आनंद हर्डीकर
ऐतिहासिक साधनांच्या नवव्या खंडाला प्रस्तावना न लिहिता राजवाड्यांनी अगदी छोटासा, जेमतेम तीन पानी उपोद्घात लिहिला. त्यातले फक्त दोन मुद्दे आपण आजही विशेषत्वाने दखल घ्यावेत असे. ‘आपल्या या ग्रंथांना छपाईचा खर्च भरून निघण्याइतकेही ग्राहक मिळत नाहीत, ही मुख्य ओरड सर्वस्वी खरी आहे’, असा तक्रारीचा सूर त्यांनी काढला खरा; पण त्या तक्रारीवर मात करण्यासाठी कमी प्रतींचीच छपाई करण्याचा अत्यंत व्यावहारिक ठरणारा उपायही लगेच त्यांनी सुचवला. त्यांनी लिहिले, ‘इतिहासाच्या सामग्रीचे ग्रंथ कोणत्याही देशात हजारोंनी किंवा लाखोंनी खपले आहेत, असा प्रकार माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचण्यात आला नाही. तेव्हा आपला महाराष्ट्रच या महासिद्धान्ताला अपवाद ठरत नाही म्हणून मनाला वृथा शीण करून घेण्यात अर्थ कोणता? सबंध महाराष्ट्रात या ऐतिहासिक साधनांचे भोक्ते जर दोनतीनशेच आहेत, तर तेवढ्यापुरत्याच तीनशे प्रती काढल्या म्हणजे विशेष खर्चाचे होणार नाही…’ एकविसाव्या शतकाच्या तिसर्या दशकातील प्रकाशनव्यावसायिकाला शोभेल असा विचार राजवाड्यांनी सुमारे १२० वर्षांपूर्वीच मांडला होता, हे विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखे आहे.
त्या आणि पुढील एक-दोन खंडांमध्ये थोरल्या शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतली काही पत्रे छापणार असल्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या भावना- ‘आता प्रसिद्ध होत असलेल्या पत्रांत महदानंदाची गोष्ट इतकीच की, शिवाजी महाराजांची काही अस्सल पत्रे प्रथमत: जगापुढे आणण्याचे श्रेय या आपल्या पिढीला मिळते आहे. आजपर्यंत शिवछत्रपतींची दोन-तीन पत्रेच काय ती छापली गेली होती. बखरींतून व मुसलमानी तवारिखांतून दिलेले शिवाजीचे चरित्र पडताळून पाहण्यास काहीच साधन नव्हते… श्रीमंत बावडेकर यांच्या दफ्तरातील पत्रांवरून व इतरत्र मिळालेल्या लेखांवरून हे साधन आता – संपूर्ण किंवा समाधानकारक नव्हे, परंतु – थोडेबहुत सिद्ध होण्याच्या रंगास आले आहे… ज्या काळी महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाला प्रारंभ झाला, शिवस्वरूपी प्रौढप्रतापदिनकराच्या तेजाने हा देश देदीप्यमान झाला, त्या काळच्या पत्रव्यवहाराचा परिचय मोठ्या पूज्यभावाने केला पाहिजे. मनुष्याच्या इतिहासात अत्यंत जुने ग्रंथ म्हटले म्हणजे वेद होत. त्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाचे अत्यंत जुने व महत्त्वाचे दाखले म्हटले म्हणजे प्रस्तुतचे लेख आहेत. या लेखांसंबंधी जे काही लिहावयाचे, ते अत्यंत दक्षतेने व जपून करणे जरूर आहे…’ सर्वकाळ मोलाचा ठरणारा असाच हा सल्ला राजवाड्यांनी त्या उपोद्घातामध्ये दिला होता.
दहाव्या खंडाच्या अवघ्या आठ पानी प्रस्तावनेमध्ये राजवाड्यांनी एच. एस. रिस्ले या इंग्रज मानववंशशास्त्रज्ञाच्या बदलत्या मतांचा फोलपणा परखड शब्दांमध्ये उघडकीस आणला होता. ‘रजपूत व जाट लोक अहिंदू अशा शक व तुरुष्क लोकांपैकी हिंदू झालेल्यांपासून जन्मले असल्याचा विपरीत सिद्धांत गेली पन्नासपाऊणशे वर्षे बहुतेक सर्व इंग्रज व युरोपीय लोक ठोकून देत. तथापि ‘इंपीरिअल गॅझेटिअर ऑफ इंडिया’च्या पहिल्या खंडातील ‘एथ्नॉलॉजी ॲण्ड कास्ट’ या प्रकरणात रिस्ले यांनी तो सिद्धान्त परस्परविरोधी व भ्रममूलक आहे, असे म्हटले आहे. हे सर रिस्ले मानववंशशास्त्राचे मोठे ज्ञाते आहेत, असे हिंदुस्थान सरकार समजते. त्याच सरकारच्या आज्ञेवरून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातच रजपुतांचे शाकवंशीयत्व अशास्त्रीय व असत्य ठरवलेले आहे… या कवडीमोल दुष्ट ग्रहाने रजपूत हेे शाक आहेत, अशी कंडी पिकवून अनेक अर्धवट लोकांना माकडचेष्टा करावयास लावल्या. आता रजपुतांवरची संक्रांत उठवून ती मराठ्यांवर बसली आहे. महाराष्ट्रातील मराठे आर्य नाहीत, असा रिस्लेंचा नवीन शोध आहे. त्यांना आमचा असा सवाल आहे की, रजपूत शाक नाहीत, हे ठरवण्याला जी प्रमाणे नमूद केली आहेत, तीच प्रमाणे मराठेही शाक नाहीत, हे ठरवण्याला समर्पक आहेत, हे लक्षात कसे आले नाही? त्यांचे तर्कशास्त्र इथे सपशेल तोंडघशी पडले आहे!’ असे राजवाड्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.
- anand47.hardikar@gmail.com
