संगीताचे गायन दूरच, ते ऐकायचीही परवानगी नसलेल्या काळात कर्नाटक संगीतात एम. एस. सुब्बलक्ष्मी यांनी पहिले पाऊल ठेवले आणि स्त्री कलावंतांसाठी संगीताचा मार्ग अधिक प्रशस्त केला. त्यांच्या पाठोपाठ डी. के. पट्टामल आणि एम. एल. वसंतकुमारी यांनी त्याच मार्गावरून संगीताची आराधना केली. कर्नाटक संगीत देशापरदेशात लोकप्रिय करणाऱ्या या कलावतींचे ऋण मान्य करत ‘बॉम्बे सिस्टर्स’ या नावाने सी. सरोजा आणि सी. ललिता या भगिनींनी केलेले सहगान ही भारतीय संगीत परंपरेची एक जागतिक ओळख ठरली. या भगिनींपैकी सी. ललिता यांच्या निधनाने या सहगानातील एक स्वर अनाहत झाला आहे. या दोन भगिनींचा जन्म त्रिचूरचा, शिक्षण मुंबईच्या माटुंग्यात आणि बी.ए.पर्यंतच्या पदव्या भोपाळ आणि दिल्लीतून. हा सारा प्रवास करीत या भगिनी त्या वेळच्या मद्रासमध्ये (आता चेन्नई) आल्याला आता सहा दशके झाली. सकाळी आकाशवाणीवर ऐकू येणारे त्यांचे भक्तिसंगीत ही साऱ्या देशाची सांगीतिक ओळख ठरली. कर्नाटक संगीत शैलीतील रागदारी संगीत हा त्यांच्या कारकीर्दीचा प्रमुख भाग असला, तरीही संस्कृत, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी या भाषांमधील त्यांनी गायलेले भक्तिसंगीत ही त्यांची उत्तरेकडील ओळख ठरली. या दोघींच्या सुरेल गळय़ावर एच. ए. एस. मणि, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर, टी. के. गोविंद राव यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांनी केलेले स्वरांचे संस्कार आणि या दोघींनीही त्या शिक्षणानंतर स्वत:च्या प्रतिभेने घातलेली भर, यामुळेच त्यांच्या गायनाची मोहिनी निर्माण झाली. उत्तर हिंदूस्तानी संगीतात दोघांनी एकत्रित करावयाच्या गायनास जुगलबंदी असे म्हणतात. त्यामध्ये दोन्ही कलावंतांमधील कलात्मक स्पर्धेचा अंश असे. कोण अधिक वरचढ याची ती परीक्षा असे. सहगान ही संकल्पना तीच. मात्र त्यात एकमेकांना पूरक ठरत, एकमेकांना प्रतिसाद देत, प्रेरणा देत एकत्र कला सादर करणे अपेक्षित असते. कुमार गंधर्व आणि वसुंधराताई कोमकली यांनी हिंदूस्तानी संगीतात असे सहगान केले. संगीताच्या क्षेत्रात महिलांचा प्रवेश फारच उशिराने झाला. हिराबाई बडोदेकर यांनी १९२२ मध्ये पहिल्यांदा जाहीर मैफलीत गायन केल्याची नोंद यासाठी महत्त्वाची. त्याच पायवाटेने जात कर्नाटक संगीतात एम. एस. सुब्बलक्ष्मी यांनी आपले स्थान पक्के केले. बॉम्बे सिस्टर्स म्हणजेच सी. सरोजा आणि सी. ललिता या दोघींचेही वेगळेपण असे, की त्यांनी संगीतातील प्रत्येक प्रयोग एकत्र केला. त्यांच्यातील एकात्मतेतूनच संगीतनिर्मिती झाली. या दोघींनी एक-दोन चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यानंतर त्यांच्यापैकी प्रत्येकीला स्वतंत्रपणे गायन करण्याची गळ संगीतकारांनी घातली, त्याला त्यांनी नम्र नकारही दिला. त्या दोघींना एकत्रितपणे पद्मश्री पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार प्राप्त झाले. एकमेकींच्या स्वरात स्वर मिसळून एकजीव, एकसंध गायनाने त्यांनी केलेले संगीतकार्य केवळ जाता जाता नोंद घेण्याइतके मुळीच नाही. संगीताचा दर्जा टिकवण्यासाठी कोणतीही तडजोड न करता त्यांनी अखंड सहा दशके संगीताच्या मैफलीची प्रतिष्ठा वाढवत नेली. सी. ललिता यांच्या निधनाने एक अतिशय शुभ्र स्वर अस्तंगत झाला आहे.
