विथ्या रामराजने ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील पी. टी. उषा यांचा ४२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला, तेव्हा ‘विक्रम मोडण्यासाठीच असतात,’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देऊन उषा यांनी विथ्याचे तोंडभरून कौतुक केले. विथ्याने अंतिम रेषा पार केली त्या वेळी प्रेक्षागारात उपस्थित असलेल्या, सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या पी. टी. उषा यांनी जागेवर उभे राहून विद्यासाठी आनंदाने टाळ्या वाजविल्या. हा क्षण अद्भुत आहे, तो जपून ठेवायला हवा, तो साजराही करायला हवा. जो विक्रम मोडायला चार दशके म्हणजे जवळपास दोन पिढ्या जाव्या लागल्या, त्याचे मोल नेमके काय, हे जाणून घ्यायचे असेल, तर या क्षणाचे ‘डी-कोडिंग’ करावे लागेल. तरच विथ्याला या शर्यतीत कांस्यपदक मिळाले असले, तरी भारतीय ॲथलेटिक्ससाठी हा सुवर्णक्षण का आहे, हे समजू शकेल. अर्थात, त्या क्षणात एक जबाबदारीही सामावलेली आहे, ती पेलण्याचे काम आता क्रीडाधुरिणांचे आहे.

आधी पटकन ४२ वर्षे मागे जाऊन येऊ. लॉस एंजल्स ऑलिम्पिक्स १९८४. रोजच्या जगण्यात सेकंदाचे महत्त्व किती, असा प्रश्न विचारला, तर विचार करायलाच काही सेकंद लागतील. धावण्याच्या स्पर्धेत असे चालत नाही. या सेकंदाचे अत्यंत छोटे छोटे भागही हार-जीतचा फैसला करणारे असल्याने या सेकंदाला कोण महत्त्व! सेकंदाचा उशीर सोडा, सेकंदाच्या काही दशांश, शतांश भागाच्या उशिराने अनेकांची स्वप्ने भंगली आहेत. त्यातील भारतीय संदर्भात लगेच आठवणारी दोन महत्त्वाची नावे, म्हणजे मिल्खा सिंग आणि पी. टी. उषा.

रोममध्ये १९६० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत मिल्खा सिंग यांचे कांस्यपदक हुकले, त्याचा सल अजूनही क्रीडाप्रेमींना जाणवतो. मिल्खा सिंग यांच्यावर एक पूर्ण लांबीचा चित्रपट येऊन गेला, पण त्यांचे नाव काढले, की अजूनही रोममधील तीच शर्यत आठवते. त्याचे कारणही तसेच. मिल्खा सिंग या शर्यतीत बराच काळ पुढे होते, नंतर थोडे मागे पडले आणि अंतिम रेषा पार करताना तिसर्‍या क्रमांकाच्या स्पर्धकापासूनचे किती फरकाने मागे राहिले? तर एक दशांश सेकंदाने! सेकंद म्हणजे ‘थोडक्यात’ असेल, तर या फरकाचे वर्णन ‘अगदी थोडक्यात’ हुकले असे करावे लागेल. तेही पूर्णपणे चपखल आहे, असे नाहीच.

आणि मग २४ वर्षांनी पी. टी. उषा यांचे कांस्यपदक हुकले. ऑलिम्पिकच्या संकेतस्थळावर लॉस एंजल्समध्ये झालेल्या या शर्यतीचा अखेरचा क्षण छायाचित्रात दिसतो. कसा? मोरोक्कोची धावपटू नोवाल अल मुत्तवकिल निर्विवादपणे पहिली, तिच्या थोडी मागे अमेरिकन धावपटू जुडिथ ब्राउन आणि तिला लगटून तीन सावल्या. त्यातील ब्राउनच्या सर्वांत जवळची सावली पी. टी. उषा यांची. त्याच सावलीच्या उंचीत कडेला रोमानियाच्या क्रिस्तियाना कोयुकारूची आणि शेजारी स्वीडनची ॲन लुइ स्कॉग्लुंडची. या तिघींत तिसरी ठरवायची कशी? या ऑलिम्पिकपर्यंत विकसित झालेल्या तंत्राने दूरचित्रवाणीवरील संथ वेगातील चित्रीकरण तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. फोटो फिनिश. त्यामुळे त्यावर हा निर्णय सोपवला गेला. त्यात असे दिसले, की रोमानियाच्या कोयुकारूने शर्यत संपताना डोके पुढे घेतल्याने तिच्या डोक्याच्या काही भागाने इतर दोन स्पर्धकांच्या आधी अंतिम रेषा पार केली आहे! तिची वेळ नोंदली गेली ५५.४१ सेकंद. पाचव्या लेनमधील पी. टी. उषा यांची वेळ ५५.४२ सेकंद आणि स्वीडनच्या धावपटूची वेळ ५५.४३ सेकंद. तिघींत अनुक्रमे एक शतांश सेकंदाचा फरक. रोमानियाच्या कोयुकारूला कांस्यपदक मिळाले, पी. टी. उषा यांचे कांस्यपदक एक शतांश सेकंदाने हुकले.

हे घडले तेव्हा उषा यांनी त्यांच्याही नकळत राष्ट्रीय विक्रम स्थापित केला होता. नुसता राष्ट्रीय विक्रम नाही, तर जागतिक दर्जाचा राष्ट्रीय विक्रम. अशासाठी, की या विक्रमानंतर भारतातील अनेक महिला धावपटूंना ४०० मीटर अडथळ्याची शर्यत मिनिटभराच्या आत पूर्ण करणेही फारसे जमले नाही. अगदी नव्या शतकाची सुरुवात झाल्यापासूनही नाही. उषा यांची गुणवत्ता किती उच्च दर्जाची होती, हे जसे यातून सिद्ध होते, तसे त्यांच्यानंतर त्यांच्या दर्जाच्या धावपटू भारतात घडल्या नाहीत, हेही अधोरेखित होते. विथ्या रामराजने ४२ वर्षांनंतर उषा यांचा विक्रम मोडल्याचे अप्रूप म्हणून जास्त आहे. अर्थात, हा केवळ साजरा करण्याचा क्षण नाही, तर भारतीय क्रीडा क्षेत्राला मिळालेली आत्मचिंतनाची संधीही आहे. ती का, हेही नीट समजून घ्यायला हवे.

विथ्या रामराज काही सर्व सुविधा सहज मिळणार्‍या कुठल्या सुखवस्तू कुटुंबात जन्मलेली नाही. तिला एक जुळी बहीण आहे, नित्या. ती १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यत प्रकारातील धावपटू. नित्याही या आशियाई स्पर्धेत सहभागी व्हायची होती. पण, दुखापतीमुळे तिला जाता आले नाही. दोघी एकमेकींना कायमच पाठिंबा देत राहिल्या. आधी नोकरी लागली, म्हणून नित्याने विथ्याची आर्थिक जबाबदारी घेतली. पण, मग विथ्यानेही आपले कांस्यपदक नित्याला समर्पित केले. प्रेमाच्या धागेजुळणीत कधीही शर्यत नसते. हा संस्कार मिळाला घरातून, वडिलांनी घेतलेल्या कष्टांतून. विथ्या आणि नित्याचे वडील ट्रकचालक म्हणून काम करत. जेमतेम दोन वेळच्या जेवणाची तजवीज होईल एवढी कमाई, तिथे इतर सुविधा कुठून मिळणार? पण, वडील असे जिद्दी, की विथ्या आणि तिची जुळी बहीण नित्याला घडविण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. मुलींना योग्य शूज विकत घेण्याकरिता लागणारे पैसे जमवायचे, म्हणून स्वत: अनेक दिवस एक वेळ उपाशी राहिले. मुलींनीही मग जिल्हा पातळीवरील स्पर्धा जिंकत नाव काढले. नंतर क्रीडा वसतिगृहात प्रवेश मिळाला आणि प्रशिक्षणाची सोय झाली. त्यातून मग मजल दरमजल करत विथ्या आणि नित्या पुढे आल्या.

आता पुन्हा पटकन मागे जाऊन १९८४ च्या ऑलिम्पिकमधील हुकलेल्या कांस्यपदकाबद्दल पी. टी. उषा नंतर काही वर्षांनी एका मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या, ते पाहू. ऑलिम्पिकसाठी अमेरिकेत गेल्यावर तेथील आहाराची सवय नसल्याने उषा यांच्या एकूण आहारावर परिणाम झाला होता. केरळहून आणलेले लोणचे आणि फळांच्या काही फोडी, याचाच काय तो आधार. याचा परिणाम होणार होताच. ‘मी शर्यतीत अखेरच्या ३५ मीटर अंतरात आवश्यक तेवढी ऊर्जा राखू शकले नाही,’ असे उषा यांनी मुलाखतीत नमूद केले आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर्वांत तरुण धावपटू म्हणून १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या उषा यांना त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये थोडी अधिक सुविधा मिळाली असती, तर ते अखेरचे ३५ मीटर आणखी वेगाने पार करता आले असते तर पदक मिळाले असते का, असा प्रश्न पडतो. अर्थात, तो आता भूतकाळ झाला. पण, विथ्या आणि नित्यासारख्या गुणी खेळाडूंना खूप संघर्ष करावा लागतो आहे, हा वर्तमानकाळ आहे, हे विसरून कसे चालेल? क्रीडा क्षेत्राला आत्मचिंतन करायचे आहे, ते याचे.

पी. टी. उषा यांनी जेव्हा ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप फरक आहे. उषा यांचे ऑलिम्पिक कांस्यपदक हुकले, तेव्हा विजेती धावपटू आणि उषा यांच्या वेळेतील अंतर जेमतेम एक सेकंद होते. आता विथ्याने उषा यांचा विक्रम मोडलेला असला, तरी या ४२ वर्षांत ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील वेळेत इतकी प्रगती झाली आहे, की अमेरिकेच्या सिडनी मॅकलॉलिनने नोंदविलेली ५०.३७ सेकंद ही सध्या जगातील सर्वोत्तम वेळ आहे. विथ्याने उषा यांचा राष्ट्रीय विक्रम मोडताना नोंदविलेल्या ५४.७५ सेकंद या वेळेपेक्षा तब्बल ४.३८ सेकंदांहून कमी. हे अंतर मिटविण्यासाठी किती काय काय करावे लागेल, याची यातून कल्पना यावी. मुद्दा असा, की हे उद्दिष्ट कोणत्या ऑलिम्पिकपर्यंत गाठणार याची तयारी आपण आतापासून केली, तरच विथ्याचा विक्रम लवकर मोडेल. शर्यतीतील वेळेची अंतरे इतकी वाढत असताना, क्रीडापटूंच्या सुविधांतील अडथळे तरी किमान कमी व्हावेत. ॲथलेटिक्समधील ऑलिम्पिक पदकासाठी सर्वांत मोठी अडथळ्याची शर्यत हीच आहे.