कबड्डीच्या मैदानावर बचाव कसा असावा, याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास तारक राऊळ हे नाव झटकन डोळ्यांसमोर येते. चढाई आणि क्षेत्ररक्षण करतानाचा त्यांचा बचाव कोणीच ओळखू शकत नसे. त्यामुळे ७०-८०च्या दशकात तारक सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले.

डाव्या आणि उजव्या, अशा दोन्ही बाजूंनी ते बेमालूम चढाई करत. एकदा उजव्या बाजूने आले, तर पुढच्या वेळेस ते उजव्या बाजूनेच येतील असे नाही. त्यामुळे तारक समोर असले, की प्रतिस्पर्धी संघाचे नियोजन पुरते ढासळून जात असे. तारक एवढा भरवशाचा खेळाडू मिळणे कठीण होते, इतका विश्वास त्यांनी स्वत:च्या कामगिरीने निर्माण केला होता.

चढाई करताना कधी लाथ मारून, तर कधी घसेरी मारून तारक गुण मिळवत असत. हे दोन्ही जमले नाही, तर झेप घेऊन हाताने ते गडी टिपत. चढाईला जातानाच त्यांनी समोरचा गडी हेरलेला असे आणि त्याला बाद करूनच ते परत येत. हा त्यांचा खास गुण होता. त्यांच्याकडे असलेले उत्तम चढाईचे कौशल्य आणि ते निभावू शकत असलेली अचूक सहायकाची भूमिका, यामुळे संघ प्रशिक्षक आणि कर्णधार यांना नियोजन करणे सोपे जात असे. तारक यांचा खेळ आणि गुण मिळविण्याची पद्धत दोन्हींमध्ये तंत्रशुद्धता होती. प्रेक्षकांपेक्षा संघाची गरज ओळखून खेळणे त्यांना नेहमीच आवडत असे. पण, तरीही ते प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्षेत्ररक्षण करताना सहायक कसा असावा, याचा तारक आदर्श होते. त्यांना हाताशी धरून कोपरारक्षक किंवा मध्यरक्षक कितीही हुशार चढाईपटू आला, तरी त्याची पकड करण्याचे धाडस ते दाखवत. बचावासाठी ओळखले जाणारे फिदा कुरेशी तारक यांचा विषय निघाला, की ही आठवण कायम सांगत.

विजयवाडा येथे १९७८मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तारक यांच्या याच गुणाचा फायदा घेत सीताराम यांनी अगदी अखेरच्या क्षणी सामना फिरवून महाराष्ट्राचा विजय साकारला होता. तेव्हा अवलिया चढाईपटू बलविंदर यांची सीताराम आणि तारक यांनी केलेली पकड निर्णायक ठरली होती. तारक यांची याहून वेगळी ओळख म्हणजे एचएमटीविरुद्धच्या एका सामन्यात ‘महिंद्रा’ संघ अडचणीत होता. तारक एकटेच मैदानात होते आणि समोरून तेव्हाचे अव्वल चढाईपटू कुप्पस्वामी चढाईला आले. त्यांनी मध्यरेषा ओलांडली खरी; पण त्यानंतरही आपली पकड कशी झाली, हे त्यांना कळलेही नाही. पुढे ‘महिंद्रा’ने सामना खिशात घातला.

तारक यांच्या अशा खेळामुळे मधू पाटील, वसंत ढवण, अशोक कोंढरे यांच्याशी त्यांचा चांगला समन्वय जुळला होता. सत्तरच्या दशकात सुरू झालेला त्यांचा प्रवास अविरत सुरूच होता. अनेक संघांकडून ते खेळले. भारताचेही प्रतिनिधित्व केले. मुंबईच्या कबड्डी खेळाचा हंगाम ज्या स्पर्धेपासून सुरू होतो, त्या शिवनेरी सेवा मंडळाच्या स्पर्धेत ते सलग २५ वर्षे खेळले- एक वर्ष रिझर्व्ह बँकेकडून, तर उर्वरित २४ वर्षे ‘महिंद्रा’ संघाकडून. एका हंगामात इतकी वर्षे खेळण्याचा विक्रम आजपर्यंत त्यांच्याचनावावर आहे.

निवृत्तीनंतरही तारक मैदानापासून दूर राहू शकले नाहीत. कधी प्रशिक्षक, तर कधी व्यवस्थापक म्हणून ते मैदानात दिसत राहिले. वयाच्या सत्तरीत तरुणांना शिकवताना त्यांचे पदलालित्य त्यांच्या काळातील खेळाची आठवण करून देत असे. आता ही पावले कायमची थांबली आहेत.