आनंद हर्डीकर
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी करून ठेवलेल्या प्रचंड लेखनामधून संग्रहासाठी लेख निवडण्याचे काम खूप कठीण होते. ते जसे ‘इतिहासाचार्य’ होते, तसेच ते ‘पुरातत्त्वभूषण’ही होते. ते भाषाविदही होते, वैयाकरणीसुद्धा होते. आपल्या लेखनामुळे त्यांनी वादळांना आमंत्रणे दिली होती. गावोगाव, प्रांतोप्रांती वणवण भटकून, परिश्रमपूर्वक संकलित केलेली मराठ्यांच्या इतिहासाविषयीची साधने संपादित आणि प्रकाशितही करण्याचे डोंगराएवढे काम त्यांनी पार पाडले होते. शिवाय त्या बहुतेक खंडांना विस्तीर्ण प्रस्तावनाही लिहून कर्तबगारीची शिखरे सर केली होती. त्यामुळे अशा लेखसंभारामधून मोजकेच लेख निवडण्याचे काम आव्हानात्मक होते.
तथापि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते आव्हान लीलया पेलले. निवडीचे काही निकष ठरवले आणि राजवाड्यांच्या एकूण तपस्वी कारकीर्दीची आगळी गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करणारी १६ पानी चिकित्सक प्रस्तावना लिहिली, त्यामध्ये त्या निकषांचे स्पष्टीकरणही दिले. ‘राजवाडे यांची साहित्यिक शैली, ऐतिहासिक तत्त्वमीमांसा व ऐतिहासिक निर्णय यांचा संगम झाला आहे, असेच लेख किंवा निबंधांश येथे घेतले आहेत. काही नवीन सिद्धांत मांडणारे, पण साहित्यगुणाशी संबंध नसलेले ‘पाणिनीकालनिर्णय’, ‘सप्तशती’ वगैरे वैशिष्ट्यपूर्ण निबंधही स्थलसंकोचास्तव वगळावे लागले आहेत’, हे स्पष्ट करून तर्कतीर्थांनी संग्रहामध्ये समाविष्ट झालेल्या २० निबंधांचा एकेका वाक्यात परिचय करून दिला आहे. त्या सगळ्या लेखांमुळे ‘राजवाडे यांच्या ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचे, भारताच्या- विशेषत: महाराष्ट्राच्या- सोपपत्तिक इतिहासाचे सम्यक् दर्शन होईल’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रस्तावनेमध्ये तर्कतीर्थांनी राजवाडे यांच्या चरित्राचा धावता आढावा घेतला आहे. आपण वर्षभरात ते चरित्र तपशीलवार समजून घेणार आहोत आणि या संग्रहामधील बहुतेक लेखांचाही सविस्तर परामर्श घेणार आहोत. त्यामुळे तर्कतीर्थांच्या प्रस्तावनेमधील समीक्षात्मक मुद्द्यांचाच इथे विचार करणे उचित ठरेल.
‘पाश्चात्त्य देशांत गेली दोन-अडीच शतके इतिहासतत्त्वाची जशी शास्त्रोक्त मीमांसा सुरू आहे, तशीच भारतीय संदर्भात करणारा पहिला इतिहाससंशोधक’ या शब्दांमध्ये त्यांनी राजवाडे यांचा गौरव केला आहे.
‘भारताचा, विशेषत: महाराष्ट्राचा शास्त्रशुद्ध इतिहास उपलब्ध होण्याकरता इंग्लिश इतिहासकारांवर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. त्यांनी लिहिलेला इतिहास हा बहुतांशी जेत्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला जितांचा इतिहास असण्याचा संभवच फार. आपला इतिहास शास्त्रशुद्ध, नि:पक्षपाती व पूर्वग्रहशून्य मनाने लिहिला जावा व तो तथ्य(फॅक्ट्स)निष्ठ प्रमाणांवर आधारलेला असावा… अशा इतिहासामुळेच राष्ट्राला आत्मस्मृती लाभेल. म्हणून अशा ऐतिहासिक प्रमाणांची जुळणी करणे हे इतिहासकाराचे प्रथमकर्तव्य आहे; त्याकरता अनेक इतिहासकारांनी जन्मभर तप:साधनाच करणे आवश्यक आहे…’ राजवाडे यांची ही श्रद्धाळू धारणा आपल्या प्रस्तावनेत तर्कतीर्थांनी उद्धृत केली आहे आणि ‘तप:साधनेबद्दलची ती श्रद्धा राजवाडे यांच्या मनात विद्यार्थी असल्यापासून ऐन तारुण्यातच उत्पन्न झाली आणि त्यानंतर त्यांनी १८९५ ते १९२६ या कालखंडात- अगदी अंतकालापर्यंत- आपले सर्व जीवित इतिहासाच्या ज्ञानमय तपातच व्यतीत केले’, असा निर्वाळाही दिला आहे.
परतंत्र देशातील समाजाची पराभूत मानसिकता दूर करण्यासाठी अस्मितेच्या जागृतीची गरज होती, तशीच आधुनिक बुद्धिवादी इतिहासमीमांसेचीदेखील होती. तशी मीमांसा करून भारत पाश्चात्त्यांनी कसा जिंकला आणि आपण त्यांच्यापुढे का पराभूत झालो, हे राजवाडे यांनी तपासून पाहिले. ‘अठराव्या शतकात मराठ्यांची संस्कृती युरोपातील प्रगत देशांच्या संस्कृतीशी तुलना करता कमी दर्जाची होती’, असा परखड निष्कर्ष नोंदवण्याचा संशोधकी बाणेदारपणाही त्यांच्या अंगी मुरलेला होता. हे असे प्रतिपादन राजवाडे करू शकले, कारण इतिहास ही विज्ञानाप्रमाणेच एक ज्ञानशाखा आहे, असे ते मानत होते. पूर्वजांचा वृथा अभिमान बाळगण्याच्या फंदात ते पडले नाहीत, याचा तर्कतीर्थांनी यथोचित गौरव केला आहे.
तथापि इतिहासलेखनाबाबतची राजवाडे यांची सर्वच मते तर्कतीर्थांना मान्य होण्यासारखी नव्हती. राजवाडे यांच्या मांडणीतला अंतर्विरोधही त्यांच्या लक्षात आला होता. त्यांच्या त्या तशा अत्यंत महत्त्वाच्या साक्षेपी विवेचनाचा विचार येत्या सोमवारच्या लेखांकात.
anand47.hardikar@gmail.com
