विश्वनाथपंत राजवाडे यांनी मोठ्या आशेने संसार थाटला खरा आणि थोरल्या बंधूंच्या आर्थिक मदतीवरच विसंबून तोपर्यंत चालत आलेल्या आयुष्याची गाडी स्वावलंबनाच्या रुळांवरून धावू लागावी म्हणून शाळेत शिक्षकाची नोकरी धरली खरी, पण १८९१ मध्ये त्यांना झालेला मुलगा जेमतेम दोन महिन्यांतच मरण पावला; त्या दु:खातून सावरतात न सावरतात, तोच पुढच्याच वर्षी त्यांच्यावर दुहेरी आघात झाला. त्यांच्या पत्नीला दुसर्‍या खेपेला अपुर्‍या दिवसांची मुलगी झाली आणि प्रसूतीनंतर त्या मुलीसह बाळंतीणही लगेच मरण पावली.

त्या वेळी विश्वनाथपंतांच्या मनात दुसर्‍या लग्नाचा विचार आला असता, तर ते जमणे फारसे अवघड नव्हते. कुणीही त्यांना दोष दिला नसता. कुणीतरी त्यांना तसे सुचवलेदेखील, पण त्यांनी ठाम नकार दिला. म्हणाले, ‘पुरुष असो अगर स्त्री असो, त्यास दुसरे लग्न नाही. पहिल्या लग्नाचा एक भागीदार नाहीसा झाला की, मागे राहिलेल्या भागीदाराने संन्यस्त वृत्ती धारण करावी आणि होता होईल तेवढी देव व देश यांची सेवा करावी.’  आसक्तीच्या मानसिक आवर्तात सापडून, थोरल्या भावाकडे हट्ट धरून बोहल्यावर चढलेले राजवाडे त्या दु:खद क्षणी २८ वर्षांचे म्हणजे तरुणच होते; पण नियतीने दिलेल्या तीन तडाख्यांनी त्यांच्या मनात विरक्तीची भावना अगदी दुसर्‍या टोकापर्यंत जाऊन पोचली. संसार चालवण्यासाठी अन्नपूर्णाबाईंनी जी काही भांडीकुंडी आणि इतर सामानसुमान जमवले होते, ते ठेवून तरी काय करायचे, असा विचार करून त्यांनी ओळखीच्या एका भटजीला ते सगळे देऊन टाकले. तो अविवाहित होता, हे संसाराचे सगळे सामान मिळाल्यावर मात्र त्याला लग्न करावेसे वाटू लागले. त्याने ती इच्छा राजवाड्यांना सांगितल्यावर त्यांनी त्या भटजीला आणखी आर्थिक मदत दिली, त्याचे लग्नही लावून दिले. त्या भटजीचा संसार चांगला चालला होता, पुढे जेव्हा अचानक पुण्यात प्लेगच्या साथीचे थैमान सुरू झाले, तेव्हा पहिल्याच लाटेत जे अगणित लोक मृत्युमुखी पडले, त्यांच्यात तोही पालापाचोळ्यासारखा भिरकावला गेला.

विसूभाऊंचे वडील काशिनाथपंत वकिली करत. त्यांच्या अकाली निधनाच्या वेळी ज्यांच्याकडून त्यांचे पैसे येणे बाकी होते, त्याबद्दलच्या तपशीलवार नोंदी असणारे कागद त्यांनी तोपर्यंत जपून ठेवले होते. क्वचितप्रसंगी कुणीतरी अशील प्रामाणिक थोडेफार पैसे आणूनही देई, ते राजवाडे घेतही असत. पण विरक्तीच्या त्या भरात त्यांनी ती सर्व कागदपत्रे फाडून फेकून दिली. ते अगदी नि:संग झाले…

 राजवाडे त्या उरल्यासुरल्या सांसारिक पाशातूनही आपणहून मुक्त झाले. राहता राहिली ती त्यांची न्यू इंग्लिश स्कूलमधली नोकरी. तेथेही सारे काही ठीकठाक चालले होते, अशातला भाग नव्हता. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रसाराचा हेतू मनात बाळगून ती शाळा स्थापन केली होती; त्या ध्येयवादाशी प्रामाणिक राहणे त्यांच्या निधनानंतरच्या संचालकांना जमत नव्हते. शास्त्रीबुवांनी दूर ठेवलेल्या इंग्रज शिक्षणाधिकार्‍यांना संतुष्ट करण्याकडे त्यांचा कल दिसत होता. त्यांच्या त्या तशा बोटचेप्या धोरणाबद्दल राजवाडे असमाधानी तर होतेच; पण त्यांच्या फटकळ स्वभावामुळे ते आपले मत उघडपणे बोलूनही दाखवत असत. संचालकांना त्यांची ती शेरेबाजी रुचणे शक्यच नव्हते. इतर काही शिक्षक संचालकांच्या धोरणाबद्दल नाराज होते, पण ते ती फक्त चारचौघा सहकार्‍यातच व्यक्त करत, थेट संचालकांनाही ती समजावी अशा चढ्या आवाजात ते बोलत नसत. राजवाड्यांना मात्र परखड बोलल्याशिवाय चैन पडत नसे.

पण त्यामुळेच त्यांचे संचालकांशी वारंवार खटके उडत. हे मतभेद १८९३ च्या ऑगस्टमध्ये वादविवाद विकोपाला जाईस्तोवर ताणले गेले. ते इतके की, राजवाड्यांनी सरळ नोकरीचा राजीनामाच देऊन टाकला. त्या वेळी नेमके कोणते निमित्त झाले, याचा तपशील जरी उपलब्ध नसला, तरीही त्या विशिष्ट मुद्द्यावरची राजवाड्यांची भूमिका इतकी न्याय्य व रास्त असावी की, त्यांच्याबरोबर शाळेतल्या इतर दहा-बारा शिक्षकांनीही राजीनामे दिले.  अशा रीतीने राजवाडे त्या उरल्यासुरल्या पाशातूनही मुक्त झाले.  प्रश्न होता, तो फक्त त्यांच्या जेवणाखाण्याचा.  पण तो सुटला दुसर्‍या एका ‘अन्नपूर्णे’मुळेच. तो कसा, ते पुढील लेखांकात…

– आनंद हर्डीकर