वि. का. राजवाडे यांच्या विविधांगी कार्यामधील अभिलेखांच्या संशोधनासारख्या काहीशा चाकोरीबाहेरच्या पैलूचा अगदी संक्षिप्त धावता आढावा आवरता घेण्यापूर्वी आणि त्याच क्षेत्रातल्या शेवटच्या उदाहरणाची माहिती सांगण्यापूर्वी त्यांच्यावरील टीकेचा एकच मुद्दा इथे थोडक्यात उल्लेखावासा वाटतो. ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाचे व्यासंगी लेखक डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी राजवाडे यांच्या संशोधन पद्धतीविषयीचे काही आक्षेप आपल्या प्रस्तावनेत नोंदवले आहेत. त्यांच्यापैकी एकाचाच येथे उल्लेख करतो.

‘राजवाडे शिलालेखाचा वा ताम्रपटाचा ठसा देत नाहीत. शिलालेख सहसा नष्ट होत नाहीत, पण ताम्रपट ही नष्ट वा भ्रष्ट होणारी वस्तु असल्यामुळे त्यांचा ठसा देणे अत्यंत आवश्यक असते’, हा डॉ. तुळपुळे यांचा आक्षेप राजवाड्यांवर कसा अन्याय करणारा आहे, हे गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांनी स्पष्ट केले होते. डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या ‘शोधमुद्रा’ या अभिलेखविषयक ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले होते, ‘राजवाड्यांचे ऐतिहासिक लेखसंग्रह प्रकाशित होऊ लागले, तेव्हा त्यावर एक टीकाही होती की, हे शास्त्रशुद्ध संपादन नाही, प्रत्येक कागदपत्राचा ठसा हवा. राजवाड्यांनी उत्तर देताना ही गरज मान्य केली होती व असे म्हटले होते की, अशा प्रकारच्या प्रकाशनाचा खर्च कुणी जर सोसणार असेल, तर आपण विनामूल्य सेवेला तयार आहोत. एरवी आमच्या शक्तीत या विदुराच्या कण्या आहेत, त्या गोड मानून घेणे भाग आहे’… आणि डॉ. देशपांडे सरांनी अधिक परखड प्रतिक्रिया नोंदवत लिहिले होते, ‘राजवाडे अनिकेत आणि अकिंचन होते, त्यांना राजाश्रय अथवा लोकाश्रयही नव्हता, हे डॉ. तुळपुळे ह्यांना पुरतेपणी ठाऊक आहे. आपला ग्रंथ सिद्ध करताना डॉ. तुळपुळे यांच्या सेवेशी पुणे विद्यापीठाची सर्व साधनसंपदा होती. त्यांनी इतिहासाचार्यांना समजून न घेताच ताशेरे ओढले आहेत.’

राजवाड्यांवरील एका बहुचर्चित आक्षेपाचे असे निराकारण करून झाल्यावर आता फक्त त्यांनी उजेडात आणलेल्या वाईच्या दोन मराठी मोडी ताम्रपत्रांबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ या. कोल्हापूरहून प्रकाशित होणार्‍या ‘विश्ववृत्त’मधून १९०६ साली त्यांनी या ताम्रपत्रांबद्दलचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध केला होता. त्या लेखात ताम्रपत्रांबद्दलची प्राथमिक माहिती देत त्यांनी लिहिले होते, ‘ही दोन ताम्रपत्रें वाई येथील श्रीमंत तात्यासाहेब पंत, राजाज्ञा, यांच्याकडची आहेत. पहिलें ताम्रपत्र शक १४६३मधलें (इसवी सन १५४१मधले) आहे, तर दुसरें शक १४५२मधलें (इसवी सन १५३०मधले) आहे. पहिल्याचे दोन पत्रे असून पहिल्या पत्राच्या पोटावर लिहिलें आहे, पाठ रिकामी आहे आणि दुसर्‍या पत्राच्या दोन्ही बाजूंवर लेख आहे. दुसर्‍या ताम्रपत्राचा एकच पत्रा असून तें दोन्ही बाजूंनीं कोरलेलें आहे. दुसर्‍या ताम्रपत्राचा पत्रा तीन ठिकाणीं आडवा फुटून त्याचे लहानमोठे चार भाग झाले आहेत. पहिल्या ताम्रपत्राच्या तीन पृष्ठावर एकंदर ५२ ओळी आहेत, तर दुसर्‍याच्या दोन पृष्ठांवर मिळून ४९ ओळी आहेत. अक्षरांचे वळण मुसुलमानी रियसायतींतील वळणासारखे आहे…’

आपल्या लेखनातून राजवाडे वेळोवेळी समाजात पसरवल्या जाणार्‍या गैरसमजुतींचे कसे साधार निराकरण करीत, याचे एक चांगले उदाहरण म्हणजे त्यांनी या दोन ताम्रपत्रांवरील लेखाचा केलेला समारोप. कुणा तरी रा. रा. गुप्ते नामक गृहस्थांनी ‘मोडीची कल्पना प्रथम बाळाजी आवजी चिटणीस याने काढिली, ती हेमाडपंतानें काढिली हें वर्तमान कोकणस्थांनी उठविले आहे’, असे विधान दोन-तीन ठिकाणी केले होते. त्याचे खंडन करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘ही दोन्ही ताम्रपत्रें अस्सल असून तीं अनुक्रमें शक १४५२ व १४६३ ह्या सालांतील आहेत… शिवाजीच्या जन्माअगोदर ९७ व ८६ वर्षे ही तामपत्रें कोरून झालीं होतीं. शक १५७१च्या सुमाराला शिवाजीने बाळाजी आवजीला कोकणातून आपल्याजवळ आणिलें. म्हणजे बाळाजी शिवाजीच्या पदरीं राहण्यापूर्वी हीं मोडी ताम्रपत्रें होऊन अनुक्रमें ११९ व १०८ वर्षें लोटली होती. अर्थात् मोडीची कल्पना बाळाजी आवजीच्या पूर्वीची आहे, यात काडीचाहि संशय नाहीं…’
आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com