कोणत्या दर्जाच्या व्यक्तीला मायन्यात किती रेषा काढून मान द्यावा, याचा तपशील हेमाडपंती नियमांमध्ये समाविष्ट होता. त्या रेघा कशा काढाव्यात, ह्याचा खुलासा करण्यापूर्वी त्या रेघा ज्या यंत्राने काढावयाच्या त्या लेखणीचे स्वरूप व ज्या द्रव्याने काढावयाच्या त्या शाईची कृती प्रथम समजावून सांगणे योग्य ठरेल, असे म्हणून राजवाड्यांनी सांगितलेली माहिती आजही आपल्याला रंजक वाटण्यासारखी आहे. त्यांनी लिहिले, ‘नाचण्याचे शिरे करून व ते काजळाने घोटून काळी शाई करण्याचा परिपाठ महाराष्ट्रात फार पुरातन काळापासूनचा आहे.
लाखी, लोखंडी वगैरे इतरही आणीक शायांचे प्रकार आहेत; परंतु कारकुनाच्या मोडी लिहिण्याला सर्वत्र काजळाने घोटून तयार केलेल्या काळ्या शाईचाच उपयोग महाराष्ट्रात हमेशा होई. लेखण्या प्राय: बोरूच्या करीत. मोडी अक्षर लिहिण्याला बोरूखेरीज दुसर्या कोणत्याही लाकडाचा उपयोग करीत नसत. बोरूची लेखणी एक मजली किंवा दोन मजली करीत. लेखणीच्या उतारात खांचा, खोचा व मेहरपीहि करणारे कित्येक कुशल कारकून असत. उतारावर आंतील भेंडाचे टेंगूळ ठेवण्याचाहि कोठेकोठे प्रचार असे. बोरू दोन प्रकारचे असत. साधे व कळक्ये. कळक्या बोरूंना विस्तवावर भाजून काळे चट्टे पाडण्याचाहि संप्रदाय कोठेकोठे असे. श्रीमंतांच्या मुलांना लिहिण्याकरिता ज्या लेखण्या करीत, त्यांच्यावर सोन्याचा वर्ख चढवीत. गरिबांच्या मुलांची ही हौस रूपेरी किवा सोनेरी बेगडीवरच भागवली जाई. उत्तम लेखणी म्हटली म्हणजे तिचा उतार सरळ असावा, डावीकडे किंवा उजवीकडे झुलू नये…’
लेखणी व शाईबद्दलची ही माहिती देऊन झाली, तशीच राजवाड्यांनी कागदावर ओढावयाच्या वेगवेगळ्या पंधरा रेघांबद्दलची नावनिशीवार माहिती सांगितली. हेमाडपंताच्या वेळेपासून प्रचलित असलेल्या त्या रेघांपैकी कित्येकांची नावे शुद्ध संस्कृत होती, ती जशीच्या तशीच राहिली, तर काहींची फारशी नावे होती….‘कागद मोडल्यावर श्रीकाराच्या खालची पहिली ओळ किती तर्हेने काढता येते, ते सांगतो’, असे म्हणून राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘कागद उजव्या बाजूने मोडून त्याचे चार रकाने पडतात. रेघ चार रकाने ओढली म्हणजे तीस सबंद रेघ म्हणतात. तीत पहिल्या रकान्यात एका अक्षराची जागा कोरी ठेवली म्हणजे तिला दफे म्हणतात, दोन अक्षरांची ठेवली म्हणजे दफाते म्हणतात, तीन अक्षरांची ठेवली म्हणजे कर्ते म्हणतात आणि चार अक्षरांची ठेवल्यास महजर म्हणतात.
पहिल्या दोन रकान्यांपुरतीच रेघ ओढल्यास तिला पहिली जिल्हे, तर नुसत्या तिसर्याचौथ्या रकान्यांपुरतीच रेघ ओढल्यास व पहिले दोन रकाने मोकळे ठेवल्यास त्या रेघेला दुसरी जिल्हे म्हणतात. मधले दुसरा-तिसरा हे दोन रकाने भरून पहिल्याचौथ्या रकान्यांतील दोनदोन अक्षरांची जागा घेऊन ओढलेल्या रेघेला बीत अशी संज्ञा आहे. याच बीत रेषेला प्रारंभी अकार लावल्यास तिला अज् म्हणतात, एकार लावल्यास एकूणहत् म्हणतात तर बाक देऊन बीत रेषेचा प्रारंभ केल्यास तिला वासलात् म्हणण्याचा परिपाठ आहे…’
राजवाड्यांनी रेषांबद्दलची आणखी माहिती देताना लिहिले, ‘आणखी तीन प्रकारे रेघ काढतात. प्रारंभी दकार काढला की, दकारी रेघ सिद्ध होते, कित्येकदा प्रारंभी एक शून्य देतात तर कधी दोन उभ्या रेघा देतात. शून्य दिल्यास ब्रह्माचा निर्देश होतो, दोन उभ्या रेषा दिल्यास हरिहरांचा उल्लेख होतो तर दकार काढल्यास मित्रत्वाचा आविष्कार होतो… शंकराचार्यांसारख्या गुरूंना सहा, राजाला पाच, मित्राला तीन, सेवकास व शत्रूस दोन आणि पुत्रकन्यादिकांना एक रेेषा द्यावी, असा हेमाडपंती निर्बंध होता.’
राजवाड्यांनी त्या लेखामध्ये ज्या इष्टदेवतांना पत्रे पाठवण्याची चाल लेखनप्रशस्तीत सांगितलेली होती, त्या तुळजाभवानीसह इतरही सत्तावीस इष्टदेवतांची स्थलनामांसह यादी दिली होती आणि सगळ्यांत महत्त्वाची म्हणजे सरकारी कागदांचे किती विविध प्रकार शिवरायांच्या राज्यात प्रचलित होते, त्यांची लांबलचक साडेतीन पानी नावनिशीवार यादीसुद्धा समाविष्ट केली होती. कामानुरूप दिलेल्या ७८ नावांमधले वैविध्य थक्क करणारे ठरले नसते, तरच नवल!
anand47.hardikar@gmail.com
