‘नाना फडणीस या प्रचंड बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या पुरुषासंबंधीचे ते मेणवली येथील दप्तर पाहण्याची मला परवानगी दिली म्हणून श्रीमंत सरदार मेणवलीकर यांचे आभार मानावेत, तितके थोडेच आहेत’, असे राजवाड्यांनी ‘केसरी’तल्या आपल्या लेखात म्हटले होते आणि ते दप्तर न्याहाळल्यानंतर मनात घोळू लागलेले विचार व्यक्तही केले होते. ‘खरा इतिहास लोकांपुढे मांडून नानांची खरी योग्यता महाराष्ट्रीयांच्या मनात बिंबवून देणारे हे कागदपत्र छापवण्यास निदान ३०-४० हजार रुपये तरी लागतील, असा अंदाज आहे. मुंबईच्या सेक्रेटरियातील कागदपत्र छापण्यास सरकार लाखो रुपये खर्च करते; तेव्हा नानांबद्दल आम्हालाही अभिमान वाटतो म्हणवणारे मुंबई सरकार या कामी काही ना काही तरी मदत करीलच करील. तथापि हे काम आमच्याकडील श्रीमंत लोकांनी व जहागीरदारांनी अंगावर घेतल्याशिवाय पार पडावयाचे नाही.’
यानंतर राजवाड्यांनी पुणेरी लोकांच्या प्रवृत्तीबद्दल मारलेला शेरा चांगलाच बोचरा होता. १८९७ मध्ये पुण्यात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी सरकारी जुलमापासून व सक्तीच्या वैद्यकीय उपचारांपासून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी हिंदू रुग्णालय उभारण्याची कल्पना पुढे आली होती. ती कल्पना जाहीर झाली, तेव्हा अनेकांनी ती उचलून धरली; परंतु प्रत्यक्षात त्यासाठी तीन हजार रुपयांची रक्कम जमवण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हा मात्र ती रक्कम जुळता जुळता पुरेवाट झाली होती. तो दाखला देऊन राजवाड्यांनी शेरा मारला होता की, ‘या अशा छपाई कामासाठी पुण्यातल्या कंगाल व निरभिमानी लोकांच्या हातून कितीशी मदत होण्यासारखी आहे, हे दिसतेच आहे!’ पण पुढे लगेच त्यांनी असा आशावादही व्यक्त केला होता की, ‘महाराज सरकार करवीर, पटवर्धन सरदार, ज्ञानप्रसारार्थ झटणारे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड, पूर्वजांचा अभिमान बाळगणारे महाराज बाळासाहेब होळकर यांच्यापैकी कोणीही मनावर घेतल्यास हे काम सहज होणारे आहे. सरदारांच्या कानांवर ही गोष्ट गेली असता आपण होऊन मदत करण्यास ते तयार होतील, हे त्यांच्या पूर्वजांविषयीच्या कळकळीवरून उघड दिसतेच आहे!’
नाना फडणीस यांच्या त्या दप्तराचे आणखी एक आगळे वैशिष्ट्य राजवाड्यांनी ‘केसरी’तल्या आपल्या त्या लेखात आवर्जून नमूद केले होते. त्यांची शास्त्रीय ऐतिहासिक दृष्टी त्यावरून स्पष्ट होत होती. त्यांनी म्हटले होते, ‘या दप्तरामध्ये एक नकाशांचा रुमाल आहे. त्यात लढायांचे, किल्ल्यांचे, वेढ्यांचे, हिंदुस्थानचे, निजामाच्या राज्याचे, मराठी साम्राज्याचे, कोकण किनार्याचे, साष्टीचे, मुंबईचे इत्यादी नकाशे आहेत. कोकणचा नकाशा सुमारे पाचपन्नास हात लांब आहे व त्यात सह्याद्रीचे घाट तसेच समुद्रावरची बंदरे काठेवाडापासून गोव्यापर्यंतची काढलेली आहेत…’ (अशा त्या दप्तराच्या तपशिलाबद्दलच्या राजवाड्यांच्या लेखाची ही माहिती आठ-दहा ओळींमध्ये त्यांच्या बहुतेक चरित्रग्रंथांत आढळते; परंतु जवळजवळ संपूर्ण लेख मात्र डॉ. प्र. न. जोशी यांच्या ‘राजवाडे विचारदर्शन’ या समीक्षाग्रंथातच उद्धृत केलेला आढळतो. येथील माहिती त्यावरूनच संक्षेपाने घेतली आहे.)
मेणवलीच्या त्या दप्तरातील कागदपत्रांच्या प्रसिद्धीसाठी राजवाडे अशी विविधांगी पूर्वतयारी करत होते. ज्या निरनिराळ्या व्यक्तींबद्दलची कागदपत्रे त्या दप्तरात होती, त्यांची नावे घालून ती ती कागदपत्रे वेगवेगळी बांधून ठेवता यावीत म्हणून त्यांनी पदरचे ऐंशी रुपये खर्च करून कापड आणले होेते आणि ती कागदपत्रे व्यवस्थित लावून ठेवली होती. तसे करताना त्यांना असे आढळले की, नकाशांच्या रुमालामधले एकदोन नकाशे जागेवरचे हलले आहेत, हरवले आहेत. प्रामाणिक आस्थेपायी त्यांनी त्याबद्दल चौकशी केली, तर मेणवलीकरांनी त्यांच्यावरच संशय घेतला. राजवाडे यांना राग येणे स्वाभाविक होते. संतापाच्या भरात त्यांनी ते कामच सोडून दिले. मेणवलीला जाणे नको, त्या दप्तराच्या मालकाचे तोंडही पाहणे नको, असे ठरवले खरे; परंतु त्या ऐतिहासिक ठेव्याकडे पाठ फिरवणे, त्याचे विचार मनातून पूर्णपणे काढून टाकणे मात्र त्यांना जमेना. बाळ गंगाधर टिळकांच्या मध्यस्थीने ती कागदपत्रे मिळवण्याची पर्यायी योजना त्यांच्या मनात घोळू लागली. त्या दृष्टीने त्यांनी काही पावले उचलली.
