मराठेशाहीचे ऐतिहासिक सत्य अस्सल कागदपत्रांच्या किंवा दस्तऐवजांच्या आधारे शोधण्याचा जो ध्यास घेऊन वि. का. राजवाडे यांनी पानिपतच्या तिसर्या लढाईसंबंधीची पत्रे समाविष्ट असणारा पहिला खंड प्रकाशित केला, तो त्यानंतरही तसाच कायम राहिला. पहिल्या खंडाला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेची आपण आतापर्यंत जशी काहीशा विस्ताराने दखल घेतली, तशी त्यांनी आयुष्यात नंतर टप्प्याटप्प्याने प्रकाशित केलेल्या सर्वच खंडांचीही ओळख करून घेऊ शकणार नाही. त्यांच्या अन्य लेखनाच्या व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंचाही पुरेसा परिचय घडावा, हा हेतू मनात बाळगल्यामुळे तशी मर्यादा स्वीकारणे नाइलाजाने भाग पडते आहे. तरीसुद्धा साधनसंकलनाची, संशोधन-संपादनाची त्यांनी चालवलेली मोहीम किती व्यापक होती, याचा अगदी धावता आढावा काही लेखांकांतून घेता येऊ शकेल.
राजवाड्यांनी १९०० साली वाईहूनच ऐतिहासिक साधनांचा जो दुसरा खंड प्रसिद्ध केला, त्यामध्ये मे १७१४ पासून १७६१च्या जानेवारीपर्यंतच्या कालावधीतील तीनही पेशव्यांविषयी तारीखवार वृत्तांत समाविष्ट करण्यात आला होता. या खंडाला जरी त्यांनी जेमतेम २२ पानांचीच प्रस्तावना लिहिली होती, तरीही त्यातसुद्धा ग्रांट डफने केलेल्या तब्बल २८ गफलतींचा तपशील द्यायला व त्याच्या विश्वासार्हतेसमोर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करायला ते विसरले नाहीत. त्यांनी लिहिले, ‘कारण व कार्य यांचा घटस्फोट करून इतिहास लिहू पाहणे अशास्त्र आहे; इतकेच नव्हे, तर ते अशक्य आहे. अनेक कार्ये पुढे आली व त्यामधून आधीची कोणती, मागूनची कोणती व समकालीन कोणती याचा उलगडा करण्याचा प्रसंग आला म्हणजे मग कारणांचे महत्त्व कळू लागते. अशा प्रसंगी कारणांकडे पाहिलेच नाही म्हणजे डफच्या इतिहासासारखा तुटक, निरस व हीनसत्त्व इतिहास तयार होतो. आश्चर्य हेच की, कारणाशिवाय कार्याचे असंबद्ध वर्णन जगापुढे मांडण्यास हा लेखक तयार झाला!’
त्याच वर्षी राजवाड्यांनी ऐतिहासिक साधनांचा आणखी एक खंड पुण्यातून प्रकाशित केला. त्यात पेशव्यांची वंशावळ, १८१६ व १८१७ सालांतील काही हकीगती, पेशवाईच्या अखेरची अखबार वगैरे कागदपत्रांप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या जीवनावरील सर्व बखरींचे विस्तृत परीक्षण समाविष्ट करण्यात आले होते. राजवाड्यांनी ३२६ पाने असणार्या या खंडाला तिसरा क्रमांक न देता चौथा दिला. या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनाबद्दल राजवाड्यांनी केलेले तौलनिक भाष्य फार महत्त्वाचे होते. आधुनिक महाराष्ट्रलेखक महाराजांची तुलना युरोपातील प्राचीन व अर्वाचीन अशा लोकोत्तर वीरांशी करतात. अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन, क्रामवेल, वाशिंग्टन इत्यादी पाश्चात्त्य महापुरुषांची नावे या संदर्भात घेतली जातात…’ ही त्यावेळच्या इतिहासलेखनात आढळणारी प्रथा योग्य आहे का, हा मुद्दा उपस्थित करून राजवाड्यांनी त्याचे स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले होते.
‘स्वराज्य व स्वधर्म यांच्या संरक्षणाच्या उदात्त, पवित्र हेतूने शिवाजीचे प्रयत्न होतेे; तेव्हा परकीयांचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्या अर्थात दुष्ट, अपवित्र हेतूने प्रोत्साहित झालेल्या अलेक्झांडर, सीझर किंवा नेपोलियन या दिग्विजयी पुरुषांशी शिवाजीची तुलना करणे अयोग्य आहे… शिवाजीची योग्यता स्वयंसिद्ध आहे. अलेक्झांडरप्रमाणे शिवाजीने आपल्या स्नेह्यासोबत्यांना ठार मारले नाही; सीझरप्रमाणे आपल्या बायकोला सोडून दिले नाही; बोनापार्टने डफ डांगियाचा जसा अन्यायाने वध केला तसा शिवाजीने कोणाचा केला नाही; क्रामवेलने ऐरिश लोकांना सरसहा ठार मारले तशी शिवाजीने कोण्या प्रांतातील लोकांची कत्तल उडवली नाही. शिवाजीचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्मसहिष्णुतेचे होते. असंख्य लोकोत्तर कृत्यांनी जर कोण्या पुरुषाने या भूमंडळाला अक्षय ऋणी करून ठेवले असेल, तर ते फक्त शिवाजीनेच होय. त्याच्याशी तुलना करावयास जी जी व्यक्ती घ्यावी, ती ती या नाही त्या गुणाने शिवाजीहून कमतरच दिसेल!’ शिवरायांच्या माहात्म्याचे राजवाड्यांनी केलेले हे सोदाहरण विस्तृत विश्लेषण त्या साधनखंडाचे विशेष लक्षणीय वैशिष्ट्य ठरले, हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
– आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com
