If God created us in his own image, we have more than reciprocated. – Voltaire
तत्त्वज्ञान या शब्दाचा मर्यादित अर्थ घेतला तर हा शब्द कांट, हेगेल, सार्त्रसारख्या फार कमी तत्त्वज्ञांना लागू होईल ज्यांनी प्रस्थापित निकषांनुसार तत्त्वज्ञान ग्रथित केलं आहे. खरंतर, तत्त्वज्ञानाची ही पारंपरिक आणि कर्मठ व्याख्या तत्त्वज्ञ- तत्त्वज्ञेतर या फारकतीला बळकटी प्रदान करणारी आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना वाटतं की त्यांचा तत्त्वज्ञानाशी काही संबंध नाही.
पण तत्त्वज्ञानाच्या प्रस्थापित व्याख्येला प्रश्नांकित करून तिची कक्षा रुंदावली तर शेक्सपियरसारखे साहित्यिक, नेपोलियनसारखा राज्यकर्ता आणि फ्रेंच राज्यक्रांतीसारखी घटनासुद्धा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं आशयघन ठरते. व्होल्तेरचं एकूण साहित्य, त्याचं जीवन आणि त्याच्या विचारांनी प्रेरित असलेली फ्रेंच राज्यक्रांती, या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला तर तत्त्वज्ञान या शब्दाच्या मर्यादित अर्थासोबतच विस्तृत अर्थ लागू करणं अधिक सयुक्तिक ठरेल.
याआधी आपण पाहिलं की, १८व्या शतकातलं प्रबोधनपर्व एकजिनसी नसल्यानं प्रबोधनपर्वाचा संकोच एकाच सत्ताशास्त्रीय, ज्ञानशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय आणि नीतीशास्त्रीय चौकटीत करता येत नाही. प्रबोधनयुग हा विचारांच्या परिपक्वतेचा, पुनरावृत्तीचा आणि सूत्रबद्धतेचा काळ आहे. प्रबोधनाच्या विचारविश्वात विवेकवादी, अनुभववादी, भावनावादी, वैश्विकवादी, देशीवादी, अतीतवादी, इतिहासवादी अशा सगळ्यांचा द्वंद्वात्मकरीत्या अंतर्भाव होतो.
प्रबोधनपर्वात हे सगळे विचार पुस्तकांमधून ‘बाहेर पडून’ वास्तव जगात प्रवेश करून मानवी व्यवहाराला प्रकाशमान करतात. पण मानवी जीवनाच्या मूलभूत द्रव्याचा उलगडा करणारे अनेकविध आणि परस्परविरोधी तत्त्वविचार ग्रंथामधून आपोआप बाहेर पडत नसून त्यासाठी प्रस्थापित ज्ञानव्यवहाराबाहेरच्या जगाशी जिवंत नातं असणारे व्होल्तेरसारखे हाडाचे ‘इन्टलेक्च्युअल’ लागतात. त्यादृष्टीने प्रबोधनपर्व ज्ञाननिर्मिती सोबतच ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची प्रक्रिया आहे जिच्यामध्ये व्होल्तेरनं एक लोकशिक्षक ( Le vulgarisateur des idé es) म्हणून ऐतिहासिक भूमिका पार पाडली आहे.
उदाहरणार्थ, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना व्होल्तेरमध्ये फक्त ‘लर्नेड’ अर्थात उच्चविद्याविभूषित तत्त्वज्ञ दिसला नसून धर्मांधता, असहिष्णुता, अन्याय, विषमता, अज्ञान, दारिद्र्यसारख्या गोष्टींविरूद्ध रस्त्याची लढाई लढणारा ‘इन्टलेक्च्युअल- योद्धा’ दिसला. कदाचित त्यामुळे डॉ. आंबेडकर म्हणाले की, भारतातील प्रस्थापित वर्गात ‘लर्नेड’ लोक होऊन गेले. पण व्होल्तेरसारखा ‘इन्टलेक्च्युअल’ झाला नाही. प्रस्तुत लेखात व्होल्तेरचा एक लोकशिक्षक म्हणून विचार केला जाईल.
१६९४ मध्ये सुखवस्तू बूर्ज्वा अर्थात मध्यमवर्गात जन्मलेल्या व्होल्तेरची आई वयाच्या सहाव्या वर्षी वारली. विलक्षण बुद्धी पण नाजूक प्रकृती असलेल्या व्होल्तेरच्या शिक्षणाची व्यवस्था पॅरिसच्या प्रतिष्ठित लुई-ल-ग्राँ या कॉलेजमध्ये करण्यात आली. या निवासी कॉलेजात उमराव वर्गातल्या मुलांप्रमाणेच मध्यम वर्गातल्या मुलांनाही दाखल केलं जात असे. पण उमराव वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र महाल आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मात्र एकाच खोलीत समूहानं राहावं लागे.
कोवळ्या वयातच व्होल्तेरला इतिहासानं लादलेल्या विषमतावादाची आणि त्याच्या दुय्यम सामाजिक स्थानाची जाणीव झाली. मुलानं कायद्याचं शिक्षण घेऊन चांगली नोकरी पदरात पाडून भविष्य सुरक्षित करावं, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र वडिलांच्या या मध्यमवर्गीय इच्छेविरुद्ध बंड पुकारून व्होल्तेर लेखक, नाटककार आणि कवी होण्याचं स्वप्न पाहू लागला. त्याच्याठायी लहानपणापासूनच मध्यमवर्गीय संकुचित मानसिकता आणि सुरक्षिततेविषयी तिरस्कार होता. त्यामुळे त्याचं त्याच्या वडिलांशी कधीही पटलं नाही. विद्यार्थिदशेपासूनच तो बौद्धिक क्षमतेच्या बळावर जन्माने मोठ्या ठरणाऱ्या उमराव वर्गाची बरोबरी करण्याचं स्वप्न बाळगलं.
लुई-ल-ग्राँमध्ये असताना व्होल्तेर लॅटिनवर प्रभुत्व मिळवून लॅटिनमध्ये विडंबनपर कविता रचून उच्चभ्रू जगाला आश्चर्यचकित करतो. वयाच्या २४व्या वर्षी ईडिपसबद्दल त्यानं लिहिलेल्या Œ dipus या अभिजात नाटकाचे पॅरिसमध्ये सलग ४५ प्रयोग सादर केले जातात. या नाटकाच्या अभूतपूर्व यशामुळे उमराव वर्गाची दारं व्होल्तेरसाठी उघडतात. त्याच्या वडिलांना चुकीचं ठरवून शेवटी तो मोठ्यांच्या जगात, मोठ्यांच्या पंगतीत जाऊन बसतो. बहुसंख्य गोरगरिबांचं जग, नव्यानं प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या बूर्ज्वा मध्यमवर्गीयांचं जग आणि पॅरिसमधलं उच्चभ्रू उमरावांचं अभिजात जग यांच्यामधल्या दरीचा तो जवळून अनुभव घेतो.
तुरुंगातली नवी ओळख!
याच दरम्यान व्होल्तेरला एका ‘राजद्रोही’ कवितेमुळे बास्तीईच्या कुख्यात तुरुंगात ११ महिने कैदेची शिक्षा होते. खरंतर, हा तुरुंगवास त्याच्यासाठी वरदान ठरतो. कारण कैदेत असताना, वडिलांनी ठेवलेलं Arouet हे नाव त्यागून Voltaire नावानं सही करायला तो सुरुवात करतो. एकप्रकारे जुन्या जगाची कात टाकून नव्या जगात स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण करण्याची ही सुरुवात ठरते. खरंतर, बास्तीईच्या तुरुंगवासामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळते. त्या काळी पॅरिसमध्ये उच्चभ्रू उमरावांचं छोटंसं लिबर्टीन जग होतं जिथं टोकाचं विचार, आचार आणि उच्चार स्वातंत्र्य असे. या लिबर्टीन जगात बऱ्याचदा स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतली सीमारेषा धूसर होत असत. त्यामुळे अनेकदा पॅरिसच्या पुढारलेल्या लिबर्टीन जगाच्या गोष्टी संपूर्ण युरोपला धक्का देणाऱ्या ठरत. अशा जगाच्या केंद्रस्थानी तरुण व्होल्तेर स्वत:ला प्रस्थापित करतो. कालौघात उमराववर्गात त्याचा मित्रपरिवार निर्माण होतो.
उमराववर्गाच्या आलिशान पार्ट्यांमध्ये व्होल्तेरला आवर्जून निमंत्रण मिळू लागतं. त्याला वाटू लागतं की शेवटी उमराववर्गानं त्याला आपल्यातला एक म्हणून स्वीकारलं आहे. पण एकदा व्होल्तेर नेहमीप्रमाणे सार्वजनिक संभाषणाच्या केंद्रभागी मोठ्या आत्मविश्वासानं विविध विषयांवर विद्वत्तापूर्ण आणि तितकंच रोचक भाष्य करत उमराववर्गातल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतानाच, एका प्रतिष्ठित उमराव घरण्यातल्या व्यक्तीला व्होल्तेरचं असं केंद्रस्थानी असणं खटकतं. तो व्होल्तेरचा अपमान करण्याच्या हेतूनं व्होल्तेरच्या नावाची थट्टा करत विचारतो, ‘कोण आहे हा इसम? व्होल्तेर हे काय नाव आहे? व्यवस्थित नाव नसताना इतक्या तोऱ्यात बोलतोय!’
या अपमानास्पद वागणुकीला हजरजबाबी व्होल्तेर उत्तर देतो, ‘माझ्याकडे प्रस्थापित नाव नसलं तरी जे काही माझं नाव आहे ते स्वकर्तृत्वाने कमवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे माझ्या नावाची सुरुवात आहे तर तुझ्या नावाचा शेवट आहे.’ प्रस्थापित संकेतांनुसार उमराववर्गातील व्यक्तीला खालच्या वर्गातील व्यक्तीने प्रतिउत्तर देणं अपेक्षित नव्हतं. तसं करणं अपराध ठरत असे. त्यामुळे त्या उमरावानं आपल्या नोकरांकरवी व्होल्तेरवर हल्ला घडवून आणला. त्याची माणसं व्होल्तेरला मारहाण करतात तेव्हा मात्र तो त्यांना सांगतो, ‘त्याच्या डोक्यावर मारू नका. उद्धट असला तरी तो बुद्धिवान आहे’- हे शब्द ऐकून बघ्याची भूमिका घेणारे लोक, उमराव व्यक्तीच्या मोठेपणाची वाहवा करतात.
वयाच्या तिसाव्या वर्षी घडलेल्या या प्रसंगामुळे व्होल्तेरचे डोळे उघडतात. त्याचा भ्रम तुटून त्याला त्याच्या दुय्यम सामाजिक स्थानाची कटू आठवण करून दिली जाते. खरं तर, उमराववर्गात त्याचा मोठा मित्रपरिवार असतो. उमराववर्गातील मित्र त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतात पण मदत मात्र कुणी करत नाही. उलट तत्कालीन राजवट व्होल्तेरवर कारवाई करून त्याला बास्तीईची वारी घडवून आणते. शेवटी शिक्षा म्हणून त्याला फ्रान्स सोडून नव्या जगाच्या शोधात इंग्लंडची वाट धरावी लागते. खरंतर, ही शिक्षा व्होल्तेरमध्ये ज्वालामुखी जागृत करणारी घटना ठरते. त्यानंतर, तब्बल ५४ वर्षं त्याच्या लिखाणातून आणि कृतीतून तो जुन्या राजवटीच्या ( l’ Ancien Ré gime) मुळावर घाव घालतो आणि स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्यायसारख्या मूल्यांचा प्रचार प्रसार करतो.
त्यामुळे व्होल्तेर १७८९ मध्ये सुरू झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा महत्त्वाचा संदर्भबिंदू ठरतो. खरंतर, फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली तेव्हा व्होल्तेरचा मृत्यू होऊन ११ वर्षं उलटली होती. सोळाव्या लुईचा शिरच्छेद करून राजेशाहीच्या अंतासोबतच ‘जुन्या जगाचा’ ( l’ Ancien Ré gime) शेवट घडवून आणणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीला अनेक ऐतिहासिक घटक जबाबदार असले, तरी वैचारिक अधिष्ठानाच्या बाबतीत व्होल्तेर आणि रुसो या तत्त्वज्ञ-द्वयीचा उल्लेख फ्रेंच राज्यक्रांतीचे शिल्पकार म्हणून केला जातो.
जुन्या राजवटीच्या धार्मिक अधिष्ठानाला मूठमाती देऊन १७९१ मध्ये नव्या वैचारिक अधिष्ठानाची मुहूर्तमेढ करण्यासाठी पॅरिसमधील सेंट जन्व्हिएव्ह या चर्चचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकमध्ये ( Panthé on) करण्यात येतं तेव्हा तिथं व्होल्तेरची भव्य समाधी उभारली जाते. नव्या जगाचा मार्गदर्शक म्हणून त्याचा गौरव केला जातो. पण व्होल्तेरनं धर्मांधता, असहिष्णुता, विषमता, दारिद्र्य, अन्याय, अज्ञानाच्या विरोधात संपूर्ण आयुष्य वेचलं असलं तरी त्याला राजेशाहीचा अंत करणारी ‘रक्तरंजित क्रांती’ अभिप्रेत होती का? खरंतर, व्होल्तेरसोबत रुसोचीसुद्धा नव्या युगाच्या राष्ट्रीय स्मारकामध्ये समाधी उभारून त्याचा फ्रेंच राज्यक्रांतीचा मार्गदर्शक म्हणून गौरव केला जातो. पण प्रबोधनपर्वाच्या या दोन दिग्गजांच्या नव्या जगाविषयीच्या संकल्पना निव्वळ एकमेकांपेक्षा वेगळ्याच नसून परस्परविरोधी आहेत. पुढल्या लेखात व्होल्तेरच्या जीवनविषयक दृष्टिकोनाची चर्चा करू, त्यातून त्याच्या रुसोशी असलेल्या वैचारिक वैराचाही उलगडा होईल.
फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक
sharadcrosshuma@gmail.com
