालते, कारण या संकल्पनेत याच देशामध्ये अनेक नातेसंबंध, वारसासंबंध गृहीत आहेत. पण तरीही ज्यांच्या पूर्वजांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांना यातून वगळले जाणार नाही. म्हणून सावरकरांची अंतिम अट : जे लोक या भूमीला आपली पवित्र भूमी मानतात (मक्का नाही, जेरुसलेमही नाही) तेच फक्त हिंदू.

‘हिंदू’ इथे येण्यापूर्वी जे लोक या भौगोलिक प्रदेशात राहिले त्यांचे काय? सावरकरांसमोर ही एक गंभीर समस्या होती, कारण त्यांनी ही कल्पना स्वीकारली होती की आर्यानी वैदिक संस्कृती आणि सभ्यता भारतात आणली. त्या काळच्या इतर अनेक लेखकांप्रमाणेच सावरकरही, हिंदू हे काळय़ा कातडीचे नाहीत हे सिद्ध करण्यासाठी उत्सुक दिसतात. मग ते म्हणतात : होय, हिंदूंनी मूळ रहिवाशांवर हिंसकपणे विजय मिळवला, परंतु ते (मूळ रहिवासी) हिंदू संस्कृतीशी समरस झाले. कुठलीही बंडखोरी नव्हती, प्रदीर्घ चीड नव्हती. ते सर्व आता हिंदू आहेत. भारताबाहेरून येऊन जे हिंदू सांस्कृतिक प्रभावाखाली राहिले, तेही असेच समरस झाले. ब्रिटिश वसाहतवादाला सावरकरांचा विरोध होता, कारण तो ‘युरोपीय’ होता, म्हणून. तो ‘वसाहतवाद’ होता म्हणून नव्हे.  हेच सावरकर, हिंदू साम्राज्यविस्तारासाठी उत्साही होते.

हे विचार कितीही अभिनव असले, तरी त्यांतून सुसंगत विचारधारा निर्माण होते का? अर्थातच नाही. हिंदूत्वाची स्पष्ट व्याख्या सावरकर कधीच देऊ शकले नाहीत हे या पुस्तकातून दिसून येते. त्याऐवजी, हिंदूत्व म्हणजे काय हे दाखवण्यासाठी त्यांनी इतिहासाचा अवलंब केला, ज्याला ते ‘संपूर्ण इतिहास’ म्हणतात. भारताच्या इतिहासाचे त्यांचे ‘भव्य पुनरुत्थान’ वस्तुनिष्ठ दृष्टीने अचूक आहे का, हा प्रश्न कायमच आहे, कारण आजवर कोणत्याही गंभीर इतिहासकाराला सावरकरांनी ‘हिंदू इतिहासा’साठी वापरलेल्या (अनुमानावरच भर देणाऱ्या) अभ्यासपद्धतीशी आणि तिच्या निष्कर्षांशी सहमत होणे शक्य झालेले नाही. आदिवासी आणि द्रविड यांचा भूतकाळ गांभीर्याने अभ्यासणारे तर सावरकरांशी सहमत होऊच शकणार नाहीत. ही विचारधारा म्हणावी, तर तिची नैतिक उंची काय? सावरकरांनी मूळ रहिवाशांच्या हिंसेसाठी जी नैतिक सवलत त्यांच्या पूर्वसूरींना दिली होती ती मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटिश वसाहतवादी सत्तेला का दिली जाऊ नये हे स्पष्ट केल्याशिवाय या ‘विचारधारे’तला ‘नैतिक आदर्श’ दिसणारच नाही. हिंदूत्वाचे भावनिक आवाहन पायामध्येच कच्चे आहे, कारण त्याला नैतिक सखोलता नाही. हिंदूुत्वाच्या राजकारणाचा मार्ग बौद्धिकदृष्टय़ा प्रामाणिक असू शकत नाही, तो याच पायाभूत कच्चेपणामुळे.

मग वि. दा. सावरकरांच्या विस्तृत कथा आणि सिद्धांत हे बहिष्कार, संताप, द्वेष, धर्माधता आणि हिंसाचाराच्या राजकीय प्रकल्पासाठीच आज उपयोगी पाडले जाताहेत, हे नैसर्गिकच नव्हे काय? विनायक चतुर्वेदी असा थेट युक्तिवाद देत नाहीत. परंतु या बौद्धिक चरित्रात त्यांनी जे साहित्य सादर केले आहे ते आपल्याला इतर कोणत्याही निष्कर्षांशिवाय सोडत नाही.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.

yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-08-2022 at 02:49 IST