आनंद हर्डीकर
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे वि. का. राजवाडे यांचे एक प्रेरणास्थान होते. त्यांनी चिपळूणकरांच्या ‘निबंधमाले’तला ‘भाषांतर’ हा तीस पानी निबंध वाचला, अभ्यासला असणार, हे उघड आहे. ‘प्राचीन संस्कृतमध्ये भाषांतर हा शब्द आढळत नाही, कारण त्याच्या प्रयोगाचे कधी कारणच पडले नसावे… पुढे संस्कृत मागे पडून प्राकृतचा किंवा बोलभाषांचा प्रचार झाला, तेव्हा कुठे भाषांतर करण्याचा प्रसंग आला. पण त्याला भाषांतर ही संज्ञा नसून ‘छाया’ (म्हणजे प्रतिबिंब या अर्थाने) हे नाव होते’… वगैरे वगैरे माहितीबरोबरच चिपळूणकरांनी भाषांतराच्या एकूण प्रक्रियेबाबतच्या विविध पैलूंचे केलेले विवेचन राजवाडे यांनी लक्षात घेतले असणार. विशेषत: भाषांतरकर्त्यांच्या अडीअडचणींबद्दल त्यांनी केलेले सोदाहरण विवेचन. ‘युरोपचा आद्य महाकवी होमरच्या ‘इलियड’ महाकाव्याची इंग्रजीमध्ये जी दहाबारा भाषांतरे झाली आहेत, त्यात पोप नामक कवीने केलेले भाषांतर विशेेष प्रख्यात आहे. पण ते करताना काय त्रेधा उडाली, ती त्यानेच स्वत: वर्णिली आहे. भाषांतरास हात घालण्यापूर्वीच त्याने आपला बेत वर्तमानपत्रद्वारा जाहीर करून शेकडो बड्या लोकांच्या वर्गण्या घेऊन ठेवल्या. असा संकल्प केला की, दररोज ५० ओळींप्रमाणे सुमारे वर्ष सव्वा वर्षात सगळे २४ सर्ग संपवून टाकायचे. हे सर्व बेत होईपर्यंत ठीक होते, पण जेव्हा भाषांतराला त्याने प्रत्यक्ष आरंभ केला, तेव्हा त्याला कळून आले. चैन पडेनासे झाले, रात्री झोप येईनाशी झाली. पुढे पुढे तर मला कोणी फाशी देईल तर बरे होईल, असे त्याला होऊन गेले… जे काम तो वर्ष सव्वा वर्षात आटपणारा होता, ते रखडता रखडता पाच वर्षे झाली तरी आटपेना. वर्गणीदारांचा पैसा घेऊन अडकला नसता, तर त्याने ते ओझे झुगारूनही दिले असते… इतके करूनही भाषांतर कितपत उतरले?…’ ग्रीक व ल्याटिन भाषेत निपुण अशा एका विख्यात पंडिताने पोपच्या तोंडावरच त्याला सांगितले की, ‘तुमचे भाषांतर म्हणजे मजेशीर टुमदार कविता आहे खरी, पण तीत होमरचे गुण बिलकूल उतरलेेले नाहीत!’… असे चिपळूणकरांनी त्या निबंधात म्हटले होते.
राजवाड्यांनी मराठीत तोपर्यंत रूढ नसलेल्या ‘भाषांतर’ या शब्दाचीच निवड आपल्या नियतकालिकाच्या नावासाठी केली आणि चिपळूणकरांच्या पुढे चार पावले टाकून ते मासिक प्रकाशित करताना सर्व प्रकारची सावधगिरीही घेतली. त्यांनी आपल्या मर्यादा ओळखल्या, वारेमाप आश्वासने दिली नाहीत किंवा अवास्तव दावेदेखील केले नाहीत. एखाद्या बाबतीतले आपले अज्ञान प्रकट करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांचा पारदर्शी प्रामाणिकपणा वाचकांना प्रभावित करणारा ठरला, यात नवल नाही.
प्लेटोचे भाषांतर सादर करताना त्यांनी केलेल्या निवेदनातला काही भाग या दृष्टीने मुद्दाम लक्षात घेण्याजोगा आहे. ‘खरे म्हटले तर मूळ ग्रीक भाषेतून भाषांतर झाले पाहिजे होते; परंतु मला ग्रीक भाषा अवगत नसल्याकारणाने इंग्रजी भाषांतरांचीच कास धरावी लागली. प्लेटोच्या प्रासादिक वाणीचा इंग्रजी दुभाषांनी जो मजपुढे तर्जुमा करून ठेवला, त्यावरच सर्व भिस्त ठेवावी लागल्यामुळे मूळ ग्रीक प्लेटोचे म्हणणे मराठीत मला कितपत उतर(व)ता आले आहे, याविषयी माझी मलाच खात्री नाही. ग्रीक भाषेत संस्कृत व जर्मन भाषांच्याप्रमाणे समासरचना आहे. तेव्हा इंग्रजीसारख्या व्यस्त भाषेत त्या समासांचा उलगडा करतेवेळी जो घोटाळा होत असेल, त्याची कल्पना वाचकांना करता येईल. तथापि इंग्रज भाषांतरकार विद्वान, चिकित्साखोर व शोधक असल्याकारणाने त्यांच्या भाषांतरांवरून केलेल्या भाषांतरात प्लेटोचेच विचार असतील, यात संशय नाही. मराठी वाचकांना ग्रीक प्लेटो इंग्रजी दुर्बिणीतून दाखवण्याचा प्रसंग माझ्यावर आला आहे; खुद्द प्लेटोची भाषासरणी व बारीकसारीक खुब्या मराठी भाषांतरात क्वचितच साधल्या असतील, याची मला जाणीव आहे; परंतु प्लेटोसारख्या महात्म्याला पाहण्यास कितीही दगदग झाली, तरी ती साहसी वाचक सोसतील, हे मी जाणून आहे.’
राजवाड्यांनी असे स्वच्छ निवेदन करतानाच आपण प्लेटोच्या इंग्रजी भाषांतराच्या एकाच पुस्तकावर विसंबून न राहता दोन-चार
पुस्तके परस्परांशी ताडून पाहिल्याचेही नमूद केले होते आणि प्लेटोला अरबीत ‘अल्प्लातून’ व फ्रेंचमध्ये ‘प्लातों’ म्हणतात, यासारखी अधिक माहिती पुरवताना आपला चौकस व्यासंगही सूचित केला होता.
त्यांनी अशी दक्षता घेऊनही ‘भाषांतर’ मासिक १८९७मध्ये बंद पडले. ते का, हे पुढील लेखांकात…
