समग्र साहित्याच्या अकराव्या खंडामधील (संपादक : डॉ. अ. रा. कुलकर्णी) आणखी एका स्फुट लेखाचा परिचय आता करून द्यायचा आहे. या लेखात राजवाड्यांनी अथपासून इतिपर्यंत नाना फडणवीस यांच्या हातचा अस्सल पुर्जा उद्धृत केला होता. त्याबद्दलची माहिती देताना त्यांनी म्हटले होते, ‘या पुर्जाला तालीमनामा म्हणतात.
तालीमनामा म्हणजे तो कागद की ज्यात पुढे होणार्या संभाषणाची तालीम व शिकवण लिहिलेली असते. शके १७०४ मध्ये तहाचे बोलणे चाललेले असताना शके १७०० मध्ये घडलेल्या काही बदमामल्यासंबंधाने (आक्षेपार्ह बाबींविषयी) तक्रार कशी करावी, याविषयी तालीम ऊर्फ शिकवण या पुज्र्यात नाना फडणविसांनी कलकत्त्यातील आपल्या वकिलास लिहून पाठवली आहे. या तालीमनाम्यात मुंबईकर व कलकत्तेकर इंग्रजांच्या तत्कालीन आंतरराष्ट्रीय नीतिमत्तेचे उत्तम चित्र नानांनी रेखाटले आहे. अस्सल पत्रच वाचकांपुढे ठेवल्यामुळे त्याविषयी जास्त लिहीत नाही.’ तथापि त्यानंतर राजवाड्यांनी पुढे आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या स्वरूपाबाबत केलेले मार्मिक भाष्य या जेमतेम एक पानी टिपणाची वाचनीयता वाढवणारे ठरले. त्यांनी लिहिले, ‘दुसर्या राष्ट्राशी काल केलेले तह आज का मोडावेत, याबद्दल आश्चर्य करण्याचे कारण नाही. तह ही काही अचल वस्तू नाही की ती यावच्चंद्रदिवाकरौ टिकावी.
परिस्थित्यनुरूप तह मोडणे किंवा पाळणे इष्ट व न्याय्य असते. कमजोर असताना केलेले तह शिरजोर झाल्यावर मोडणे रास्त व न्याय्य आहे. नीति ही सदैव समर्थाची, बलिष्ठाची व शिरजोराची असते. हीच उच्च तत्त्वे लक्षात घेऊन मुंबईकर व कलकत्तेकर इंग्रज नाना फडणविसांशी धरसोडीचे वर्तन करीत. नाना फडणवीस इंग्रजांना अनीतिमान म्हणे. पण कमपक्ष वरपक्षाला अशीच नावे ठेवीत असतो… जगत् जंगम आहे, एथील तह तरी स्थावर कसे असू शकतील? तह, राज्ये, नीति, कायदे, धर्म नित्य व स्थिर मानणे हेच मुळी चुकीचे आहे. तह म्हणजे करार, वचनबद्धता. करार परिस्थितीप्रमाणे बदलणे रास्तच नव्हे, अपरिहार्यही आहे. चार पायलीची धारण असताना केलेले करार चार शेराची धारण असताना जो पाळतो, तो अनीतिमान व महामूर्ख समजला जाणे ओघानेच येते.’
राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘प्राय: पराभूत झालेल्या लोकांची सर्वसामान्य अशी समजूत असते की, त्यांनी पूर्वी केलेले स्वहिताचे तह अचल व स्थिर आहेत. ते तह जो मोडील त्याला पापी, अधर्मी व अनीतिमान म्हणून हे लोक पुकारतात; पण त्या ओरडीत काही तथ्य नसते. आंतरराष्ट्रीय धर्म, कायदा व नीति यांच्या दृष्टीने नाना फडणविसांचा तालीमनामा मननीय आहे.’
आधीच्या तहातील तरतुदी मोडून, ‘दगाबाजी करून मुंबईकर इंग्रजांनी साष्टी घेतली’ किंवा ‘कारकुनास दखल दिल्ही नाही’ किंवा ‘वकीलास हाणमार केली’ वगैरे तक्रारी कलकत्तेकर इंग्रजांपुढे कशा कराव्यात, याबद्दलचा तो तालीमनामा असल्याचे त्या दस्तऐवजातील मजकूर बारकाईने वाचल्यावर स्पष्ट होत होते. त्या पार्श्वभूमीवर राजवाड्यांनी लिहिले, ‘फडणविसांची नीतितत्त्वे व तत्कालीन इंग्रजांची नीतितत्त्वे जर एकाच स्वरूपाची असती, तर केल्या पातकांबद्दल इंग्रजांस लाज वाटली असती व त्यांनी फडणविसांशी केले ते वर्तन केले नसते.
परंतु फडणविसांच्या व इंग्रजांच्या नीतीच्या कल्पनाच जमीनअस्मानाइतक्या भिन्न होत्या. ज्याला नाना फडणवीस पाप म्हणत, त्यालाच इंग्रज पुण्य म्हणत. फडणवीस नीतीचा उगम ईश्वर मानीत; इंग्रज नीतीचा उगम पल्लेदार हत्यारे मानीत. पैकी फडणवीस खरे की इंग्रज खरे, नीतीचा उगम ईश्वर आहे की पल्लेदार हत्यारे, याचा निर्णय करता येण्याची जास्त साधने आजमितीस आपणांस उपलब्ध आहेत. जसे कायदे, धर्म इटर्नल म्हणजे नित्य नाहीत, धर्मांतर्गत तहही नित्य नाहीत; पल्लेदार हत्यारांच्यावर हस्तिदंती फाशांसारखे क्षणोक्षणी फिरणारे आहेत. मोजमापाच्या सोयीकरिता काही काळ कायदे, तह, करार स्थिर मानण्याचा प्रघात आहे इतकेच!’
anand47.hardikar@gmail.com
