Vyaktivedh Hilary Mantel Popular of the book Woolf hall Story novel ysh 95 | Loksatta

व्यक्तिवेध : हिलरी मॅन्टेल

जे पुस्तक ‘स्वत:ला सुधारा’ वगैरे प्रकारचे नसूनसुद्धा, कथा-कादंबरी प्रकारात मोडणारे असूनसुद्धा ज्याच्या नव्या प्रती मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्यांवरल्या विक्रेत्यांकडेही दिसतात, ते पुस्तक लोकप्रिय! ही व्याख्या कुणाला पटो न पटो, पण हिलरी मॅन्टेल यांच्या ‘वूल्फ हॉल’च्या नव्या प्रती मुंबई वा दिल्लीच्या रस्त्यांवर दिसत, एवढे खरे.

व्यक्तिवेध : हिलरी मॅन्टेल
व्यक्तिवेध : हिलरी मॅन्टेल

लोकप्रिय पुस्तकाची एक सोप्पी व्याख्या आहे.. जे पुस्तक ‘स्वत:ला सुधारा’ वगैरे प्रकारचे नसूनसुद्धा, कथा-कादंबरी प्रकारात मोडणारे असूनसुद्धा ज्याच्या नव्या प्रती मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्यांवरल्या विक्रेत्यांकडेही दिसतात, ते पुस्तक लोकप्रिय! ही व्याख्या कुणाला पटो न पटो, पण हिलरी मॅन्टेल यांच्या ‘वूल्फ हॉल’च्या नव्या प्रती मुंबई वा दिल्लीच्या रस्त्यांवर दिसत, एवढे खरे. वास्तविक ‘वूल्फ हॉल’ ही ६०० पानी कादंबरी, तीही सोळाव्या शतकातल्या इंग्लंडमध्ये घडणारी.. आठवा हेन्री, त्याच्या राण्या आणि या राजाची एकापाठोपाठ झालेली लग्ने सुकर व्हावीत, म्हणून क्लृप्तय़ा लढवणारा त्याचा इमानी सेवक थॉमस क्रॉमवेल अशी त्या कादंबरीतली पात्रे. तरीसुद्धा ही कादंबरी भारतीय महानगरांच्या अंगाखांद्यावर खेळते, ती ‘ऐतिहासिक कादंबरी’ असूनही माहिती बिनचूक आणि कथानकही पकड घेणारे असल्यामुळे. या कादंबरीचा खरा नायक थॉमस क्रॉमवेल आहे, हे त्याच मालिकेतील पुढल्या दोन कादंबऱ्यांनी स्पष्ट केले. या तीनपैकी दोन कादंबऱ्या ‘बुकर’ विजेत्या ठरल्या. पण हिलरी मॅन्टेल यांची निधनवार्ता गेल्या शुक्रवारी (२३ सप्टेंबर) येईपर्यंत, भारतीयांसाठी ‘वूल्फ हॉल’ हीच त्यांची ओळख होती.

हिलरी मॅन्टेल गेल्या. त्यांच्याबद्दल युरो-अमेरिकी वृत्तपत्रे/ नियतकालिकांत भरपूर लिहिले गेले.. हे सारे तात्कालिक मजकूर पुढेही इंटरनेटवर वाचता येतील, पण इंटरनेटचाच आधार घ्यायचा तर हिलरी मॅन्टेल यांच्या मुलाखती ऐकणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक न्याय देणारे ठरेल. यातून समजेल की, मँचेस्टरपासून काही मैलांवरल्या जुनाट खेडय़ातील कॅथोलिक ख्रिस्ती घरात  १९५२ साली जन्मलेली आणि बाराव्या वर्षांपर्यंत अतिच धर्मवादीपणे वाढवलेली ही मुलगी हुशार म्हणून पुढे शिकू लागली, रजस्वला होतानाच तिला अतिरक्तस्रावाचा रोग जडला आणि ‘होईल सारं नीट’ या सनातन विश्वासामुळे, २७ व्या वर्षीपर्यंत त्यांचे गांभीर्यच लक्षात घेतले गेले नाही. यातून हिलरी आई होण्याची शक्यता दुरावली. उपचार झाले, पण त्याचा विपरीत परिणाम म्हणून त्या लठ्ठ झाल्या. या सर्व काळात त्यांच्या पतीची साथ होती पण विविधांगी वाचन हाच खरा आधार होता! वयाच्या तिशीपासून त्या लिहू लागल्या, १९८५ मध्ये ‘एव्हरी डे इज मदर्स डे’ हे पुस्तक प्रकाशित झाले आणि सामाजिक इतिहासाआधारे मातृत्व या संकल्पनेचीच चिकित्सा करण्याची धमक त्यांच्यात असल्याचेही स्पष्ट झाले. ‘मदर्स डे’मधील मतिमंद तरुणी लग्नाविना आई होते, तेव्हा तिला एकटीने सांभाळणाऱ्या आईची त्रेधा आहे. पण भावनिक तरंगांत रमण्याऐवजी घडामोडी, रहस्यमय/ नाटय़मय घटना आणि पात्रांचे मनोव्यापार यांचा मोठा पट मांडणाऱ्यांपैकी हिलरी होत्या. या पटाची व्याप्ती ‘वूल्फ हॉल’नंतरच्या ‘ब्रिंग अप द बॉडीज’ आणि ‘द मिरर अ‍ॅण्ड द लाइट’ या कादंबऱ्यांतून दिसते. अनेक शिरच्छेद ‘राजाच्या मर्जीने’ घडवणाऱ्या थॉमस क्रॉमवेलचाच शिरच्छेद तिसऱ्या भागाअंती होतो; पण तोवर इंग्लंडच्या राजाने (आठवा हेन्री) धर्मसत्तेला राजसत्तेच्या काबूत कसे ठेवले, फ्रान्सशी लग्नसंबंध जोडून शांततेचा प्रयत्न कसा केला यासारख्या राजकीय इतिहासाचीही आतून ओळख वाचकाला होते. आत्मपर लिखाणातूनही परिपक्वता दाखवणाऱ्या या लेखिकेचा अंत सत्तरीतच होणे, हे वाङ्मयक्षेत्राचेही नुकसान आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुकरायण : सहलीवरची कथापात्रे..

संबंधित बातम्या

राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच!
अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय
देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा!
लोकमानस : दिल्लीच्या निकालांतून शिवसेनेने धडा घ्यावा
लोकमानस : आजचे दुर्लक्ष उद्या भोवेल..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय? सांगत आहेत गिरीश कुबेर…
५ रुपयांचा कापूर तुमचे जीवनच बदलून टाकेल? काही लोकांनाच माहित आहेत याचे चमत्कारिक फायदे
“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच हनी सिंगने दिली टीनाबरोबरच्या नात्याची कबुली, म्हणाला “माझी गर्लफ्रेंड…”
पुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती