‘कौलिक पद्धतीचे ग्रहण केल्याविना अखिल मानवसमाजाच्या शाखांच्या व उपशाखांच्या जाळ्यांची गुंतागुंत यथास्थित उलगडत नाही, ही तळहातीच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट गोष्टच आहे. एकेकटे राष्ट्र म्हणून ज्याला आपण नाव देतो, त्याचा इतिहास लिहितानाही कौलिक पद्धतीला सोडून देता येत नाही. जोपर्यंत पृथ्वीतलावर कुलभेद आहे, तोपर्यंत कौलिक पद्धतीने इतिहास लिहिला जाणे अपरिहार्य आहे’, असा निर्वाळा देऊन झाल्यावर राजवाड्यांनी इतिहासलेखनाशी निगडित असलेल्या असंख्य मुद्द्यांचा कमी-अधिक विस्ताराने ऊहापोह केला.

तत्त्वज्ञानाचा मानवसमाजाच्या चरित्राशी बिंबप्रतिबिंबरूप संबंध असतो, जे ता्त्विवक बिंब मनात उत्पन्न झाले असेल, त्याचे प्रतिबिंब समाजात प्रतिफलित होते, हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी भरतखंडातील आर्यसमाजाचे उदाहरण घेतले. त्यांनी लिहिले, ‘ऋक्संहितेत भोग्य वस्तूंची प्राप्ती करून देणार्‍या व शत्रूंचा नाश करणार्‍या देवतांचे म्हणजे कल्पनांचे स्तवन केलेले आहे. त्यावरून तत्कालीन समाजात भोगप्राप्ति व शत्रुनाश ही तत्त्वज्ञानाची दोन अंगे होती, असे दिसते व ती कालांतराने आर्यसमाजात प्रतिफलित झाली, असे इतिहास सांगतो… बुद्धाच्या तत्त्वज्ञानात भूतदया व निर्वाण हे दोन मुख्य सिद्धांत आहेत. त्यांचे पर्यवसान संन्यास व दौर्बल्य या दोन रूपांनी समाजात प्रतिबिंबित झाले.

दुष्टांवरही दया दाखवण्याचा जेथे निश्चय झाला व मरणोत्तर शून्यप्राप्ति होणार अशी जेथे खात्री झाली, तेथे शकयवनादि रानटी परंतु बुभुक्षू लोकांनी ज्ञानसंपन्न संस्कृत लोकांवर राज्य करावे व संस्कृत लोकांनी निरिच्छ, भिक्षू व श्रमण बनून समाजाच्या प्रपंचाचा चुथडा करावा, हे ओघानेच आले… भगवद्गीतेत बुद्धभिक्षूप्रमाणे कर्माचा न्यास करणे म्हणजे संन्यास नव्हे व क्लैब्याचा (दुबळेपणाचा) अवलंब करून रानटी शत्रूंचा पगडा बसवून घेणे म्हणजे भूतदया ऊर्फ शांति नव्हे, असा सिद्धांत सांगितला. या सिद्धांताचे प्रतिबिंब तत्कालीन आर्यसमाजावर पडून शकयवनादि म्लेंच्छराजांना आर्यांनी हाकून दिले…’

तत्त्वज्ञानाच्या समाजावरील प्रभावाची अशी उदाहरणे देताना राजवाड्यांनी काही वादग्रस्त विधानेसुद्धा केली. त्या तशा विधानांपैकी एक संत ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिके’बद्दलचेही होते. ‘इतर अनेक उत्कृष्ट तत्त्वांबरोबरच ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेतून खालील तत्त्व शिकवले व त्याचाच पगडा दुर्दैवाने किंवा सुदैवाने महाराष्ट्रातील समाजावर उत्कटत्वाने बसला’, असे म्हणून त्यांनी दोन ओव्या उद्धृतही केल्या. ‘उत्तमातें धरिजे। अधम तरि अव्हेरिजे। हें कांहींच नेणिजे। वसुधा जेवीं ।।१।। गाईची तृषा हरूं। कां व्याघ्रा विष होऊनि मारूं। ऐसें नेणेंचि गा करूं। तोय जैसे ।।२।। आणि पुढे लिहिले, ‘पाणी, माती वगैरे अचेतन भुतांप्रमाणे बर्‍यावाईटांचे ग्रहण सचेतन मनुष्यप्राण्यांनीहि सुखदु:खाकडे लक्ष न देता उदासीनबुद्धीने करावे, असे तत्त्वज्ञान ज्या देशात नांदू लागले, तेथे मुसलमानांसारख्या… लोकांनी राज्य करावे व सर्वस्वापहार करावा, यात काही नवल नाही… पण गीतेत सांगितलेल्या मूळच्या सचेतन भागवतधर्माहून हा अचेतन भागवतधर्म भिन्न आहे.’ ‘योग: कर्मसु कौशलम्।’ हे गीतातत्त्व या संतमंडळींनी जर नीट ध्यानात ठेवले असते, तर भगवंतांचा उपदेश त्यांना नीट समजला असता’… त्यानंतरही संत एकनाथांच्या ‘पंगू भागवतधर्मा’पासून ‘थिआसोफिस्टांच्या मंत्रशास्त्राच्या सोडती’पर्यंत आणि ‘समर्थ रामदासांनी पुनरुज्जीवित केलेल्या चालुक्यकालीन महाराष्ट्रधर्मा’पासून ‘दासबोधाचे वारे लागलेल्या रानड्यांच्या समाजसुधारणां’पर्यंत विविध ता्त्विवक प्रणालींवर राजवाड्यांनी अगदी थोडक्यात शेरेवजा लिहिले, ते सर्वांनाच मान्य होण्यासारखे नव्हते.

तथापि युरोपीय समाजाबद्दलचे बायबलच्या संदर्भातले त्यांचे निरीक्षण मात्र चांगलेच दखलपात्र ठरले. ‘अनेक भ्रामक विधानांचे भांडारगृह जे बायबल, त्याच्या आसपास बिलकूल विश्वास ठेवावयाचा नाही व तर्कपद्धतीच्या जोरावर जे खरे असेल ते शास्त्रच तेवढे प्रमाण मानावयाचे, असा प्रकार युरोपात सध्या चालला आहे. तो सर्वथा स्तुत्य व उपयोगी आहे… हीच विचारसरणी इस्लामी, बौद्ध व मूर्तिपूजक वगैरे सर्व तत्त्वज्ञानांनाही लावली पाहिजे!’

anand47.hardikar@gmail.com