कादंबरीकार विवेक शानबाग यांनी भारतीय भाषांतील साहित्य इंग्रजीत अनुवादित व्हावे यासाठी ‘हायफन’ या नावाचे इंग्रजी अर्धवार्षिक सुरू केले आहे. या नियतकालिकाचा पहिला अंक २७२ पानांचा असून त्यात मराठी साहित्याच्या अनुवादाचा प्रामुख्याने अंतर्भाव दिसतो. त्याशिवाय कन्नड, मल्याळम, काश्मिरी, बंगाली साहित्याचेही भाषांतर आहे. संकेतस्थळावर गेल्यास नियतकालिकाचे अंतरंग उमजेल. अतिशय गांभीर्याने केलेल्या अनुवादाचे मोफत मासले आवर्जून वाचण्यासारखे. अंकाच्या मुखपृष्ठासह एकूणच दर्जा उत्तम राखला असल्याने भारतीय लेखकांना जागतिक पातळीवर पोहोचविण्यात ‘हायफन’ किती उपयोगी ठरते, हे येत्या काळात कळेल.
अंकाचे संकेतस्थळ : https://the-hyphen.in/,
मोफत मजकूर : https://tinyurl.com/2ysa7nv7, https://tinyurl.com/kkfnse9k
अनुवादिकेचे स्वतंत्र लेखन…
डेझी रॉकवेल या अमेरिकी अनुवादिका आपल्याला माहिती झाल्या त्या गीतांजली श्री यांच्या ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ कादंबरीला ‘बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिक मिळाल्यानंतर. पण त्याही आधीपासून त्या हिंदी आणि उर्दू साहित्याचा अनुवाद करत होत्या. भीष्म सहानी यांचे ‘तमस’ त्यांनी २०१६ साली इंग्रजीत भाषांतर केलेले. त्याशिवाय उपेन्द्र अश्क, कृष्णा सोबती, उषा प्रियंवदा यांचे साहित्य त्यांनी इंग्रजीत नेले. पण आता त्यांचे स्वतंत्र लेखनाचे जाडजूड पुस्तक पुढल्या वर्षी येतेय. आपल्या कुुटुंबाबद्दल रॉकवेल यांनी धारदार शब्दांत लिहिलेला एक लेख यानिमित्ताने ‘ग्रॅण्टा’ने उपलब्ध करून दिला आहे.
https://tinyurl.com/2unwas5y
वाचन दुर्मुखलेल्यांसाठी…
आधीपासूनच एकाग्रतेशी वाकडे असलेल्या लोकांना नव्वदीच्या दशकापासून लागलेल्या शोधांनी न वाचण्याचे कारण मिळाले. संगणक, उपग्रह वाहिन्या, स्मार्टफोन, समाजमाध्यमे यांना कामाच्या किंवा बिनकामाच्या निमित्ताने वापरण्यास अधिक वेळ दिला गेला. सध्या माणसांची ‘रिल्शासना’ची दिवसरात्र चालणारी आवर्तने त्यांना पुस्तकांपासून लांब राहण्यास भाग पाडतात. तर नवी पुस्तके विकत घेणारे आणि पुस्तकांविषयी आस्था असणारेदेखील ‘वेळच कसा नाही उरत’च्या बाता एकमेकांना सांगत राहतात. ‘गार्डियन’मध्ये प्रकाशित झालेला गमतीशीर निबंध आठ आठवड्याच्या वाचन कार्यक्रमाचा. त्याचबरोबर ग्रंथवाचनासाठी या काळात केलेल्या आटापिटीचा. वाचनाबाबत सतत सबबी सांगणार्या उपयुक्त ठरेल असा.
https://tinyurl.com/yvwr3du8
https://tinyurl.com/yvwr3du8
