मोहन राकेश यांच्या ‘आधे अधूरे’ या नाटकात घरातला तरुण मुलगा आईसमोर घरच्या पाहुण्याला म्हणतो, ‘आमची आन्टी आहे एक. मान छाटून टाका- अगदी जिना लोलोब्रिजिदा दिसते’ – यावर आई अस्वस्थ होते, मुलावर डाफरते.. कारण ‘जिना लोलोब्रिजिदा म्हणजे वक्षस्थळ’ हे पुरुषी, जगजाहीर समीकरण सर्वज्ञात असते. ते समीकरण न मोडणाऱ्या भूमिकाच १९५० ते १९७० दशकांपर्यंत या इटालियन अभिनेत्रीला मायदेशात आणि हॉलीवूडमध्ये मिळाल्या. पण ‘पाने, अमोरा ए फान्टासिया’ (ब्रेड, लव्ह अॅण्ड ड्रीम्स) यांसारख्या चित्रपटांतून अभिनयगुणही तिने सिद्ध केले. चित्रपट स्वीकारणे थांबवल्यावर शिल्पकला, छायाचित्रणातही कलागुण दाखवून, प्रसिद्धीचा वापर तिने ‘युनिसेफ’साठी केला.
जिना यांची निधनवार्ता सोमवारी (१६ जाने.) आली, तेव्हा ‘वल्र्ड्स मोस्ट ब्यूटिफुल वुमन’ हा उल्लेख झालाच. याच नावाच्या चित्रपटात जिना नायिका होत्या. ‘हिच्यापुढे मर्लिन मन्रो काहीच नाही’ यासारखे शेरे हम्फ्रे बोगार्टसारख्या अमेरिकी नायकांनी दिले असताना ‘बायसिकल थीफ’कार विट्टोरिओ डि’सिका यांनी (‘ब्रेड, लव्ह..’मधले सहकलाकार म्हणून) जिना यांना अभिनयातून आत्मानंद शोधता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. अर्थात श्रेष्ठ अभिनेत्रीचा मान त्यांना कधीही मिळाला नाही. त्यांची हॉलीवूड कारकीर्द ‘मदनिका’ म्हणूनच झाली. ‘ती सध्या कोणाबरोबर असते’ प्रकारच्या चर्चातूनच प्रसिद्धी वाढत गेली. हॉवर्ड ह्यूजेस, फ्रँक सिनात्रा यांच्या पुरुषी अपेक्षांपासून आपण कशा दूरच राहिलो, याचे किस्से जिना सांगू लागल्या, त्या मध्यम वय गाठल्यानंतर. तोवर इटलीत परतून, टस्कनी प्रांतात त्यांनी शिल्पकलेचा स्टुडिओ वसवला होता. १९५० ते ६७ पर्यंत चाललेला संसार मोडला होता आणि पुढे १९९० च्या दशकापासून तर, त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांची सहा पुस्तकेही प्रकाशित होणार होती. यापैकी पहिले पुस्तक ‘माझी इटली’ (इतालिया मिआ) नावाचे, तर दुसऱ्या पुस्तकापासूनची बहुतेक सारी लहान मुलांच्या छायाचित्रांची. युनिसेफच्या सदिच्छादूत म्हणून काम केल्यानंतर त्यांना थेट युरोपीय संघाच्या कायदेमंडळात (ईयू पार्लमेंट) निवड होण्याचे वेधही लागले होते, पण आठ निवडणुकांत हरल्यानंतर तो नाद सोडावा लागला.
भारतात त्या होत्या, युनिसेफच्या सदिच्छादूत म्हणून. दिल्लीत त्यांची पत्रकार परिषदही झाली, तेव्हा सरकारी ‘पत्र सूचना कार्यालया’तील पत्रपरिषदेला केवढी विक्रमी गर्दी होऊ शकते, याचे प्रत्यंतर आले होते. कारण अर्थातच, ही मदनिका आजही कशी सुंदर दिसते याचे कुतूहल. याच भारत-भेटीत ‘शालीमार’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला त्या हजर राहणार असल्याचा वापर बनी रुबेन आदी प्रसिद्धीकारांनी पुरेपूर करून घेतला आणि त्या प्रसिद्धीतंत्रातून झीनत अमान यांची ‘लोलोब्रिजिदाला भारतीय उत्तर’ अशी प्रतिमाही तयार करण्यात आली होती. वयाच्या नव्वदीतही चेहऱ्याचा रेखीवपणा कायम ठेवणाऱ्या जिना यांनी, स्वत:च्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न गांभीर्याने केला होता का हे मात्र कोडेच राहील.