आपल्या हाती लागलेल्या पोथीचा मूळ लेखक मनोहर पुराणिक नसला, तरीही ‘तो एक साक्षेपी गृहस्थ होता म्हणूनच त्याने त्याला मिळालेल्या जीर्ण पोथीची डागडुजी करून व तिच्यावर आपली दखल घालून ती आपल्या संग्रहात ठेवून दिली. कालांतराने पोथी पुराणिकाच्या घरून रबड्यांच्या घरात जाऊन सध्या ती प्रस्तुत संपादकाच्या आश्रयास

प्रकाशनार्थ आली आहे. मनोहर पुराणिकाच्या दखलेतील (नोंदीतील) अक्षरांचे वळण त्याने स्वत: लिहिलेल्या इतर ग्रंथांमधील अक्षरांच्या वळणांशी जुळते’, अशी माहिती देऊन राजवाड्यांनी नंतर त्या पोथीच्या रक्षणकर्त्याबद्दल आणखीही खुलासा केला.

‘मनोहर लक्ष्मण पुराणिक हा गृहस्थ मूळचा भीमेकाठच्या खेड गावचा राहणारा. खेडहून चिंचवडास त्याने स्थलांतर केले, ते पहिले बाजीराव बल्लाळ याच्या कारकीर्दीच्या सुमारास. हा यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण बराच व्यासंगी असून याला प्राकृत व संस्कृत कविता करण्याचा नाद होता. रबड्यांच्या घरात जो ग्रंथसमूह मला सापडला, त्यापैकी बहुतेक सर्व पोथ्या या मनोहर पुराणिकाच्याच आहेत. या ग्रंथसमूहात वेद, इतिहास, पुराण, व्याकरण, न्याय, वेदान्त, काव्य, नीति इत्यादिविषयक संस्कृत ग्रंथ असून ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर, वामन, कृष्णयाज्ञवल्क्य वगैरेंचे प्राकृत ग्रंथही आहेत. शिवाय याने स्वत: रचिलेली काही प्राकृत अभंग, श्लोक वगैरे मराठी ग्रंथरचनाही आहे. हा आपल्याला मनकवि, मनोहरकवि असे अभंगांच्या किंवा श्लोकप्रबंधांच्या समाप्तीच्या प्रसंगी वारंवार म्हणतो. कित्येक स्थली याने आपले गाव, नाव, मातापितरे, गुरू, शक, महिनामिती इत्यादी त्रोटक तपशीलहि दिला आहे, त्यावरून असे दिसते की, हा कवि बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव या दोन पेशव्यांच्या कारकीर्दीत चिंचावटग्रामी (चिंचवडला) वास्तव्य करून होता…’

पोथीच्या रक्षणकर्त्याचा अंदाजे काळ कोणता असावा, हे सूचित केल्यानंतर राजवाड्यांनी पुन्हा एकदा पोथीच्या वर्णनाकडे लक्ष वळवले. त्यांनी पोथीच्या काळाबद्दलचा अंदाज व्यक्त करीत लिहिले, ‘राधामाधवविलासचंपूची माझ्या हाती लागलेली पोथी शक १६५० पूर्वीची आहे. किती पूर्वीची आहे, या बाबीचा अंदाज पोथीच्या जीर्णत्वावरून व अक्षराच्या वळणावरून अदमासाने ताडता येतो. इ, क, ज, य, भ वगैरे अक्षरांची मोडणी शिवकालीन दिसते. सबब, ही पोथी बहुधा शक १६००च्या सुमारची असावी. मूळ पोथीतील अक्षरे न लागल्यामुळे कोठे कोठे जागा रिकामी सोडिली आहे व कोठेकोठे श्लोकांचे सबंध चरणच्या चरण खाल्ले आहेत किंवा अर्थ न लागल्यामुळे अंदाजाने काहीतरी अक्षरे एकापुढे एक लिहून वेळ मारून नेली आहे, त्यावरूनही ही शिवकालीन पोथी (मूळची नसून) तिच्याहून जुन्या अशा पोथीवरून नकललेली आहे.’

साहजिकच प्रश्न उपस्थित झाला, तो मूळ पोथीबद्दलचा. त्याचे उत्तर मिळवण्यासाठी त्या पोथीतल्या मजकुराचाच धांडोळा घेणे भाग होते. राजवाड्यांनी ते काम चिकाटीने पार पाडले आणि खुलासा करीत लिहिले, ‘सगळ्यांत अत्यंत जुनाट पहिली पोथी शहाजीराजे भोसले यांची पहिली राजधानी जे बंगळूर शहर तेथे लिहिली गेली व तिच्यावरून किंवा तिच्या प्रतीच्या प्रतीवरून ही सध्याची पोथी शिवकाळात नकलली गेली असावी. अर्थात या चंपूच्या आणखीही काही प्रती म्हैसूर, मद्रास व तंजावर या प्रांतांत असण्याचा संभव आहे. त्या धुंंडाळून मिळवणे ही बहुत कालान्तराची वाव होणार म्हणून या एकाच पोथीवरून इतिहासज्ञान मिळवण्यासाठी प्रस्तुत प्रकाशन आरंभिले आहे.’

राजवाड्यांनी त्यानंतर मूळ पोथीबद्दलची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यांनी लिहिले, ‘हा राधामाधवविलासचंपू ग्रंथ प्रथम बंगळूर प्रांती उदयास आला. स्वत: ग्रंथकारच म्हणतो की, शहाजी महाराजांनी हे काव्य श्रवण केले. कोठे श्रवण केले? तर बंगळूर प्रांती श्रवण केले. तैलंगणादि इतर प्रांतांत कशावरून श्रवण केले नाही? तर कवि स्वत: दोनतीन ठिकाणी महाराष्ट्रदेशाहून शहाजीमहाराजांसन्निध आल्याचा उल्लेख करतो. महाराष्ट्रदेशाहून शहाजीमहाराजांसन्निध येणे म्हणजे बंगळूरप्रांती येणेच होय, कारण कर्नाटकात बंगळूरखेरीज इतरत्र त्यांचे वास्तव्य शेवटची पंधरा वर्षे नव्हते.’

आनंद हर्डीकर