आनंद हर्डीकर
वि. का. राजवाडे यांचा जन्म आजोळी, कोकणातल्या वरसई गावात झाला. त्यांना वैजनाथ नावाचा त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा भाऊ होता. विश्वनाथ चार वर्षांचा असतानाच काशिनाथपंत मरण पावले, त्यामुळे यमुनाबाई राजवाडे दोन्ही मुलांना घेऊन काही दिवस माहेरी जाऊन राहिल्या. काशिनाथपंतांचे थोरले भाऊ जगन्नाथ बापूजी राजवाडे पुणे जिल्ह्यातल्या वडगावात राहत होते, त्यांचाही वकिलीचा व्यवसाय होता. तिकडेसुद्धा यमुनाबाईंनी काही काळ काढला. शेवटी त्या पुण्यात शनिवारवाड्याच्या फुटक्या बुरुजाजवळ रामभाऊ जोगळेकरांच्या वाड्यात भाड्याने जागा घेऊन राहू लागल्या.
काशिनाथपंतांनी बऱ्यापैकी पैसाअडका मागे शिल्लक ठेवला होता. शिवाय आसपासची स्वस्ताई टुकीने संचार चालवायचे बळ देण्यासाठी पुरेशी होती. लहानपणी विश्वनाथ दिसायचा चांगलाच तरतरीत. मूळचा गौरवर्ण, त्यात वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत आईच्या दुधावर पोषण झालेले. आजीचा, आईचा तर तो लाडका होताच; पण शेजारीपाजारीही त्याचे लाड करत असल्यामुळे बालपण सुखात गेले. नदीवर पोहायला जाणे, झाडांवर चढणे, गावभर भटकणे त्याला आवडत असे. मोरोबादादांच्या वाड्यात एक हिरवा हौद होता. त्यात शंभर वेळा उड्या मारून विश्वनाथने एकदा पहिले पारितोषिकही पटकावले होते. तथापि त्याचा स्वभाव सरळ, साधा नव्हता. इतरांच्या कुरापती काढण्यात, मारामाऱ्या करण्यात तो सदैव पुढे असे. अनेकदा मोठ्या भावाला मध्ये पडून मारामाऱ्या सोडवाव्या लागत. आईला उलटी उत्तरे देऊन तिला चिडवण्यात त्याला समाधान मिळत असे. कधी कधी अतिरेक झाला की आई नाइलाजाने काठीने बडवून काढीत असे. त्यामुळे विश्वनाथच्या मनात आईबद्दल जी अढी बसली, ती कायमचीच. यमुनाबाईंनी तर विश्वनाथचे नाव बदलून ‘आग्या वेताळ’ असे ठेवले होते.
विश्वनाथचा लहानपणचा स्वभाव म्हणजे एक चमत्कारिक गूढ होते. तो जात्या दुष्ट नव्हता. दारावर आलेल्या एका भिक्षेकरीला त्याने अंगावरची दुलई देऊन टाकली होती. शेजारच्या वाड्यात राहणाऱ्या अबू नावाच्या म्हाताऱ्या गृहस्थांची शेवटच्या आजारात विश्वनाथने अशी मन लावून सेवा केली होती की, आसपासचे लोकही आश्चर्यचकित झाले होते. पण जन्मदात्या आईशी मात्र तो तिरसटपणानेच वागत राहिला.
विश्वनाथच्या शिक्षणाबाबतही फारसे काही समाधानकारक घडले नाही. आठव्या वर्षी त्याने धुळाक्षरे शिकायला सुरुवात केली. पुढे तीन वर्षे मराठी चौथ्या इयत्तेपर्यंतचे त्याचे शिक्षण दोनचार खेडेगावांमधल्या व शहरातल्या शाळांमध्ये मिळून झाले. त्या तीन वर्षांपैकी जेमतेम दीड वर्षच तो शाळेत गेला आणि तेवढ्यात थोडेफार मराठी आणि केरोपंतांचे अंकगणित एवढेच काय तो शिकला. भूगोल, इतिहास, व्याकरण, काव्य वगैरे विषयांतले कसलेही ज्ञान त्याला झाले नाही. एकही पंतोजी नीट शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारा भेटला नाही; सगळे पंतोजी एकजात आडमुठे आणि पोटभरू होते.
चौथ्या इयत्तेनंतर विश्वनाथची मराठी शाळा सुटली आणि त्याचे नाव इंग्रजी शाळेत घातले गेले. त्या शाळेचा लौकिक कधीकाळी चांगला असला, तरी त्या वेळी मात्र दर्जा पार घसरला होता. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत भरणाऱ्या त्या शाळेत चांगली तीनचारशे मुले होती, पण बसण्याची जागा भिकार होती, ज्या वर्गात विश्वनाथची बसायची व्यवस्था केली होती, तो ओलसर, दमट, अंधूक आणि घाणेरडा होता. शिवाय वर्गात चार तुकड्यांमधली पन्नाससाठ मुले कोंबली होती आणि त्या सर्वांना शिकवायला एकच मास्तर होते.
या कंटाळवाण्या स्थितीतून विश्वनाथची सहासात महिन्यांनी सुटका झाली. ती कशी झाली, हे पुढील लेखांकात…
– आनंद हर्डीकर, anand47.hardikar@gmail.com
