अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूदान यज्ञामध्ये भूसंपादनाएवढेच प्रेमसंपादनालाही महत्त्व होते. किंबहुना थोडे अधिकच होते. जय जगत् असा घोष करणाऱ्या विनोबांना आशियात मूलभूत बदल होण्याची गरज वाटत होती. त्यांना युरोपपेक्षा आशियातील परिवर्तन महत्त्वाचे वाटत होते. किमान दक्षिण आशिया तरी एक व्हावा असा त्यांचा आग्रह होता. भूगोल वेगळा झाला असला तरी इतिहास आणि संस्कृती एक होती. म्हणूनच आसामची सीमा ओलांडून भूदान पदयात्रेने पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात प्रवेश केला.

विनोबांनी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक असावे यासाठी प्रयत्न केले होते. या उपक्रमाला ते ‘एबीसी ट्रँगल’ म्हणत. तिथे त्यांचे सहकारी होते सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान. या त्रिकोणाच्या निर्मितीसाठी उपकारक ठरतील असे दोन ग्रंथ विनोबांनी संपादित केले. ‘कुराण सार’ आणि ‘धम्मपद’ (नवसंहिता). त्यांच्या कुराण साराबद्दल जाणत्या मंडळींच्या मनात आदराची भावना दिसते. विनोबा हिंदू होते तसेच ते सच्चे मुसलमान होते. कुराण शरीफ जवळपास मुखोद्गत असणाऱ्या विनोबांची त्या ग्रंथावर भक्तीच होती. म्हणून कुराण पठणाच्या वेळी त्यांना अश्रू अनावर होत.

ही त्यांची भावना धम्मपदाच्या बाबतीतही होती. खरे तर विनोबांना अध्ययनासाठी निवांत वेळ मिळाला नाही. तो तसा मिळाला असता तर विनोबांनी गीतेप्रमाणेच बायबल, कुराण आणि धम्मपदाचे आणखी सखोल अध्ययन केले असते. पिख्तॉल, स्कोफिल्ड, आचार्य नरेंद्र देव आदींच्या तोडीचे संशोधन केले असते. ‘तुम्ही मला भूदान द्या मी तुम्हाला धर्मग्रंथांचे संशोधन करून देतो.’ ते शंकराचार्याच्या बाबतीत म्हणत की, ‘आचार्य उद्या अध्ययन सोडून देतो म्हणाले असते तर मी त्यांना तसे करू दिले नसते.’ विनोबांचे हे उद्गाार सूचक आहेत.

विनोबांना अध्ययनाची व्यसन म्हणावे एवढी ओढ होती. त्यांना चालतेबोलते विद्यापीठ म्हणत ते अक्षरश: खरे होते. याचा अर्थ असा की एका आदर्श विद्यापीठात जी ज्ञानसाधना होते ती या माणसात सामावली होती. तिचा विकास करण्याची त्यांची इच्छा असली तरी जनतेच्या प्रश्नांना बाजूला सारून अभ्यास करण्याची त्यांची तयारी नव्हती. म्हणून ते श्रमत राहिले आणि त्यांच्या श्रमिकाने त्यांच्यातील ज्ञानवंताला उन्नत केले. भूदान यज्ञात विनोबांनी दिलेली अध्ययन आहुती सहसा लक्षात घेतली जात नाही. या काळात ते जंगम विद्यापीठ झाले. ‘कायकवे कैलास’ हा मंत्र घेऊन वावरले.

हा श्रमण, आपल्या सहकाऱ्यांसह ५ सप्टेंबर १९६२ रोजी आसामची सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात दाखल झाला. यावर पंडित नेहरू म्हणाले, ‘विनोबांची ही पूर्व पाकिस्तानची यात्रा थोडय़ा दिवसांपुरती असली तरी उभय देशांमध्ये सौहार्द स्थापन करण्यास सहायक होईल.’ या यात्रेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या तथापि तिथे विनोबांना मंत्र पोहोचवता आला. ‘जय जगत्!’

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinoba bhave life history bhoodhan movement understanding islam by vinoba bhave zws
First published on: 01-12-2022 at 03:29 IST