विश्वनाथ राजवाडे यांना पोतदारांच्या घरी भेटायला येणारे विष्णू विजापूरकर हे त्यांचे डेक्कन कॉलेजपासूनचे समवयस्क मित्र अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. ते महाविद्यालयात दाखल झाले होते राजवाड्यांच्या नंतर, पण पदवीधर झाले त्यांच्या आधी. राजवाड्यांचे शिक्षणापेक्षा विद्यार्जनाकडे जास्त लक्ष होते, शिवाय धरसोड वृत्तीमुळेही त्यांच्या शिक्षणात खंड पडत गेला होता. विजापूरकरांनी मात्र १८८६ ते १८८८ या काळात सलग तीन वर्षे अभ्यास करून, संस्कृत विषयातली बी.ए. ही पदवी संपादन केली होती, तीही विशेष प्रावीण्यासह. एवढेच नव्हे, तर १८९३मध्ये ते एम.ए.सुद्धा झाले.

तथापि राजवाडे हे किती आणि कसे बुद्धिमान आहेत, याची विजापूरकरांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहापासून पोतदारांच्या घरातल्या माळ्यापर्यंत त्या मित्रांमध्ये निरनिराळ्या विषयांवरची बौद्धिक चर्चा रंगत असे. १८९३च्या अखेरच्या महिन्यांमध्ये त्या चर्चेत एक मुख्य मुद्दा होता-मराठीत मासिक सुरू करण्याबद्दलचा. दोघेही विशिष्ट ध्येयवादाने भारलेले होते. समाजात जागृती आणण्यासाठी पाश्चिमात्य लेखकांचे इंग्रजी वाङ्मय भाषांतरित करून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिले पाहिजे, हा विचार त्या दोघांच्याही मनात घोळत होता.

एखादे मासिक सुरू करावे, असा विचार राजवाडे आणि विजापूरकर हे दोघेही आपापल्या परीने पूर्वीपासून करत होते. पुण्यातल्या त्या बैठकांमध्ये जेव्हा राजवाड्यांनी संयुक्तपणे तसे मासिक चालवण्याची कल्पना मांडली, तेव्हा विजापूरकरांनी त्याला मात्र फारशी अनुकूलता दाखवली नाही. मासिकात समाविष्ट करायच्या मजकुराबाबत मतभेद होण्याची शक्यता विजापूरकरांना वाटत होती. त्यावरचा उपाय म्हणून मासिक दुप्पट आकाराचे काढावे, असे राजवाड्यांनी सुचवून पाहिले. पण ती कल्पनाही विजापूरकरांना पटली नाही. ते कोल्हापूरला राहून मासिक काढणार होते, तर राजवाड्यांना पुण्यातून ते सुरू करायचे होते.

शिवाय मासिक सुरू करण्यापूर्वीच ते काढण्याच्या ‘भानगडी’त का पडू नये, हे सांगणारे अनेक स्नेही राजवाड्यांना पदोपदी भेटत होते. ‘धाडस करायला जाल, तर कर्जबाजारी व्हाल!’ असा धोक्याचा इशाराही काहीजणांनी दिला होता. पण भाषांतराच्या कामात सहकार्य करण्याची तयारी असणारे काही मित्रसुद्धा राजवाड्यांना मिळाले. त्यांच्या मनात मासिक सुरू करण्याचा विचार पक्का झाला.

शिवाय ‘असे काही मासिक प्रकाशित केले, तर त्याच्या किमान शंभर प्रती विकत घ्याव्यात’, असा हुकूम बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी त्या संस्थानच्या शिक्षणाधिकार्‍यांना देऊन ठेवला आहे, ही दिलासादायक माहितीदेखील राजवाड्यांना समजली. त्यामुळे ‘पश्चिमेकडे जे निरनिराळ्या शास्त्रांतील अगाध ज्ञान निर्माण होत आहे, अशा तर्‍हेचे स्वतंत्र ज्ञानभांडार निर्माण करण्याची कुवत तूर्त आपणात नसल्यामुळे तूर्त तेच आपण मराठी भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा, काही दिवसांनी योग्य बौद्धिक परिस्थिती निर्माण झाली म्हणजे स्वतंत्र वाङ्मय मराठीत निर्माण होईल’, असा आशावादी दृष्टिकोन ठेवून राजवाडे पुढच्या तयारीला लागले.

विजापूरकरांबरोबरच्या चर्चेतून राजवाड्यांना हे समजले होते की, ते त्यांच्या मासिकाचे नाव ‘ग्रंथमाला’ असे ठेवणार आहेत. राजवाड्यांनी आपल्या मासिकासाठी ठरवले, ‘भाषांतर’ हे साधे, सरळ नाव. मग त्यांनी काही सहकार्‍यांची नावे निश्चित केली. प्रा. वि. त्रिं. चांदोरकर, फर्ग्युसन कॉलेजचे शि. म. परांजपे व भ. के. जोशी आणि डेक्कन कॉलेजचे गो. र. भिडे व सि. ग. भट हे पाचजण नियमितपणे कुठल्या ना कुठल्यातरी महत्त्वाच्या ग्रंथाचे भाषांतर करून द्यायला तयार झाले. त्या सर्वांची नावे राजवाड्यांनी ‘भाषांतर’ मासिकाच्या जाहिरातीत समाविष्ट केली. जानेवारी १८९४ पासून आपल्या संपादकत्वाखाली निघणार्‍या मासिकाची त्यांनी जाहिरात केली होती, ही विशेष नोंद समग्र राजवाडे साहित्याच्या बाराव्या खंडात समाविष्ट एका लेखाच्या तळटिपेमध्ये आढळते. (प्रकाशक : इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन मंडळ, धुळे; पृ.क्र.६६९) त्याच जाहिरातीत ४५६ सदाशिव पेठ, पुणे असा आपला पत्तासुद्धा राजवाड्यांनी नोंदवला होता.

आनंद हर्डीकर