‘शहाजी विमनस्क होऊन आदिलशाहीत जातो, तो इकडे निजामशाहीमध्ये जहांगीरचा मुलगा खुर्रम ऊर्फ शहाजहान आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारून मलिकंबराच्या आश्रयास आला’, या काहीशा अनपेक्षित घडामोडीमागची गुंतागुंतीची पार्श्वभूमी उलगडून सांगत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘भातवडी, नवरसपूर व सोलापूर येथील लढायांमुळे मलिकंबराची इभ्रत सर्व हिंदुस्थानभर इतकी वाढली की, दिल्लीपतीच्या कर्तृत्ववान पुत्रालाही निजामशाही आश्रयणीय वाटली. खरा प्रकार शहाजहानला माहीत नव्हता. निजामशाहीची इभ्रत व थोरवी मूर्तिजा किंवा मलिकंबर ह्या खुळ्या व म्हातार्या इसमांवर अवलंबून नसून ती पराक्रमी शहाजीवर अवलंबून आहे, हे त्यावेळी जगजाहीर झाले नव्हते.
आदिलशाहीतील काही थोड्या जाणत्या लोकांच्या मात्र ते लक्षात येऊन चुकले होते… जरी अशी वस्तुस्थिती असली, तरी शहाजहानसारखा अव्वल दर्जाचा शहाजादा आश्रयास आल्याने मलिकंबराचा बोलबोला अतिशय वाढला. दिल्लीचा मोंगल आणि विजापूरचा आदिलशहा यांचा पाणउतारा झाल्याने मलिकंबर वैभवाच्या शिखरास पोहोचला. त्या वैभवात एकच वैगुण्य राहिले. शहाजी भोसला आदिलशहास मिळाला. त्याच्याच जोरावर त्या मलिकंबराने आदिलशहाचा पाणउतारा केला होता. तथापि हे वैगुण्य शहाजहानाच्या आगमनाने थोडेबहुत भरून निघेल, असा अंबराचा अंदाज होता…’
दुसर्या बाजूला कोणते चित्र दिसत होते, याचे वर्णन करताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘शहाजी विजापूरकरांस मिळाल्यावर त्या दरबाराने त्यास आपल्या पुणे व जुन्नरकडील जहागिरीत राहून मलिकंबरास शह देण्याच्या कामगिरीवर नेमिले आणि नवरसपूरच्या व भातवडीच्या लढायांमधील अपमानाचा सूड उगविण्याची तयारी केली. शक १५४७ च्या पावसाळ्यानंतर आदिलशहाशी तह करून शहाजी आपल्या सैन्यासह जहागिरीच्या जुन्नरप्रांती राहिला व तेथून त्याने निजामशाही दरबारात कारवाई सुरू केली. मूर्तिजा निजामशहा, मलिकंबर आणि खेळोजी भोसला ह्या तिघांतून फुटण्यासारखा माणूस मूर्तिजा आहे, हे शहाजी जाणून होता.
भातवडी व नवरसपूरच्या प्रकरणांनंतर शहाजीच्या हाती सत्ता जाऊन तो आपल्यावर कुरघोडी करील, ह्या भीतीमुळेच मूर्तिजाने खेळोजीचा फाजील बहुमान करून शहाजीला दुखविले होते, हेहि शहाजी जाणून होता. तसेच शहाजी विमनस्क होऊन राज्यातून निघून गेल्यावर म्हातार्या मलिकंबराच्या कचाट्यात आपण बिनसूट सापडलो, हा मूर्तिजाचा अनुभव शहाजीच्या लक्षात आला होता. सबब मूर्तिजाला त्रिकुटांतून फोडण्यास सोयीचे पडेल, असा शहाजीने कयास केला. मूर्तिजाची आई जी बेगमसाहेब तिची मर्जी अद्याप शहाजीवरून उठली नव्हती. तिचा शब्द मूर्तिजा कुराणाप्रमाणे प्रमाण मानी; इतकेच नव्हे, तर कधीकधी राजपत्रांवरही तिची निशाणी मथळ्यावर लिहिण्यात तो भूषण मानी. ह्या बेगमेला मूर्तिजा व दरबारी लोक मासाहेब म्हणत. त्या मासाहेबाशी सूत्र बांधून, मूर्तिजाचे मन शहाजीने आपल्याकडे पुन्हा वळवून घेतले व जमल्यास निजामशाहीत परत येण्याचे एक द्वार खुले करून ठेवले.’
शाह्यांची ही अदलाबदल करणे आपल्याला शक्य व्हावे, यासाठी केवळ आपल्यावरच निष्ठा ठेवणारे सैन्याचे पाठबळ हवे, हे शहाजीने पुरते ओळखले होते. हा त्याच्यामधील नेतृत्वगुण अधोरेखित करीत राजवाड्यांनी लिहिले, ‘शहाजीला अनेक स्थित्यंतरांतून जावे लागले, कुणाकुणाशी वितुष्ट घ्यावे लागले, जिवलग बायकोचाहि वियोग सहन करणे त्याच्या कपाळी आले. परंतु एका वस्तूचा मात्र वियोग, कितीही संकटे आली, तरी त्याने होऊ दिला नाही आणि ती म्हणजे त्याची सेना… शहाजी आपल्या सैनिकांची इतकी पराकाष्ठेची काळजी घेई की संकटसमयी इतर सर्व उद्योगांना गौणत्व देऊन सैन्याच्या जोपासनेला व मशागतीला तो प्राधान्य देई. शहाजीचा जसा सैन्यावर लोभ, त्याप्रमाणेच सैन्याची श्रद्धा शहाजीराजाच्या ठायी अढळ असे. हाताखालील माणसांना मोहिनी कशी घालावी, त्यांची अंत:करणे कशी आकर्षित करून घ्यावी, न होते कार्य इरेला पडून त्यांच्याकडून कसे करवून घ्यावे, ही कला शहाजीराजाच्या ठायी जन्मसिद्ध होती, त्यामुळे सारे जग उलटले, तरी त्याच्या सैनिकांनी शहाजीला कधीही अंतर दिले नाही!…’
anand47.hardikar@gmail.com
(अवतरणांतील व्याकरण/ शुद्धलेखन मुळाबरहुकूम)
