राजवाडे वाईहून पुण्यात आले आणि त्यांनी गेले दोनअडीच महिने रात्रंदिवस खपून ऐतिहासिक कागदपत्रांची जी संहिता तयार केली होती, ती अक्षरजुळणीसाठी श्री विठ्ठल छापखान्यात नेऊन दिली. ‘जुने ऐतिहासिक लेख शास्त्रशुद्ध पद्धतीने छापावयाचे म्हटले म्हणजे चार-चार, पाच-पाच वेळा कच्ची मुद्रिते तपासली पाहिजेत’, ही संपादकीय शिस्त राजवाड्यांनी स्वत:च ठरवून घेतली होती, त्यामुळे त्या छापखान्यातले कामगार जरी थोडेफार कंटाळले, तरी ते स्वत: थकत नसत. शिवाय छापखान्यातलेे हे काम सुरू असताना त्या ग्रंथाच्या एकंदर खर्चाची चिंता त्यांना लागलेली होतीच.

‘इतिहासाची गोडी महाराष्ट्रात दोनतीनशे वर्षांपासूनची आहे व त्याची साधने प्रकाशित करण्यापासून काही फायदा आहे, असे मत अलीकडे सार्वत्रिक होऊ लागले आहे. तथापि प्रकाशनासाठी करावा लागणारा खर्च सोसायला मात्र जेवढे लोक तयार व्हायला पाहिजेत, तेवढे होत नाहीत. ऐतिहासिक पुस्तकांच्या व मासिकांच्या तुटपुंज्या खपावरून हेच म्हणावे लागते. पण ही बाब सामान्य लोकांची झाली. असामान्य लोक म्हणजे शिक्षणाच्या अत्युच्च शिखराप्रत जाऊन पोचलेले लोक पाहावेत, तर तेही लेखप्रकाशनाला काही मदत करताना दिसत नाहीत. सामान्य लोकांत शंभर वर्गणीदार मिळाले, तर ह्या असामान्य लोकांत एकही मिळण्याची मारामार पडते. खरे म्हणजे अशिक्षित लंगोट्यांची आणि सुशिक्षित पाटलोण्यांची योग्यता बहुतेक सारखीच आहे…’ राजवाड्यांनी हे विचार लेखी स्वरूपात पुढे मांडले असले, तरी तो प्रारंभीचा ग्रंथ तयार करतानाही त्यांच्या मनात हेच विचार घोळत असावेत.

‘अत्यंत अशिक्षित आणि अत्यंत सुशिक्षित अशा या निरुपयोगी लोकांना सोडून दिले की, बाकी राहिलेला आमच्यासारखा सामान्य लोकांचा जो वर्ग आहे, तोच या कामाला उपयोगी पडला तर पडेल. आत्तापर्यंत जे काही प्रकाशनाचे काम झाले, ते याच लोकांच्या सहानुभूतीने व आश्रयाने झाले आहे आणि पुढे व्हावयाचे, तेही त्यांच्याच मदतीने होईल, अशी उमेद आहे. मात्र या लोकांपुढे आपली फिर्याद व्यवस्थित मांडली पाहिजे. राष्ट्ररचनेत इतिहासाची कामगिरी काय व त्याच्या साधनांचे कार्य कोणते, इतिहासाचे खरे स्वरूप काय, सध्या आपल्या देशात तो कोणत्या रूपात दाखवला जातो व वस्तुत: तो कसा दाखवणे आवश्यक आहे, हे या सारासार विचारी पंचांना योग्य पद्धतीने सांगितले पाहिजे’, असेसुद्धा राजवाड्यांना जाणवले आणि संकलित केलेल्या ऐतिहासिक साधनांच्या या ग्रंथाला सविस्तर प्रस्तावना लिहिण्याचा त्यांनी निर्णय घेतला. छापखान्यातले काम सांभाळून त्यांनी तशी प्रस्तावना लिहिली. ती लिहिताना हात आखडता घेतला नाही, वाढत्या पृष्ठसंख्येची काळजी न करता मनात होते ते सर्व मुद्दे समाविष्ट झाले आहेत, अशी खातरजमा झाल्यावरच ते थांबले.

त्या प्रदीर्घ प्रस्तावनेसह संपूर्ण ग्रंथाची अक्षरजुळणी पूर्ण झाली, छपाई झाली आणि बांधणी होऊन आता राजवाडे ग्रंथाचे प्रकाशन करण्याच्या विचारात असतानाच त्यांना धक्कादायक बातमी समजली. त्यांच्या परिश्रमपूर्वक तयार झालेल्या ग्रंथाच्या प्रती ज्या श्री विठ्ठल छापखान्यात ठेवल्या होत्या, त्या छापखान्याला आग लागली असून तो बेचिराख झाला आहे, अशी बातमी ऐकून राजवाड्यांवर आभाळच कोसळले. त्यांनी तिकडे धाव घेतली, पण सारे काही भस्मसात झाल्याचे दृश्यच त्यांना पाहावे लागले. तो छापखाना आतल्या यंत्रसामग्रीसह जळून खाक झाला होता, हे दिसत होते; तयार ग्रंथ किंवा मूळ संहितेचे वा मुद्रितांचे कागद वाचले असण्याची सुतराम शक्यता नव्हती. होत्याचे नव्हते झाले होते. बघे लोक हळहळ व्यक्त करत होते. राजवाड्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण शेकडो ऐतिहासिक कागदपत्रेसुद्धा अंधारात ढकलली गेली होती, त्यांना प्रकाशात आणण्याचा राजवाड्यांनी केलेला प्रयत्न सपशेल फसला होता.

एखादा सोम्यागोम्या झाल्या प्रकाराने हबकून तर गेलाच असता; पण ‘नको रे हा हव्यास’, असे म्हणून ऐतिहासिक साधनांची शोधमोहीम आणि त्यांच्या प्रकाशनाचे मनसुबे बासनात गुंडाळून ठेवून मोकळा होता. पण राजवाडे यांनी त्या संकटकाळात स्वत:ला तर सावरले. पुन्हा वाईचा रस्ता धरला… पहिल्या वेळी जे जे केले होते, ते ते त्या कागदपत्रांबाबत पुन्हा एकदा करण्यासाठी, आगळ्या जिद्दीने…