युरोपीय इतिहासकारांच्या अर्धवट ग्रहांबद्दलची माहिती सांगताना राजवाड्यांनी सर्वप्रथम उल्लेखिलेला ग्रह म्हणजे ‘मनुष्यसमाज एके काळी रानटी स्थितीत म्हणजे वन्यावस्थेत होता आणि त्या अवस्थेतून तो आस्ते आस्ते संस्कृत होत चालला आहे. परंतु हा समज सर्वस्वी निराधार आहे. सर्व मनुष्यसमाज कोणत्याही एकाकाळी रानटी स्थितीत होता, असा इतिहासाला मुळी काळच आढळून आलेला नाही. दक्षिण अमेरिकेतील पाटोगोनियन लोक वन्यावस्थेत आहेत, तर ब्रिटिश लोक बरेच संस्कृत होत चालले आहेत; ब्रिटिश लोक वन्यावस्थेत आहेत, तर रोमन व ग्रीक लोक काहीसे संस्कृत होत चालले आहेत; रोमन व ग्रीक लोक वन्यावस्थेत आहेत, तर मिसर, असुर व बबुल लोक सुधारत चालले आहेत; बबुल लोक वन्यावस्थेत आहेत, तर सुमेर व चिनी लोक मोठमोठी नगरे वसवीत आहेत; चिनी लोक वन्यावस्थेत आहेत, तर आर्य लोक सुधारणेच्या शिखराला पोहोचले आहेत, असा प्रकार आढळून येतो… एकंदरीत, एखादा सुसंस्कृत मनुष्यसमाज पृथ्वीच्या पाठीवर कोठेतरी सदोदित आहे व दुसरा कोणतातरी समाज त्या समाजाचा धागा धरून संस्कृतावस्थेत येत आहे, अशीच स्थिती पूर्वप्रलयीन कालापासून दृष्टीस पडते.’
‘कोणताही मनुष्यसमाज अनंतकाल राहू शकणार नाही. अलीकडील हजार वर्षांतील पश्चात्प्रलयीन सर्व राष्ट्रे प्रत्येकी फारतर हजार दीड हजार वर्षे गोंधळ घालून अस्त पावलेली आहेत व कोणताही समाज पूर्वप्रलयीन कालापासून आतापर्यंत शुद्ध टिकलेला आढळून येत नाही; तेव्हा झाडून सर्व समाज भंगुर आहेत, असा या इतिहासकारांचा समज आहे… परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ध्रुवसिद्धान्त (‘द आ्क्टिटक होम इन द वेदाज’ या आपल्या ग्रंथात लोकमान्यांनी वेदांमधील खगोलशास्त्रीय संदर्भांच्या आधारे आर्यांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवाजवळ होते, असा सिद्धांत मांडला होता) जर साधार मानला – तो निराधार मानण्याला सबळ कारण दिसत नाही – तर पृथ्वीच्या पाठीवर पूर्वप्रलयीन कालापासून वर्तमानकालापर्यंत अव्याहत टिकलेले काही मनुष्यसमाज आहेत, असे कबूल करावे लागते… तसेच जरदुष्ट्रप्रणीत धर्माचे अवलंबन करणारा ईयसमाज पूर्वप्रलयीन काळापासून आतापर्यंत आधुनिक मुंबापुरस्थ पारसिकांच्या रूपाने अंशमात्रे करून हयात आहे. भारतवर्षीय आर्यांच्या मानाने हा ईय समाज अगदी नगण्य आहे; परंतु तो हयात आहे. या दोन समाजांखेरीज, पूर्वप्रलयीन काळापासून आतापर्यंत ज्यांची अव्याहत परंपरा स्थूल मानाने नाममात्रेकरून दाखवता येईल, असे युरोपातीलही काही समाज आहेत. त्याअर्थी ‘नो पीपल मे होप टु लिव्ह इटर्नली’ हा जो हेल्मोल्टचा ‘द वर्ल्ड हिस्टरी’मधील सिद्धांत आहे, तो निराधार आहे, असे म्हणावेच लागते’… या शब्दांत राजवाड्यांनी दुसरा (गैर)समज निकालात काढला.
युरोपीय इतिहासकारांच्या आणखी एका दोषाबद्दलचे आपले ठाम मत प्रतिपादन करताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘भविष्यकाळात विशिष्ट प्रसंगासंबंधाने काय होईल, याचे विशिष्ट भाकित करणे इतिहासाच्या प्रांताबाहेरचेे आहे, अशी प्रतिज्ञा करून अधूनमधून तशी भाकिते करण्याची आपली नैसर्गिक चटक या लोकांना आवरता येत नाही. युरोपीय लोक सर्व पृथ्वी पादाक्रांत करणार, इतर समाज त्यांच्यापुढे नामशेष होणार, अशी विशिष्ट विधाने युरोपीयनांनी लिहिलेल्या कोणत्याही समाजाच्या इतिहासात हटकून सापडतात… आता हे सांगावयाला नकोच की, भविष्यकाळी काय काय चमत्कार होतील, हे सांगू जाणे शुद्ध वेडेपणा आहे. आपल्याला माहीत नाहीत अशा प्रेरणा सध्या इतक्या आहेत व पुढे इतक्या नव्या होण्याचा संभव आहे की प्रस्तुतची कोणतीही विशिष्ट भाकिते भविष्यकाळी खरी ठरण्यास फारच थोडी कूस राहते (वाव शिल्लक राहतो.) तेव्हा जगाचा इतिहास लिहू जाणार्या इतिहासकारांनी या विशिष्ट भाकित करण्याच्या हावेपासून अलिप्त राहिल्याविना, निर्भेळ सत्य निष्पन्न होणे अत्यंत दुरापास्त आहे. विशिष्ट भाकिते म्हणजे एकप्रकारचे आपल्याला संमत पूर्वग्रहच होत!’
– आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com
