दक्षिणेतील घडामोडींची दखल घेऊन त्यांचा रोख आपल्या बाजूला वळवून घेण्याच्या इराद्याने शक १५५१च्या अखेरीस खुद्द शहाजहान बर्हाणपुरास आला, ही महत्त्वाची माहिती सांगून राजवाड्यांनी नंतर लगेच परिस्थिती त्यामुळे कशी पालटत गेली, ते स्पष्ट केले. त्यांनी लिहिले, ‘शहाजहानचा व आदिलशहाचा लोदीला आश्रय न देण्याचा तह ठरला, त्यानुसार आदिलशहाने लोदीला आश्रय देणार्या शहाजीच्या पुणे प्रांतावर मुरार जगदेवास पाठविले. शहाजहानने इकडे आल्याबरोबर पहिली मसलत अशी केली की, शहाजीला लोदी पक्षातून फोडले. दिल्लीपतीशी सामना करण्याची अद्याप आपली ऐपत नाही व शहागडास आपण उभारलेला डोलारा औट घटकाहि टिकणार नाही, हे धूर्त शहाजी जाणून होता. शहाजहानाचे बोलणे मान्य करून शहाजीने लोदीला निरोप दिला आणि स्वत: दिल्लीश्वराचा मनसबदार बनून मिळविलेला प्रांत दाबून बसला. पातशाही मनसबदारी पतकरण्यात शहाजीचा एक हेतू असा होता की, आदिलशाही मुत्सद्द्यांच्या हातून आपणास इजा होऊ नये आणि दुसरा हेतू असा होता की, आपल्या जहागिरीवर निजामशहाने हक्क सांगू नये’…
परंतु त्याने पातशाही पंचहजारी सरदारकी पतकरण्याचा अर्थ हाही झाला की शहाजीच्या ताब्यातील मुलूख मोंगलाईचा अंश झाला. त्यावर राजवाड्यांनी लिहिले, ‘लढाई केल्यावाचून फुकटाफाकट निजामशाहीचा प्रांत मिळाला व (शहाजीसारखा) एक उपद्व्यापी लढवय्या गप्प बसविता आला, अशी फुशारकी शहाजहानाला वाटली. पुढेमागे इष्ट वाटेल तेव्हा हा तह मोडता येईल, असा मनोदय शहाजी व शहाजहान या दोघांचाहि होता. तह झाल्यावर आदिलशाही मुत्सद्दी शहाजीच्या वाटेस गेले नाहीत. मुरारपंताने आपला मोर्चा शहाजीऐवजी निजामशाहीच्या कोकणप्रांताकडे वळविला आणि शहाजी संगमनेरादि प्रांत दाबून बसला. तिकडे शहाजहानाने धारूरपर्यंतचा निजामशाही प्रांत आक्रमिण्याचा विचार केला. महामूर्ख मूर्तिजाच्या अंगाचे तिन्ही बाजूंनी तीन हिंस्र श्वापदांनी तीन लचके तोडण्याची तयारी केली…’
‘दुबळ्या मूर्तिजाच्या बोकांडीस ही मनुष्यकृत हानि शक १५५१च्या अखेरीस बसल्यानंतर शक १५५२ मध्ये दैवी हानीने त्याला पालथे पाडले’, अशा शब्दांत निजामशहाच्या त्रेधातिरपिटीचे वर्णन करून राजवाड्यांनी पुढे रेखाटलेले चित्र विलक्षण होते. त्यांनी लिहिले, ‘शक १५५२मध्ये गोदातीरी अवर्षणाने भयंकर दुष्काळ पडला. एका हुनक्यास (लहान होनास) दोन शेर दाणे झाले. करवसुली शक्य नसल्यामुळे मूर्तिजाची खंगावलेली तिजोरी शुष्क होऊन गेली. फौज परागंदा, कारभारी अजुर्दा (उदासीन, दु:खीकष्टी) व मुलूख उकीर्डा बनून, मूर्तिजा हलाखीच्या शेवटच्या पायरीस पोहोचला…’
परंतु तो भयानक दुष्काळ निजामशाहीच्या दृष्टीने इष्टापत्तीच ठरली. कशी ते स्पष्ट करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘शक १५५२साली मूर्तिजाच्या तिन्ही शत्रूंच्या हालचाली काही काळ स्तब्ध राहिल्या. पंचमहाभूतांच्या प्रकोपापुढे शत्रुमित्र सार्यांच्याच नाड्या आखडल्या. शहाजहानाचे साल दक्षिणेत फुकट गेले. आदिलशाही मुत्सद्दी निजामशाही मरू द्यावी की तरू द्यावी, हा विचार करीत बसले. शहाजी दुष्काळानंतरच्या बनावाला तोंड देण्याकरिता आपले हत्यार पाजवीत राहिला आणि तिघांचा भक्ष्य जो मूर्तिजा तो दैवी, मानवी संकटांतून पार पडण्याचा मार्ग शोधू लागला… निजामशाहीची ही अशी हलाखी झालेली पाहून शहाजी व आदिलशाहीतले मुत्सद्दी यांनाच दया आली. शिवाय निजामशाही बुडाली असता आपल्या व मोंगलांच्या मधील पाचर नाहीशी होईल, मोंगलांशी प्रत्यक्ष रणांगणावर गाठ पडणे बरे नव्हे, हे आदिलशाही मुत्सद्दी जाणून होते. म्हणून त्यांनी मूर्तिजाशी तह केला…’
त्या तहातील तरतुदी कोणत्या होत्या, याचा तपशील देत राजवाड्यांनी पुढे लिहिले की, ‘मुरारपंताने गेल्या दोनचार महिन्यांत जिंकिले होते, ते प्रांत निजामशहाने आदिलशहास द्यावेत, शहाजीने जिंकलेला प्रांत शहाजीकडेच ठेवावा, आदिलशहाने निजामशहास मोंगलांविरुद्ध मदत करावी, मलिकंबरच्या पुत्राला-फत्तेखानाला-बंधमुक्त करू नये वगैरे करारमदार ह्या तहात ठेवले व निजामशाहीचे मरण किंचित लांबणीवर ढकलले गेले…’
anand47.hardikar@gmail.com
