युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर आपण भारत, चीन आणि ब्राझील या मित्रदेशांबरोबर सतत संपर्कात आहोत अशा आशयाचे विधान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केल्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे देश युक्रेन पेच सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, असे पुतिन यांनी व्लाडिवोस्टॉक येथील एका परिषदेत म्हटल्याचे वृत्त आहे. वस्तुत: युक्रेन युद्धावर दोन वर्षांपूर्वीपासूनच तुर्कीये येथे रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. पण ती फार पुढे सरकू शकली नाही हे उघड आहे. त्याऐवजी युक्रेन आणि रशिया परस्परांसमोर युद्धभूमीवरच पुढे सरकण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. याची जबर किंमत दोन्ही देशांना मोजावी लागत आहे. युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहेच. पण रशियादेखील रणजर्जर झाला आहे. व्लाडिवोस्टॉकमधील त्या परिषदेत, ‘युक्रेनला वाटाघाटी करायच्या असल्यास आमची तयारी आहे’ असेही पुतिन म्हणाल्याचे वृत्त आहे. वास्तविक, युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात आणि विशेषत: गेल्या वर्षभरात रशियाची अर्थव्यवस्था अनपेक्षितपणे तगली आणि वाढलीही. याउलट युक्रेनला शस्त्रसामग्रीपासून ते इतर स्वरूपाच्या मदतीसाठी सध्या सर्वस्वी अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्या देशाची वित्तहानी किती झाली, याची तर मोजदादही झालेली नाही. या युद्धातून सावरण्यासाठी युक्रेनला कित्येक वर्षे आणि अब्जावधी निधी लागणार आहे. तरीदेखील अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या युक्रेनने वाटाघाटींची शक्यता गृहीत धरलेली नाही. या युद्धजन्य वातावरणाच्या परिप्रेक्ष्यात मोदी यांनी गेल्या दोन महिन्यांत दोन्ही देशांना दिलेल्या भेटी आणि पुतिन यांच्या वक्तव्याची सांगड घालावी लागेल.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरुन : १०० दिवसांत बेकारीची शंभरी भरली नाहीच!

काही भारतीय माध्यमांनी याकडे ‘मोदी व भारताकडे समेट घडवून आणण्यासाठी चालून आलेली संधी’ अशा दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली आहे. अशांना पुतिन यांच्या वक्तव्यातील ‘भारत’ तेवढा दिसून आला. पण त्या विधानात चीन आणि ब्राझील यांचीही नावे होती या वास्तवाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. ब्राझीलचे एक वेळ सोडा, पण कोणत्याही प्रक्रियेत चीनकडून भारताला समाविष्ट करून घेतले जाण्याची शक्यता तूर्त जवळपास शून्यच. कारण या दोन देशांमध्ये आपसांतला सीमावाद आहेच. शिवाय चीनला पर्याय म्हणून भारताकडे भरवशाचे उत्पादन केंद्र आणि पुरवठा शृंखलाबिंदू म्हणून वळता येऊ शकते याविषयी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी अवास्तव बागुलबुवा करून ठेवला आहे. त्याकडे पाहून चीनच्या मनात भारताविषयी संशय अधिकच वाढला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुतिन म्हणतात त्यानुसार, युक्रेनशी चर्चा करण्याची किंवा दोन देशांमध्ये युद्धसमाप्तीसाठी वाटाघाटी करण्याची जबाबदारी भारत आणि चीन एकत्रितपणे कशी पार पाडणार, हा पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा चीनच्या सध्याच्या भूमिकेचा. भारताने रशियामैत्रीचे दाखले देऊनही युद्धाबाबत तटस्थ राहण्याचे ठरवले आणि या तटस्थपणावर अनेक देशांचा विश्वास आजही आहे. चीनचे तसे नाही. अमेरिकाविरोधाची सुसंधी मानून चीनने युद्धाच्या सुरुवातीपासूनच पुतिन यांचे समर्थन केले आहे. हे करत असताना मध्यस्थीची कास धरत युक्रेनशी चर्चाही अधूनमधून सुरू ठेवली असली, तरी त्यांच्या हेतूंविषयी युक्रेनच्या मनात संशय कायम आहे. आता तर रशियाच्या काही विध्वंसक शस्त्रांमध्ये चिनी दूरसंचार प्रणाली वापरली जात असल्याचाही संशय बळावला आहे. सबब, चीनचा हेतू शुद्ध नाही आणि तरीदेखील या देशाला वाटाघाटींसाठी आणण्याचा रशियाचा खटाटोप आहे. तेव्हा पुतिन यांचाही हेतू किती शुद्ध असेल, याविषयी रास्त संदेह उपस्थित होतो. या त्रांगड्यामध्ये झोत खऱ्या अर्थाने भारतावर येतो. प्रश्नांची सोडवणूक युद्धाने करण्याचे हे युग नव्हे, असे मोदींनी पुतिन यांना जाहीरपणे सुनावले आहेच. पण पुतिन यांना खरोखरच भारताने काही भूमिका निभावावी असे वाटत असते तर दोन गोष्टी घडल्याच नसत्या. मोदी रशियाभेटीवर गेले, त्याच दिवशी त्या देशाने युक्रेनमधील एका शाळेवर भीषण हल्ला केला, ज्यात शाळकरी मुले गतप्राण झाली. ‘मित्र’ मोदींच्या भेटीची चाड तेव्हा राखली गेली नाही. मोदी युक्रेनमध्ये गेले, त्याच्या काही दिवस आधीपासून रशियाने युक्रेनवर हल्ल्यांची तीव्रता वाढवली. अशा परिस्थितीत मोदी किंवा चीन वा ब्राझील यांनी वाटाघाटी कराव्यात या पुतिन यांच्या इच्छेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज किती हे ज्याने-त्याने ठरवावे!