जुन्या मराठी कवितेबद्दल अभिमान बाळगणारे माधव चंद्रोबा डुकले यांनी १८६० सालीच ‘सर्वसंग्रह’ नावाचे मासिक सुरू केले होते. विष्णुशास्त्र्यांनी किशोरवयात त्या मासिकाचे अनेक जुने अंक पाहिले होते, वाचले होते. त्यांना ते आवडलेही होते. वडलांचा त्या साहित्याबद्दलचा प्रतिकूल अभिप्राय समजल्यावरही त्यांनी पिताजींच्या नकळत का होईना, पण ती आवड जोपासली होती. साने-मोडक-शाळिग्राम या मित्रांच्या सहकार्याने त्यांनी जेव्हा ‘काव्येतिहाससंग्रह’ हे मासिक सुरू केले, तेव्हा काशिनाथ साने यांच्यावर जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांबद्दलच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

या संदर्भात हे लक्षात घ्यायला हवे की, ‘‘खड्र्याच्या लढाईतली फत्ते आणि खडकीच्या लढाईत पडलेला फडशा या दोन्ही घटनांच्या आठवणी काढणारे अनेक वृद्ध त्या काळातल्या पुण्यात हयात होते. स्वराज्य नष्ट झाल्यामुळे अन्नाला मोताद झालेले शाहीर आणि गोंधळी यांच्या खड्या कवनांची काळजाचा थरकाप उडवणारी डफावरली थाप पुणे शहराच्या भारलेल्या परिसरात अद्याप कडकडून उठत होती. किंबहुना १८५७ चा उत्तरेतला उठाव फसल्यानंतर जीव बचावून परत आलेले जे शिपाईगडी कुठे शागीर्दाच्या तर कुठे पुजार्‍याचा, कुठे हरिदासाचा तर कुठे गोंधळ्याचा किंवा फेरीवाल्याचा पेशा पत्करून लपतछपत गुजराण करीत होते, त्यांच्या दंडांतली रग आणि डोळ्यांतली धग खासगी गप्पाष्टकांत अजूनही उफाळून प्रकट होत होती…

‘‘सातारचे हरिशास्त्री पंडित नावाचे विद्वान गृहस्थ ‘दक्षिणा मंडळा’च्या कामासाठी पुण्याला येऊन चिपळूणकरांकडे उतरत असत. कधीकधी ते तीनचार महिनेसुद्धा राहत असत. स्वराज्याचे अखेरचे दिवस प्रत्यक्ष पाहिलेल्या त्या शास्त्रीबुवांची स्मरणशक्ती इतकी प्रखर आणि वक्तृत्व इतके प्रभावी होते की, ते आपल्या जुन्या आठवणी उजळावयाला लागले म्हणजे त्यांच्या रसवंतीच्या अस्खलित ओघात ते ते प्रसंग डोळ्यांपुढे अगदी जसेच्या तसे उभे राहत असत. पेशवाईच्या उत्तरकालाचा चालताबोलता ज्वलंत इतिहासच जणू त्यांच्या रूपाने श्रोत्यांसमोर अवतरत असे. कथा आणि कीर्तने, लळिते आणि लावण्या, आख्यायिका आणि पोवाडे ऐकण्याचे त्या वेळच्या संवेदनशील तरुणांना वेड लागले होते…’’ (ग.त्र्यं.माडखोलकरांनी चिपळूणकर-चरित्रामध्ये केलेल्या वर्णनाचा हा संक्षेप आहे.)

विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि काशिनाथपंत साने हे दोन तरुण एकत्र येऊन त्या सांस्कृतिक वारशाचे जतन करू पाहात होते. ‘काव्येतिहाससंग्रह’ हे मासिक काढण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होता. केवळ एकट्यादुकट्या हरिशास्त्री पंडितांच्या आठवणींवर विसंबून न राहता समाजात ठिकठिकाणी विखुरलेली, जुनी, ऐतिहासिक कागदपत्रे शोधून ती एकत्रितपणे समाजातल्या विचारी माणसांसमोर ठेवायची कल्पना अमलात आणणे मात्र खूप कठीण होते.

ते किचकट आणि वेळखाऊ काम चिकाटीने पार पाडण्याचे श्रेय काशिनाथ साने यांना द्यायला हवे. कागदपत्रांचा कालानुक्रम ठरवणे; त्यांचा विविध घटनांशी असणारा संभाव्य संबंध पडताळून पाहणे; त्यासाठी त्या कागदपत्रांच्या तारखा शोधणे आणि जिथे त्या नसतील, तिथे आतल्या मजकुराचा आशय जाणून घेऊन त्या ठरवण्याचा प्रयत्न करणे; मूळच्या कागदपत्रातली जी अक्षरे स्पष्ट दिसत नसतील, ती तर्कबुद्धी वापरून ठरवणे वगैरे बाबी न कंटाळता दिवसेंदिवस, महिनोन्महिने करत राहणे ही साधीसुधी बाब नाही. ती एक प्रकारची तपश्चर्याच म्हटली पाहिजे.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने बहुतांशी मोडी लिपीत लिहिलेली असल्यामुळे ती जर समाजासमोर ठेवायची असतील, तर ती बाळबोध देवनागरीत करून घेणे क्रमप्राप्त असे. त्याच बरोबरीने जुन्या भाषेमधील शब्दप्रयोगांचा अर्थ लक्षात घ्यावा लागे, व्याकरणविशेषांकडे लक्ष पुरवावे लागे.

मिरजेचे वासुदेवशास्त्री खरे आणि मुंबईचे राजारामशास्त्री भागवत यांच्यासारख्या व्यासंगी माणसांचे लक्ष मराठ्यांच्या इतिहासाकडे वळले होते; परंतु त्याच इतिहासाची साधने आधी आणि इतिहास नंतर हा या शास्त्रातला कार्यकारणभाव ओळखून साधनसंग्रह प्रकाशित करण्याचे कार्य काशिनाथ साने यांनी केले; विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि इतर दोघातिघा मित्रांच्या सहकार्याने त्यांनी हे जे कार्य केले, त्यामुळेच राजवाडे यांच्या मनात त्यांच्या नकळत पुढील कार्याचे बीजारोपण झाले.

-आनंद हर्डीकर