ऐतिहासिक साधनांच्या सहाव्या खंडाला राजवाड्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेतल्या काही प्रमुख मुद्द्यांचा आपण अगदी थोडक्यात परिचय करून घेतला. त्या प्रस्तावनेबद्दलच्या विवेचनाचा समारोप करताना त्यांनीच उघड केलेल्या त्यांच्या कर्जबाजारी अवस्थेबद्दल आणि त्याही अवस्थेमध्ये त्यांच्या मनात घोळत असलेल्या भावी कार्याच्या रूपरेषेबद्दल थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे.
राजवाड्यांनी त्या प्रस्तावनेच्या शेवटी शेवटी आपल्या तोपर्यंतच्या कामाचा संक्षिप्त जमाखर्च वाचकांसमोर प्रामाणिकपणे ठेवला. पहिला खंड एकूण तीन वेळा छापला गेला, त्याबद्दलची तपशीलवार माहिती यापूर्वीच देऊन झाली आहे. ती सांगून झाल्यावर राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘चौथा खंड चित्रशाळेचे मालक वासुदेवराव जोशी यांनी आपल्या जबाबदारीवर प्रसिद्ध केला. दुसरा, तिसरा, पाचवा, सहावा (व आठवाही) असे पाच खंड प्रो. विजापूरकर यांनी ग्रंथमालेतून स्वत:च्या खर्चाने छापून काढले. पैकी ग्रंथकाराच्या मेहनतीचा अल्पस्वल्प मोबदला म्हणून ग्रंथमालाकार प्रत्येक खंडाच्या पन्नास प्रती मला देतात. त्या विकून शोधनाचा व प्रवासाचा खर्च मी मोठ्या काटकसरीने करतो. या पुस्तकविक्रीपासून आतापर्यंत सरासरी सहाशे रुपये प्राप्ती मला झालेली आहे.
या अवधीत सुमारे ५०० रुपये श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर, पांडोबा शिराळकर, रावजी भिडे या तिघांनी आपखुशीने उदारपणे दिले. शिवाय दोघा-तिघा स्नेह्यांकडून प्रवासाकरिता सहाशे रुपये मी कर्ज काढले. मिळून आजपर्यंत स्वत:च्या खर्चाने व लोकांच्या देणग्यांनी मी सुमारे ३६०० रुपये या कामी खर्चिले आहेत. पैकी देण्याचे व पुस्तकविक्रीचे २१०० रुपये वजा जाता सध्या मला १५०० कर्ज आहे. ते पुढील खंडांच्या विक्रीने फेडावयाचे आहे… माझे धनको माझ्यावर प्रेम करीत असल्यामुळे त्यांच्या अडचणींच्या प्रसंगीही त्यांनी मला फारशी कधी निकड लाविली नाही, हे खरे आहे; परंतु कर्ज आहे, ही कठोर बाब विसरता येत नाही.’
त्यानंतरच्या परिच्छेदात आपल्याच कार्याचा आढावा घेत राजवाड्यांनी लिहिले, ‘वेगवेगळ्या रूपांत आजपर्यंत मी सुमारे ४४०० पृष्ठांचा नवा मजकूर शोधून विवेचनासह प्रसिद्ध केला आहे. या स्तुत्य उठाठेवीत १५०० रुपयांचे कर्ज म्हणजे नुकसान झालेले आहे. (गंमत म्हणजे हा सर्व बारीक-सारीक तपशील बिनचूक नोंदवणार्या राजवाड्यांनी आपण खर्चलेले ३६०० रुपये व विजापूरकर-जोशी यांनी छापलेल्या खंडांसाठी खर्च झालेले २४०० रुपये अशा दोन रकमांची बेरीज मात्र चुकवलेली दिसते. तिचा उल्लेख त्यांनी सर्वत्र ६००० ऐवजी ५००० रुपये असाच केलेला आढळतो.
समग्र राजवाडे साहित्य, खंड १०, पृष्ठ क्र. ३४२) जर एवढेसे काम करावयाला १५०० रुपये कर्ज झाले, तर शंभरपट काम अद्याप व्हावयाचे आहे, त्याला सुमारे दीड लाख रुपये कर्ज होईल व पाच लाख रुपये खर्च लागेल, कारण सध्या मजजवळ हजार बाराशे अप्रकाशित ग्रंथ व सुमारे ४०-५० हजार महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे जमा झालेली आहेत. त्यापैकी बराच भाग प्रसिद्ध होणे अगत्याचे आहे…’
राजवाडे केवळ ही इच्छा व्यक्त करून थांबले नाहीत, त्यांनी मराठ्यांच्या इतिहाससाधनांच्या संशोधन-प्रकाशनकार्याबद्दलचे आपले मनोराज्यही वाचकांसमोर ठेवले. त्यांनी लिहिले, ‘ती साधने शोधून काढावयास प्रथमारंभी निदान दहा तज्ज्ञ गृहस्थ लावले, तर प्रत्येकी अन्नखर्च व प्रवासखर्च मिळून वर्षाला ६०० रुपये धरल्यास ६०,००० रुपये पाहिजेत.
शोधून आणलेल्या साधनांचा संग्रह करण्यास इमारत पाहिजे. तिचा खर्च सुमारे १०,००० रुपये. दरवर्षाला १०,००० अष्टपत्री पृष्ठे ऐतिहासिक अस्सल साधने प्रकाशित करण्यासाठी १०,००० रुपये लागतील. इमारत व साधनसंग्रह यांच्या व्यवस्थेसाठी एका कारकुनाचा व एका हमालाचा वार्षिक पगार (१५ व १० रुपये दरमहाप्रमाणे) ३०० रुपये आणि दिवा, बत्ती, कागद वगैरे खर्च ५०० रुपये… चालक मंडळींनी व तज्ज्ञांनी साधने निवडण्याचे, संपादण्याचे व प्रकाशनार्थ तयार करण्याचे काम फुकट करावयाचे आहे… हा सर्व अंदाज स्थूल आहे. अभिमानी मंडळींच्या सल्ल्याप्रमाणे यात योग्य फेरफार करणे जरूर पडेल…’
anand47.hardikar@gmail.com
