स्वराज्य स्थापनेसारख्या प्राणभूत संकल्पनेचा १६४६ पासून म्हणजे शिवरायांच्या कारभाराच्या प्रारंभापासून कसकसा आविष्कार होत राहिला, हे सांगण्यासाठी राजवाडे पुढे सरसावले खरे; परंतु त्यांना प्रारंभीच हे नोंदवावे लागले की, ‘दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा अस्सल लेख अद्यापपर्यंत (तोपर्यंत) एखादा दुसराच उपलब्ध आहे.’ तथापि इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर मार्ग गवसतोच, असे म्हणतात. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे १६५९ सालचे एक पत्र ‘काव्येतिहास संग्रहा’मध्ये छापले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या संग्रहामधले क्र. ४११ चे पत्र आपल्या विवेचनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, हे ओळखून त्यांनी लिहिले, ‘या पत्रावरून राज्य आक्रमिण्याकरता परराज्यांतील देसाई, देशपांडे यांना राजे काय काय लालूच दाखवून बांधून घेत असत, हे अंशत: कळण्यासारखे आहे.’ मग त्यांनी त्या पत्राचा सबंध उतारा उद्धृत केला.
‘तहनामा राजश्री खेमसावंत व लखमसावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पितांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला. सुरू सन तिस्साखमसैन अलफ…’ पासून सुरुवात झालेला त्या उतार्याचा शेवट होता, ‘शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७ एकूण पाच कलमे करून तहनामा दिला असे. मोर्तब.’
मार्च १६५९ मध्ये झालेल्या या तहनाम्याचा ग्रांट डफनेसुद्धा आपल्या ग्रंथात ओझरता उल्लेख केल्याची नोंद करून राजवाड्यांनी लिहिले, ‘या तहनाम्यातील एक कलम स्वराज्यसाधनाचे आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. शिवाजीने मुधोळच्या घोरपड्याला पाठवलेले एक पत्र माझ्याजवळ आहे. त्यातही हाच हेतू दर्शित केला आहे.’
राजवाड्यांनी महाराजांच्या धोरणांचा थोडक्यात आढावा घेतला. ‘स्वराज्य, गनीमाई, सरदेशमुखी व चौथाई या मागण्या मोंगलाईतून करण्याचा शिवाजीने परिपाठ ठेवला. यात स्वराज्यसाधनाचा बराच इतिहास गर्भित आहे. आपण मोंगलांच्या राज्यातील प्रांताचे सरदेशमुख आहोत, हा प्रांत पूर्वी मराठ्यांच्या स्वराज्यात मोडत होता व मोंगल लोक मराठ्यांना गनीम म्हणत, त्याअर्थी गनीमाईचा पैसा त्यांच्यापासून चोपून घेऊन उणे अक्षर बोलल्याची आठवण त्यांना जन्मोजन्म व्हावी, इत्यादी अर्थ या शब्दापासून ध्वनित होतात…’
‘स्वराज्य साधून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा विचार शिवाजीच्या राजनीतीत प्रधान होता’, हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी लिहिले, ‘महाराष्ट्रसंस्थांमध्ये अष्टप्रधानघटित राज्यव्यवस्थेचाही अंतर्भाव होतो. राष्ट्राच्या कल्पनेत राष्ट्रभाषेचाही समावेश होतो. शिवाजीराजे अवतीर्ण होईतोपर्यंत दक्षिणेतील मुसलमानांच्या संसर्गाने जावली, शृंगारपूर इत्यादि स्थलींच्या मराठा राजांच्या दरबारी व खुद्द शिवाजी राजांच्या पराक्रमाला सुरुवात होऊन त्यांच्या अभिषेककालापर्यंत त्यांच्या दरबारीदेखील फारसी व मुसुलमानी भाषेतील शब्दांचाच वापर चालत असे. त्यामुळे स्वराज्याची शुद्ध कल्पना मराठ्यांच्या मनात अस्पष्ट राहण्याचा संभव होता. म्हणून शिवाजीने फारशी शब्द टाकून त्यांच्याऐवजी संस्कृत व महाराष्ट्र शब्दांचा उपयोग करण्याचा परिपाठ घातला…’
‘महाराजांच्या नंतर संभाजीराजे, राजाराम, शाहू या सर्वांनी स्वराज्यसाधनाचा कित्ता उत्तम गिरवला. १७१४ मध्ये शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथास स्वराज्यसाधन करण्याकरता मलतबाची याद करून दिली. त्याच हेतूने बाळाजी दिल्लीला गेला व १७१९ मध्ये स्वराज्याच्या मतलबाच्या सनदा सय्यदबंधूंकडून करवून घेऊन तो सातार्याला परत आला. पुढे १७२० एप्रिलमध्ये बाजीरावाला पेशवाई मिळाली. त्या वेळी बाळाजीकडून साधावयाच्या राहिलेल्या मतलबांची याद जशीच्या तशी शाहूने बाजीरावाच्या स्वाधीन केली. विशेष म्हणजे या दोन्ही याद्यादेखील राजवाड्यांनी आपल्या विवेचनाला परिशिष्टासारख्या जोडल्या. त्या सर्व मतलबांमध्ये म्हणजे कामांमध्ये स्वराज्यसाधन हाच हेतू असल्याचे स्पष्ट दिसत होते. पुढे त्याच्या कारकीर्दीतील पहिली दहा-अकरा वर्षे त्या यादीतील मतलब साधण्यात गेली. १७३१ मध्ये बाजीरावाने त्या यादीतील सर्व कलमे साधली. तिथपर्यंत म्हणजेच १७३१ पर्यंत मराठ्यांच्या खटपटी स्वराज्यसाधनार्थ झाल्या.’ ‘हिंदुपदबादशाही स्थापनेबद्दल बाजीरावाने शाहूपुढे केलेली प्रस्तावना सर्वश्रुत आहे’, असे सांगून राजवाड्यांनी १७५० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला. ते साल शाहूंच्या मृत्यूचे म्हणून तो एक टप्पा मानला.
