आयुष्यभर निरलस वृत्तीने समाजासाठी झटणारी माणसे दुर्मीळ होत चालली असताना डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे जाणे खिन्न करणारे ठरले. शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे आव्हानांची मालिका त्यांच्या पाचवीलाच पुजली होती. तरी आपल्या कृतिशील कार्याने आणि सर्वजण हिताय दृष्टिकोनातून त्यांनी या सर्व आव्हानांवर मात करीत मानवतेचा एक नवीन आदर्श उभा केला. असाध्य आजाराने आपल्याला गाठलेय हे कळताच मनुष्य निराश होतो, व्याधी चहूबाजूंनी आपला विळखा घट्ट करीत असताना जवळचे नातेवाईकही जवळ येऊ इच्छित नाहीत. अशा स्थितीत उरल्यासुरल्या जगण्यावरचा विश्वास आणखी ढासळतो. नेमक्या याच क्षणी नि:स्वार्थ सेवाभावाने त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे हाच खरा मानवतावाद आहे, यावर झिटे यांचा अपार विश्वास होता. झिटे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पाचगावचा. वध्र्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या उपचारासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्तांकडे दाखल झाले. उपचारानंतर तेथेच काम करू लागले. नि:स्वार्थी सेवाभाव हा त्यांच्या वृत्तीचा स्थायिभाव असल्यामुळे त्यांनी विद्वत्रत्न डॉ. भाऊजी दप्तरी यांनी स्थापन केलेल्या नागपूरच्या होमिओपॅथिक महाविद्यालयातून डीएचबी ही पदवी १९५६ मध्ये घेतली आणि त्यानंतर दाभा येथील ओसाड माळरानावर ‘आंतरभारती आश्रमा’ची मुहूर्तमेढ रोवली. सेवा, शिस्त आणि नैतिक आचरण हेच त्यांच्या या आश्रमाचे खरे भांडवल होते. म्हणूनच आश्रमात आचार्य दादा धर्माधिकारी व यदुनाथ थत्तेंसारखी माणसे अखेरच्या काळात येऊन राहिली. महात्मा गांधी निसर्गोपचाराचे उपासक होते. ते नेहमी म्हणत की, निसर्गोपचार हा कमी खर्चात प्रत्येक भारतीय बांधवाला सुदृढ व निरोगी बनवेल.
महात्मा गांधी हे डॉ. झिटे यांचेही श्रद्धास्थान. त्यांचा मूलमंत्र डॉ. झिटे यांनी आंतरभारती आश्रमाच्या उपचार पद्धतीचा केंद्रिबदू केला. निसर्गोपचार, सुयोग्य आहार, सुनियोजित जीवनशैलीचे मार्गदर्शन आणि होमिओपॅथी उपचाराने आश्रमात येणाऱ्या प्रत्येकच रुग्णाला केवळ त्या आजारातून मुक्त करूनच नाही तर जणू आश्रमातल्या वास्तव्याने ‘योगी’ बनवून घरी पाठवले. एका विवेकी समाजासाठी माणूस घडवण्याचे ध्येयच जणू झिटे यांनी बाळगले होते. या ध्येयातूनच त्यांनी योगशिक्षण, निसर्गोपचार आणि आध्यात्मिक प्रगती या क्षेत्रांत संपूर्ण विदर्भात सेवाभावी आश्रमाला प्रसिद्धीस आणले, एक वेगळी ओळख मिळवून दिली. मानवसेवा मंदिर रुग्णालयात रुग्णांवर उपचाराची सुसज्ज व्यवस्था तयार केली. वर्षांतील ३६५ही दिवस रुग्णसेवेत खंड पडू नये, यासाठी जिवाचे रान केले. त्यांनी लावलेल्या छोटय़ाशा प्रकल्पाचे आज मोठय़ा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हा वटवृक्ष आता दहाही दिशांनी विस्तारत आहे. झिटे यांच्या आश्रमामध्ये उत्कृष्ट गोशाळा आहे. ग्रामीण भागात उद्योगांची गरज लक्षात घेऊन खादी ग्रामोद्योग विक्री केंद्रही चालवले जाते. समाजाला विषमुक्त अन्न प्रदान करण्यासाठी झिटे यांनी येथे सुरू केलेला सेंद्रिय शेतीचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. आश्रमाचे हे भरजरी यश जगभरातल्या लोकांना अभ्यास, संशोधनासाठी खेचून घेत असताना डॉ. भाऊसाहेब झिटे मात्र हे वैचारिक वैभव येथेच सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.