ऐतिहासिक साधनांच्या विविध खंडांना वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनांचा आढावा घेऊन झाल्यावर आता त्यांच्या इतर काही पुस्तकांच्या प्रस्तावनांची दखल घ्यायची आहे, त्याचप्रमाणे त्यांनी काही विशेष दस्तऐवज प्रसिद्ध करताना त्यांना जोडलेल्या महत्त्वपूर्ण संक्षिप्त टिपणांचीही नोंद करीत पुढे जायचे आहे. त्यांच्या समग्र साहित्याच्या अकराव्या खंडामध्ये त्यांचे एकूण ६१ लेख सात परिशिष्टांसह संकलित करण्यात आले आहेत, त्यांच्यापैकी काहींचा परिचय करून घेणे राजवाड्यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य समजून घेण्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.
शिवरायांना ‘छत्रपती’ ही पदवी केव्हापासून लावीत असत, हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आला आहे आणि ‘अर्थातच १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला, तेव्हापासून’… असे त्याचे उत्तरही स्वाभाविकपणे दिले जात असे. तथापि राजवाड्यांनी ग्रंथमालेमध्ये दोनतीन निबंध लिहून विस्ताराने सिद्ध केले होते की, ‘शके १५७१ मध्ये (इ.स. १६४९ मध्ये) ही पदवी तुकारामाने शिवाजीला लाविली होती व ती यथार्थ लाविली होती.’
आपल्या त्या लेखनाची आठवण करून देऊन राजवाड्यांनी ‘छत्रपति’ या शीर्षकाच्या एका छोटेखानी लेखात पुढे म्हटले, ‘कित्येकांचा असा आग्रह पडला की, ज्या अभंगांत तुकारामाने शिवाजीला छत्रपति हे विशेषण लावले आहे, ते अभंग तुकारामाचे नसून दुसर्या कोण्या आधुनिक कवीचे आहेत. का, तर त्यात छत्रपति हा शब्द आला आहे आणि हा शब्द शिवाजीच्या नावापुढे शक १५९६ नंतर म्हणजे राज्याभिषेकानंतर लावू लागले. तात्पर्य, ग्रांट डफच्या पुढे तुकारामाला हे लोक कमी विश्वास्य (=विश्वासार्ह) समजू लागले.
स्वदेशीयांचे म्हणणे परदेशीयांच्या म्हणण्यापेक्षा कमी विश्वास्य मानावयाचे, असा दुष्ट ग्रह करून घेण्याची घाणेरडी सवय परकीय शिक्षणाने ह्य लोकांच्या आंगवळणी कायमची पडलेली दिसते.’ परंतु अशा लोकांपुढे हार मानतील, तर ते राजवाडे कसले! त्यांनी नामी उपाय शोधला. त्याबद्दलची माहिती देताना त्यांनी लिहिले, ‘ह्य परप्रत्यनेयबुद्धि इसमांची ही दुष्ट सवय काढून टाकण्यास एकच उपाय आहे. तो हा की, अस्सल कागदपत्रांचे झणझणीत अंजन त्यांच्या डोळ्यांत घालणे. असे एक अंजन सध्या मजजवळ आहे.
नागोठण्याजवळ पाली नावाचे गाव आहे. तेथील कुळकरणी, संभाजी बाजीप्रभु यांचे वंशज आहेत. ते तेथील कुळकरण गेली तीन-साडेतीनशे वर्षे करीत आहेत. त्यांच्याकडील कागदपत्र तपासताना शक १५६९-१५७०मधील एक दस्तऐवज मला सापडला. त्याची अस्सल नक्कल सोबत जोडली आहे…’ आणि त्यानंतर पुढे त्या दस्तऐेवजाबद्दलचा खुलासा करताना राजवाड्यांनी म्हटले, ‘हा दस्तऐवज समान अबैंन अलफ सालाकरता त्या सालाअगोदर महिना दोन महिने पालीच्या कुळकरण्याने सरकारात -शिवाजीच्या सरकारात – दाखल करण्याकरता तयार केला आहे. ज्याला सध्या बजेट ऊर्फ बेहेडा म्हणतात, तो हा दस्तऐवज आहे.
पुढील साली पाली ऊर्फ सरसगड या किल्ल्याला भोवतालच्या गावांनी किती तलब पोहोचवावी, तिचा हा तपशील आहे. समान अबैंन सलफ साल शक १५६९ संवत्सराच्या ज्येष्ठात मृगाला म्हणजेच (इसवीसन) १६४७ मे महिन्यामध्ये सुरू झाले. त्याच्यापूर्वी दोन महिने मार्च १६४७ च्या सुमारास हा तलबखर्डा तयार झाला. १६४६मध्ये शिवाजीने कल्याण-भिवंडी प्रांत घेतला, त्याच सुमाराला त्याने पाली प्रांतही काबीज केला. मग तेथील जमाबंदी व इतर बाबी शिवाजीच्या नावाने सुरू झाल्या. कुळकरणी वगैरे आपल्या कीर्दीत शिवाजीच्या नावाचा उल्लेख करू लागले.
‘कारकीर्दी माहाराज छत्रपति शिवाजी राजे’ म्हणजे ‘माहाराज छत्रपति शिवाजी राजे यांची कारकीर्द’ असा उल्लेख होऊ लागला…’ आणि हा अस्सल दस्तऐवजी पुरावा मांडून राजवाड्यांनी पुढे निर्णायक शब्दांत लिहिले, ‘१६४६मध्ये जर शिवाजीला ‘छत्रपति’ ही पदवी सरकारी कागदोपत्री राजरोस लावीत असत, तर पुढे तीन वर्षांनी रचलेल्या तुकारामाच्या अभंगांतही ती आढळणे सर्वथैव वाजवी आहे. ह्यचाच अर्थ, छत्रपति शब्द असणारे सर्व अभंग तुकारामाचेच अस्सल आहेत!’
anand47.hardikar@gmail.com
