आनंद हर्डीकर
विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘इतिहास’ या निबंधाप्रमाणेच ‘इंग्रेजी भाषा’ या शीर्षकाखालील निबंधातही त्या भाषेचा इतिहास सांगण्याच्या आविर्भावात अनेक इंग्रज लेखकांनी देशी इतिहासाबद्दल केलेल्या पूर्वग्रहदूषित मतांचे साधार, सविस्तर खंडन केले होते. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली. मेजर जेकब यांनी ‘एलिफास’ या टोपणनावाने ‘बाँबे गॅझेट’मध्ये दीर्घ पत्र लिहून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनातील चार उताऱ्यांचे भाषांतर उद्धृत केले. ‘देशी वृत्तपत्रे व कारस्थानी ब्राह्मण’ या शीर्षकाखालील ते पत्र म्हणजे ‘निबंधमाले’च्या लेखकाला राजद्रोही ठरवण्याचाच प्रयत्न होता. मेजरमहाशयांनी नंतर एका सबंध अंकातील मजकुराचे इंग्रजी भाषांतर सरकारकडे पाठवले. शिक्षण खात्यापासून सचिवालयापर्यंतची सगळी नोकरशाही पार हादरून गेली. त्या अस्वस्थतेतूनच पुढे १८७८ सालचा मुद्रणनियंत्रणाचा जाचक कायदा अत्यंत कठोरपणे अमलात आणायचा निर्णय घेण्यात आला.
‘माले’सारखे माध्यम हातून काढून घेतले जाऊ नये म्हणून विष्णुशास्त्र्यांनी थोडा सावध पवित्रा घेतला, ‘डॉक्टर जॉनसन’ या निरुपद्रवी विषयावरचा दीर्घ निबंध पुढच्या काही अंकांमधून त्यांनी प्रकाशित केला. लोकजागृतीचे कार्य व्यापक प्रमाणावर सुरू करता यावे म्हणून अन्य प्रयत्न आरंभले.
नोकरीचा राजीनामा देताच १८७९ मध्ये त्यांनी ‘किरण’ छापखान्याचे सामान विकत घेतले. ‘अध्ययन, अध्यापन व ग्रंथरचना या तीन उद्योगांत आम्ही काळ घालवणार’, असे त्यांनी वाचकांशी हितगुज करताना म्हटले होते; तथापि वृत्तपत्रे वाचण्याचाच त्यांना पूर्वीपासून कंटाळा असल्यामुळे एखादे वृत्तपत्र सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत नव्हता. परंतु शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना योगायोगाने येऊन मिळालेले बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे तरुण सहकारी वृत्तपत्रे काढायला उत्सुक आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. मग विष्णुशास्त्र्यानी ‘किरण’ छापखाना सहकाऱ्याच्या स्वाधीन केला. ‘आर्यभूषण’ या नावाने त्याची पुनर्रचना केली जाऊन तेथून ‘केसरी’ व ‘मराठा’ ही मराठी-इंग्रजी वृत्तपत्रे जानेवारी १८८१ मध्ये सुरू झाली. विष्णुशास्त्र्यांनी ‘केसरी’ चालवण्याची जबाबदारी आगरकरांच्या बरोबरीने उचलली.
यापूर्वीच विष्णुशास्त्र्यांनी काशीनाथ नारायण साने आणि जनार्दन बाळाजी मोडक या दोन वर्गमित्रांच्या मदतीने ‘काव्येतिहाससंग्रह’ या नावाचे एक आगळेवेगळे नियतकालिक सुरू करण्याचाही घाट घातला होता. मे १८७७ मध्येच त्या तीन मित्रांमध्ये चर्चा होऊन जबाबदाऱ्यांचे वाटप झाले होते. जुन्या ऐतिहासिक बखरींविषयीचा भाग साने यांनी पाहायचा, मराठी कवितांचा विभाग मोडकांनी तर संस्कृत ग्रंथांबद्दलचा विभाग विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सांभाळायचा, असे ठरले होते. शिवाय विष्णुशास्त्र्यांचे एक तरुण चाहते शंकर तुकाराम शाळिग्राम यांच्याकडेही ऐतिहासिक वाङ्मयाचे संशोधन व संकलन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
या सर्वांच्या प्रयत्नांतून जानेवारी १८७८ मध्ये म्हणजे विष्णुशास्त्री रत्नागिरीला नोकरीवर रुजू झाले, त्याच महिन्यात ‘काव्येतिहाससंग्रहा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. शाळा खात्यातील अधिकाऱ्यांचा आपल्या ‘निबंधमाले’वर किती रोष आहे, याची पुरती कल्पना असल्यामुळे विष्णुशास्त्र्यांनी या नव्या मासिकावर आपले नाव घातले नाही. हे मासिक १८८९ पर्यंत चालले. तेवढ्या कालावधीत मराठी समाजात इतिहासाबद्दलचे प्रेम निर्माण करण्याचे आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी एतद्देशीयांत पोसलेला न्यूनगंड दूर करण्याचे काम या नियतकालिकाने पार पाडले होते. काशिनाथ साने यांनी परिश्रमपूर्वक निरनिराळ्या ठिकाणांहून कागदपत्रे मिळवली होती, ती वाचून त्यातल्या अपरिचित कठीण शब्दांचा अर्थ तसेच संदर्भविषयक टिपा देण्याचे कामही त्यांनी चिकाटीने पार पाडले होते. राजवाडे यांनी इंग्रजीच्या अतिरेकी प्रभावाच्या संकटापासून त्यांना ‘वाचवणाऱ्या त्रिमूर्ती’मध्ये साने यांचा समावेश केला होता, तो त्यांच्या या कामामुळेच.
(या लेखांकातील मजकूर ग. त्र्यं. माडखोलकर लिखित ‘चिपळूणकर काल आणि कर्तृत्व’ (चौथी आवृत्ती, १९५४) मधील पृ. २८२२८३ मधील मजकुरावर आधारित आहे.)
anand47.hardikar@gmail.com

