धर्माधता, विषमतेच्या पोटातून जन्मलेले अंधारयुग उंबरठय़ावर पोहोचले तरी समाज मौन आहे; वैचारिक आंधळेपण आणि बहिरेपणामुळे विवेकवादी चळवळी क्षीण होत आहेत, ही गोष्ट दिवाकर मोहनी यांना अलीकडे अस्वस्थ करत असे. परंतु, या अंधारयुगातही समतेचे विचार प्रकाशाच्या नव्या वाटा दाखवतील, अभ्यास, चिंतन, कृती आणि आकलन या चार पायांवर उभा असा असलेला विवेकवाद मानवी मूल्यांचे रक्षण करेल, असा त्यांच्या मनातील सुप्त आशावादही तितकाच प्रबळ होता. याच आशावादाच्या साथीने त्यांची वाटचाल ९२ वर्षे चालली. या दीर्घ प्रवासात धर्म, राष्ट्र, वंश, जात, भेदांमुळे माणसामाणसात उभ्या राहिलेल्या भिंती कशा उद्ध्वस्त करता येतील यासाठी मोहनी यांची लेखणी अविरत झटत राहिली. या प्रेरक आयुष्याची सोमवारी १९ जून २०२३ रोजी अखेर झाली.
दिवाकर मोहनी हे जसे विवेकवादी विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते तसेच भाषा, लिपी व व्याकरण या विषयांतील तज्ज्ञही होते. ‘आजचा सुधारक’ या विवेकवादाला वाहिलेल्या वैचारिक मासिकातून त्यांनी स्त्रीमुक्ती, कुटुंबसंस्था, धर्मनिरपेक्षता आणि अर्थशास्त्र या विषयांवर सातत्याने लेखन केले. आजही नव्या पिढीने जिवंत ठेवलेल्या या मासिकाचे ते माजी संपादकही होते. दिवाकर मोहनी यांचा जन्म गांधीवादी कुटुंबातला. त्यामुळे गांधींच्या प्रेरणा, दृष्टी आणि जीवनकार्याचा आदर्श हा भावंडांप्रमाणे दिवाकर यांच्याही आयुष्याचा एक भाग बनला. गांधींच्या वैचारिक तत्त्वज्ञानाला आपल्या लिखाणाचा मुख्य आधार बनवून मोहनी यांनी स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे स्वरूप यासह विविध विषयांवर तर्कसंगत मते मांडली. मोहनी हे मुद्रण आणि देवनागरी लिपीचे अभ्यासक होते. त्यांचे देवनागरी लिपीवरील ‘माय मराठी.. कशी लिहावी.. कशी वाचावी..’ हे पुस्तक लिपीवरील संशोधनाच्या दृष्टीने आजही महत्त्वाचे मानले जाते. ज्येष्ठ विधिज्ञ के. एच. देशपांडे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या विनंतीवरूनच सुप्रसिद्ध कामगार नेते आणि तत्कालीन राज्यसभा सदस्य पु. य. देशपांडे लिखित ‘अमृतानुभव रसरहस्य’ या संत ज्ञानेश्वरांच्या भाष्यावर लेखन केलेल्या व पाच खंडात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचे पुनप्र्रकाशन करण्यात मोहनी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या ग्रंथामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अमूल्य अशी वैचारिक देणगी मिळाली. नागपुरातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘मातृसेवा संघा’शी मोहनी यांचे अतूट नाते होते. त्यांच्या भगिनी कमलाताई होस्पेट यांनी ही संस्था उभी केली होती हे तर सर्वश्रुतच आहे. दिवाकर मोहनी यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे त्यांना ‘भाषाव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या ‘शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकासाठी विदर्भ साहित्य संघातर्फे ‘डॉ. व्ही. व्ही. मिराशी’ स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. जिवंतपणी आपले उभे आयुष्य समाजाला देणाऱ्या मोहनी यांनी मृत्यूनंतरही आपला देह समाजालाच अर्पण केला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.